भारतीय दूध सुरक्षित

Milk
Milk

नवी दिल्ली - भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत प्रश्‍न उपस्थित होत असले तरीही फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्डस अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एफएसएसएआय) प्रकाशित केलेल्या अहवालात भारतीय दूध उच्च सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. ६ हजार ४३२ नमुन्यांचा विविध मापदंडांच्या आधारे व्यवस्थित अभ्यास करून हा निष्कर्ष काढल्याचे ‘एफएसएसएआय’ने म्हटले आहे. 

‘एफएसएसएआय’ने ‘दि रिपोर्ट आॅफ दि नॅशनल मिल्क क्विलिटी सर्वे-२०१८’ प्रसिध्द केला आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय दुधाच्या सुरक्षिततेविषयी तसेच गुणवत्तेविषयी सतत प्रश्‍न उपस्थित केले जातात. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर चिंता व्यक्त केली आहे. मात्र भारतातील दुधाचे ६ हजार ४३२ नमुने आणि विविध मापदंडाच्या आधारावर सर्वात मोठा अभ्यास करण्यात आला असून, त्यात भारतीय दूध अति सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे, असे ‘एफएसएसएआय’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

अहवालात काही अंशी दुधात भेसळ असल्याचे सांगितले आहे. मात्र देशातील कोणत्या भागातील नमुन्यांमध्ये भेसळ आढळली हे स्पष्ट केले नाही.
अगरवाल म्हणाले की, अभ्यासातील निष्कर्ष डेअरी उद्योग आणि राज्य सरकारांना देण्यात आले आहे, आणि त्यानंतर भेसळ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय गेले जातील. कीटकनाशके उर्वरित अंशाविषयी काळजी करण्याची आवश्‍यकता नाही. तर केवळ १.२ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिजैविके उर्वरित अंश कमाल मर्यादा पातळीपेक्षा अधिक आढळले आहेत आणि हे मख्य करून दुधाळ जनावरांना कासदाह आजारावर देण्यात येणाऱ्या आॅक्सी-टेट्रासायक्लीन या लसीमुळे अंश आढळले आहेत. तसेच फॅट आणि एसएऩएफच्या गुणवत्ता मापदंडाच्या अटीमध्ये उत्पादकांकडून येणारे दूध बसत नाही. प्रक्रिया केलेल्या दुधात गुणवत्ता मापदंडाच्या अटीपेक्षा घटक जास्त असतात, तर कच्च्या दुधामध्ये कमी असतात. ही बाब चिंतेची असून विविध उपायांद्वारे यावर तोडगा काढावा लागणार आहे. 

भेसळीचे प्रमाण कमी
भारतातील दूध मोठ्या प्रमाणात भेसळमुक्त आहे. अभ्यास केलेल्या ६ हजार ४३२ नमुन्यांपैकी केवळ १२ नमुन्यांमध्ये भेसळ झाल्याचे आढळले आहे. हे प्रमाण खूपच कमी आहे. सर्व्हेमध्ये खाद्य तेल, डिटर्जंट, ग्लूकोज, युरिया आणि अमोनियम सल्फेट यासारख्या १३ भेसळींची चाचणी करण्यात आली आहे. तसेच दुधाच्या नमुन्यांची प्रतिजैविके उर्वरित अंश (अँटिबायोटिक), कीटकनाशके उर्वरित अंश (पेस्टिसाइड) आणि अफ्लॅटॉक्झीन एम १ यांचीही पातळी तपासण्यात आली आहे, असे ‘एफएसएसएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अगरवाल यांनी सांगितले.

अभ्यास केलेल्या नमुन्यांपैकी केवळ १० टक्के (६३८) नमुन्यांमध्ये काही घटक आढळले आहेत, ज्यामुळे दूध पिण्यास असुरक्षित होते. हे  घटक प्रामुख्याने खाद्याची गुणवत्ता आणि प्रक्षेत्रातील अस्वच्छता यामुळे आढळले आहेत, तर ९० टक्के नमुने हे सुरक्षित आढळले.      
- पवन अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘एफएसएसएआय’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com