फुलशेतीने दिली आर्थिक साथ

Gulab-Kadam
Gulab-Kadam

हिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ) गावातील गुलाब परसराम कदम यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत फुलशेतीवर भर दिला आहे. लिली, मोगरा, कागडा या फुलांच्या लागवडीतून त्यांना वर्षभर टप्प्याटप्प्याने उत्पन्न मिळते. सुट्या फुलांच्या विक्री बरोबरीने हारनिर्मिती तसेच स्टेज, गाडी सजावटीच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक मिळकत वाढविली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावर तपोवन गाव वसले आहे. गावशिवारातील जमीन खोल काळी कसदार आहे. नदीमुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता आहे. गेल्या काही वर्षांत गावातील प्रयोगशील शेतकरी परिसरातील बाजारपेठेतील फुलांची मागणी लक्षात घेऊन फुलशेतीकडे वळले. या शेतकऱ्यांनी लिली, मोगरा, कागडा, गुलाब, गॅलार्डिया फुलांच्या लागवडीवर भर दिला आहे. फुलशेतीमुळे शेतकऱ्यांना वर्षभर मिळकतीचा चांगला स्राेत तयार झाला आहे. 

तपोवन गावातील गुलाब परसराम कदम हे देखील प्रयोगशील फूल उत्पादक शेतकरी. त्यांची तपोवन शिवारात वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. शाश्वत सिंचनासाठी त्यांनी कूपनलिका घेतली आहे. सन १९९२ पासून ते शेती करतात. सुरवातीच्या काळात कापूस, सोयाबीन, तूर आदी पारंपरिक पिकांच्या लागवडीवर त्यांचा भर होता. ही शेती सांभाळत गुलाब कदम हे जवळा बाजार येथील फूल उत्पादक शेतकरी दत्तप्रसाद सोमाणी यांच्याकडे वीस वर्षे दिवाणजी म्हणून काम पहात होते. याठिकाणी त्यांना फुलपिकांची लागवड ते विक्रीपर्यंतच्या माहितीसोबतच अनुभवही मिळाला. या अनुभवातून कदम यांनी फुलशेतीचा निर्णय घेतला. बाजारपेठेची मागणी आणि व्यवस्थापनास सोपे जाण्यासाठी त्यांनी सन २००० मध्ये दोन एकर क्षेत्रावर लिली आणि निशिगंध लागवड केली.

लिली लागवड ठरली फायदेशीर
लिली लागवडीबाबत कदम म्हणाले, की लिलीच्या कळ्यांना हारासाठी वर्षभर चांगली मागणी असते. त्यामुळे मी २००० साली एक एकर क्षेत्रावर सरी पद्धतीने लिली कंदांची ३ फूट बाय २ फुटावर लागवड केली. पिकाच्या जोमदार वाढीसाठी पुरेशा प्रमाणात शेणखत आणि रासायनिक खतांची मात्रा दिली. कंदाच्या लागवडीनंतर सरासरी आठ महिन्यानंतर फुलांच्या उत्पादनास सुरवात होते. परंतु, व्यावसायिक उत्पादन दोन वर्षांपासून सुरू होते. लिलीच्या फुलांचा हंगाम प्रामुख्याने फेब्रुवारी ते जून या काळात असतो.

या कालावधीत अधिक उत्पादन मिळत असले तरी वर्षातील सात महिने लिलीचे उत्पादन मिळते. मी डिसेंबरमध्ये कंदाची सर्व पाने काढून शेतामध्येच कुजवतो. त्याचे चांगले खत होते. मार्च महिन्यात एकरी चार ट्रॉली शेणखत लिली पिकाला देतो. नोव्हेंबर महिन्यात रासायनिक खताची मात्रा दिली जाते. हे पीक साधारणपणे पंधरा वर्ष चांगले उत्पादन देते.

साधारणपणे फेब्रुवारी ते जून या कालावधीत एक एकर क्षेत्रावरील लिलीपासून मला दररोज सरासरी २०० ते २२५ गड्ड्या (एका गड्डीत ५० 
कळ्या) मिळतात. सकाळी सहा वाजता कळ्या तोडण्यास सुरवात होते. त्यानंतर १० ते ११ या वेळेत तोडलेल्या कळ्यांना दोरा बांधून गड्ड्या तयार केल्या जातात. एका गड्डीस खुल्या बाजारपेठेत सरासरी २ ते ५ रुपये दर मिळतो. लागवडीसाठी कंदांना देखील चांगली मागणी असते. याचे कंद प्रतिनग ३ रुपये या दराने विकतो.  

विविध ठिकाणी विक्री
 तपोवन गावापासून नांदेड येथील फूल बाजार जवळ आहे. त्याचबरोबरीने गुलाब कदम हे अमरावती, वाशीम, मालेगाव, हिंगोली, परभणी आदी ठिकाणच्या फूल व्यापाऱ्यांना मागणीनुसार फुलांच्या गड्या पार्सल पाठवितात. जवळा बाजार येथून दररोज एसटीने लिली कळ्यांचे पार्सल संबंधित ठिकाणी पाठविले जातात. त्यासाठी कदम यांनी एसटी बसचा पार्सल वाहतूक पास काढला आहे. या व्यापाऱ्यांकडून प्रतिगड्डी सरासरी सहा रुपये दर मिळतो.

