अविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले स्थैर्य

Mate-Family
Mate-Family

जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व बाबासाहेब या मते बंधूंनी सव्वाचारशे फूट उंचावरील डोंगरावरील शेतीतून डोक्‍यावरून शेतमाल वाहतुकीचे कष्ट उपसले. नियोजनपूर्वक प्रयत्नांतून मिळविलेले उत्पन्न शेतीसाठीच खर्ची घातले. त्यातून मिळवलेल्या स्थैर्यातून शेतीचा विकास सुरूच ठेवला. माळावर सिंचनाची भक्कम सोय करीत विविध फळबागा, आंतरपिके, खरीप-रब्बी पिके अशी विविधता ठेवत कौटुंबिक अर्थकारण शाश्वत करण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील जयपूर हे सुमारे अडीचशे उंबऱ्याचं गाव. येथील राजू, भाऊसाहेब व बाबासाहेब या मते बंधूंची छत्तीस एकर शेती आहे. पैकी गावच्या दक्षीण भागात असलेल्या डोंगरावर साडेबारा एकर शेती आहे. सन २०११ पर्यंत माळरानावरील शेती खरिपाचीच होती. माळाच्या खालील शिवारात खरिपासह रब्बी हंगामही घेतला जायचा. सन १९९९ मध्ये या कुटुंबाने जवळपास दोन किलोमीटरवरील लाहुकी प्रकल्पाच्या शिवारातील स्वमालकीच्या शेतातून पाइपलाइन आणली. सन २००६-०७ मध्ये दुसरी व २०१०-११ मध्ये माळावरील साडेबारा एकरांसाठी तिसरी पाइपलाइन आणली.

सिंचनासह पीकपद्धतीत बदल
सिंचन मजबूत करताना पीकपद्धतीतही बदल केला. शेती उत्पादनातून मिळालेले उत्पन्न शेतीच्या विकासासाठीच वापरण्याचे तत्त्व अंगीकारल्याने आजवरची प्रगती शक्‍य झाल्याचे मते बंधू सांगतात. सर्वांत मोठे बंधू राजू शिक्षक अाहेत. मात्र शेतीची जबाबदारीही तेवढ्याच जबाबदारीने सांभाळतात. सारे कुटुंबच शेतीत कायम व्यस्त असते. पडीक वीस ते बावीस एकर क्षेत्रालाही वहीत करण्याचे प्रयत्न सुरू अाहेत.

पाण्याची अवघड वाट 
सन २०१०-११ मध्ये माळरानावरील शेतात सिंचन करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी एवढ्या उंचीवर पाणी नेणे कसे शक्‍य होईल, याची चाचपणी करण्यात आली. जाणकारांच्या मार्गदर्शनातून घरालगतच्या ८० फूट खोल विहिरीच्या तळातून थेट सव्वाचारशे फूट उंचीवरील डोंगरावरील शेतीत पाणी नेणे त्यामुळे शक्‍य झाले. लाहुकी प्रकल्प शिवारातील शेतातील विहिरीतून पाणी गावालगतच्या शेतातील विहिरीत अन्‌ तेथून सुमारे सहाहजार फूट अंतरावरील थेट ४२० फूट उंचीच्या माळावरच्या शेतात पोचविले. त्यासाठी २० एचपी क्षमतेचा मोटरपंप व चार प्रेशर व्हॉल्व्हचा वापर केला.  

माळावर शेततळे 
माळावर पाइपलाइनद्वारे पाण्याची सोय केली, तरी स्वस्थ न बसता तिथे सामूहिक शेततळे बांधले. त्यातून पाण्याची आणखी सोय झाली. पावसाळ्यात शेततळे भरून ठेवले जाते. त्याचा वापर दरवर्षी मार्च ते जूनपर्यंत होतो.  

एकत्र बसून घेतात निर्णय
मते कुटुंबीय शेती वा कुटुंबातील कोणताही निर्णय एकत्र बसूनच घेतात. प्रत्येकाचे मत जाणून घेण्याला महत्त्व दिले जाते. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित होते आणि ती यशस्वी करण्याचा तो प्रयत्न करतो. आमच्या कुटुंबाची हीच खरी ताकद असल्याचे मते बंधू सांगतात.  

पीकपद्धती (क्षेत्र एकर व सुमारे)
 कपाशी- ९, तूर- ४, ऊस- १ (गेल्यावर्षीपर्यंत चार एकर), बाजरी-२ 
 डाळिंब ५, मोसंबी ६, सीताफळ-३, द्राक्ष- २ एकर. 
 मूग, उडीद, भुईमूग, कारळे, रब्बी दोन एकर ज्वारी, चार ते पाच एकर गहू 
 सुमारे २१ एकरांवरील क्षेत्र ठिबकच्या साह्याने सिंचित. 
 पाण्याचे महत्त्व जाणून असलेल्या मते यांनी पहिल्यांदा २००५ मध्ये ३ एकरांवर ठिबक केले. 

खरीप व रब्बीचा कांदा 
१९९८ ते २०१५ पर्यंत उन्हाळी कांदा घेणारे मते आता डाळिंब व सीताफळात खरीप व रब्बीचा कांदा (दीड ते दोन एकर) घेतात.  एकरी १०० ते ११० क्‍विंटल उत्पादकता आहे. कांदा बीजोत्पादन रब्बीत केले जाते. 

उत्पादन व उत्पन्न 
डाळिंबाचे २०१० पासून उत्पादन सुरू आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा मोसंबीचे उत्पादन मिळाले. पावणेदोन लाख रुपये मिळाले. गेल्या वर्षी पहिल्यांदाच घेतलेल्या द्राक्षाला प्रतिकिलो ३० रुपये दर जागेवरच मिळाला. कपाशी दरवर्षी एकूण क्षेत्रात ९० क्‍विंटल, तूर ४० ते ४५ क्‍विंटल, मका १०० ते १२५ क्‍विंटल, ऊस एकरी ३२ टन, सोयाबीन एकरी ८ क्‍विंटल, बाजरी एकरी ८ ते १० क्‍विंटल, रब्बी ज्वारी एकरी १२ क्‍विंटल तर गव्हाचे एकरी १५ क्‍विंटल उत्पादन मिळते. 

मते यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
 फळबांगात सुरवातीच्या काळात आंतरपिकांना प्राधान्य. डाळिंब, सीताफळात कांदा, भुईमूग, मूग, सोयाबीन तर मोसंबीत सोयाबीन 
 लाहुकी प्रकल्पाला लागून मालकी क्षेत्रात दोन विहिरी. त्यातून प्रत्येकी पाच हजार फूट अंतरावरून आणले शेतीसाठी पाणी. 
 माळावरील शेतीत सुधारणा करताना सुमारे २५ ट्रॅक्‍टरभर दगड बाजूला केले.  
 माळावर पाणी नेण्यासाठी गावालगतच्या शेतात खोदली तिसरी विहिर 
 शेतीतील उत्पन्नातून वाढविली सहा एकर शेती 
 माळावरच्या शेतीला जाळीचे कुंपण 
 शेती सुधारणासाठी पीककर्ज आले उपयोगी 
 यांत्रिकीकरणावर भर. तीन ट्रॅक्‍टर व पेरणी मशागतीची यंत्रे.  
 दावणीला दोन खिल्लार ठेवत जपले बैलांचे महत्त्व 
 दोन गायी व दोन म्हशींमुळे घरी कायम दूध-दुभतं. 
 गोबर गॅसच्या वापराने इंधनबचत. स्लरीचा डाळबिं व द्राक्षांसाठी वापर 
 फळबागांत पाचटाचे मल्चिंग 
 प्रत्येक फळझाडाला दरवर्षी किमान दहा किलो शेणखत देण्याचा नियम 
 रासायनिक खतांचा प्रमाणशीर वापर  
 सरासरी सात ते आठ मजुरांना वर्षभरात किमान ३०० दिवस रोजगार 
 एक ते दोन गुंठ्यांत घरच्यासाठी पालेभाज्यांचे नियोजन 
 केशर आंब्याची बांधावर २५ झाडे, चिकू, आवळा, पपई  

राजू दौलतराव मते, ९४२३७४३२२४
बाबासाहेब मते, ९४२१९७९६०७
भाऊसाहेब मते, ७०८३५०१४०७ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com