फुलशेतीचा विस्तार
पारंपरिक पिकांच्या तुलनेत लिली, कागडा, मोगरा ही फुलपिके कदम यांना फायदेशीर ठरली आहेत. कूपनलिकेच्या माध्यमातून  शाश्वत सिंचनाची सोय झाल्यामुळे उत्पन्नाची शाश्वती वाढली. शिवाय वर्षभर कमी अधिक प्रमाणात उत्पन्न मिळत रहाते. फुलशेतीतील उत्पन्नातून गुलाब कदम यांनी गावशिवारात सव्वा एकर जमीन खरेदी केली.त्यामुळे आता त्यांच्याकडे एकूण सव्वा तीन एकर शेती झाली. यामध्ये अडीच एकरवर लिली लागवड आहे. उर्वरित क्षेत्रावर मोगरा आणि कागडा लागवड आहे. कदम यांना फुलशेतीतून खर्च जाता वर्षाकाठी दोन लाखांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नाच्या खात्रीमुळे त्यांनी फुलशेतीचा विस्तार केला आहे. जवळा बाजार गावात त्यांनी दोन शेतकऱ्यांच्या अडीच एकर शेतावर बटईने यंदाच्यावर्षी लिली लागवड केली आहे.

फुलशेतीचे व्यवस्थापन
फुलशेतीमध्ये गुलाब कदम आणि त्यांच्या पत्नी भगीरथी  यांना त्यांचा मोठा मुलगा गंगाधर हा मदत करतो. लहान मुलगा आदिनाथ शिक्षण घेत आहे. 
गंगाधर यांच्याकडे फुले तोडणीनंतर पार्सल तयार करुन एसटी बसने विविध ठिकाणच्या विक्रेत्यांना पोहचविण्याची जबाबदारी आहे. लिली, मोगरा, काकडा फुलांचा हंगाम सुरू असताना तोडणीसाठी अतिरिक्त मजूर घ्यावे लागतात. मजुरांना लिली कळ्या तोडणीसाठी प्रतिशेकडा ७० रुपये मजुरी दिली जाते. लिली कळ्या तोडणीसाठी सकाळच्या दोन ते तीन तासांत गावातील तीन होतकरू तरुणांना रोजगार मिळाला आहे. मोगरा आणि कागड्याची फुले तोडणीसाठी महिला मजुरांना १०० रुपये प्रतिदिन किंवा ४० रुपये प्रति किलोप्रमाणे मजुरी दिली जाते.

मागणीनुसार फुलांचा पुरवठा
 फुलांच्या विक्रीबाबत कदम म्हणाले, की विविध ठिकाणच्या फुलांच्या व्यापाऱ्यांना वर्षभर नियमित लिली पाठवावी लागते. आॅफ सिझनमध्ये लिली कळ्यांचे उत्पादन कमी मिळते. या कालावधीत व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार लिली फुलांची कमतरता पडून नये म्हणून स्वतःच्या शेतातील लिली सोबत मी जवळा बाजार, गुंडा आदी गावातील शेतकऱ्यांकडून लिली कळ्यांची खरेदी करतो.  सध्या माझ्या शेतातील लिलीच्या १०० गड्ड्या आणि अन्य शेतकऱ्यांच्याकडून २०० गड्ड्या अशा एकूण ३०० लिली कळ्यांच्या गड्या दररोज विविध ठिकाणच्या फूल व्यापाऱ्यांना पोहचवितो. फुलांचे व्यापारी दर महिन्याला माझ्या बॅंक खात्यावर रक्कम जमा करतात. लग्न सराईमध्ये गावांमध्ये फुले तसेच हारांना मागणी असते. गावातील लग्न समारंभातील स्टेज सजावट, हारांची विक्री तसेच वाहन सजावट यातून वर्षाकाठी मी १५ ते २० हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवतो.

कागडा, मोगरा लागवड 
    बाजारपेठेचा अभ्यास करत कदम यांनी दहा गुंठे क्षेत्रावर कागडा आणि दहा गुंठे क्षेत्रावर मोगरा लागवड केली.
    कागड्याच्या फुलांचा हंगाम आॅक्टोबर ते जानेवारी या कालावधीत असतो. हंगामात दररोज सरासरी पाच  किलो फुले मिळतात. प्रतिकिलो सरासरी १५० रुपये दर मिळतो. 
    दहा गुंठे क्षेत्रावर मोगऱ्याची लागवड आहे. फेब्रुवारी ते मे असा मोगऱ्याचा हंगाम असतो. दररोज सरासरी ६ ते ७ किलो फुले मिळतात. मोगऱ्याला प्रतिकिलो सरासरी १५० रुपये दर मिळतो.
    हिंगोली आणि वाशिम येथे मोगरा, कागड्याची  फुले विक्रीस पाठविली जातात.

- गुलाब कदम, ८९७५०१७५०९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com