फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात घसरली

Pomegranate
Pomegranate

पुणे - निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक अॅसिडच्या कमाल उर्वरित अंशाची मान्यता पातळी द्राक्षापेक्षाही जादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे देशाची डाळिंब निर्यात मोठ्या प्रमाणात घसरली असून, रेसिड्यू पातळी घटविण्यासाठी अपेडामार्फत युरोपशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

राज्यात १ लाख ३० हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा असून, कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना विदेशी बाजारपेठा मिळवून देण्यात निर्यातक्षम बागांचा वाटा मोठा आहे. गेल्या हंगामात ५०० कंटेनरची मागणी असताना केवळ १५० कंटनेरची निर्यात झाली आहे. साडेतीनशे कंटेनरची निर्यात केवळ या समस्येमुळे घटल्याचा अंदाज राज्य डाळिंब उत्पादक संशोधन संघाने व्यक्त आहे.

‘‘फॉस्फोनिक अॅसिडच्या समस्येमुळे निर्यात घटली असून, त्यामुळे निर्यातक्षम डाळिंब उत्पादक शेतक-यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो आहे. द्राक्षासाठी फॉस्फोनिक अॅसिडची एमआरएल पातळी प्रतिकिलो ७५ मिलिग्रॅम असताना डाळिंबाला केवळ दोन मिलिग्रॅम ठेवण्यात आलेली आहे. ही बाब आम्ही अपेडाच्या लेखी निदर्शनास आणली आहे,’’ असेही राज्य डाळिंब संघाचे म्हणणे आहे. 

अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी काही दिवसांपूर्वीच अपेडाच्या बैठकीत फॉस्फोनिक अॅसिडचा मुद्दा उपस्थित केला. ‘‘अपेडाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, युरोपीय संस्थेशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ही समस्या लवकर न सुटल्यास निर्यातक्षम बागांचे मोठे नुकसान होऊ शकते. द्राक्ष थेट सेवन केले जात असतानाही फॉस्फोनिक अॅसिडची पातळी ७५ मिलिग्रॅम ठेवण्यात आली आहे. याउलट साल काढल्यानंतरच डाळिंबाचे दाणे वापरले जातात. त्यामुळे डाळिंबासाठी फॉस्फोनिक अॅसिडची रेसिड्यू लेव्हल किमान दहा मिलिग्रॅमच्या पुढेच ठेवावी,’’ असे श्री.चांदणे यांनी सांगितले. 

यंदा युरोपसाठी किमान दहा हजार टनाची मागणी असून, इतर देशांसाठी ७० हजार टन डाळिंबाची मागणी आहे. देशात एक लाख ८० हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड होते. निर्यातक्षम बागा वाढत असल्यामुळे फॉस्फोनिक अॅसिडची समस्या तातडीने निकालात काढावी लागेल, असेही संघाचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे युरोपच्या बाजारपेठांमध्ये केवळ भारतीय डाळिंबामध्येच फॉस्फोनिकचे जादा अंश सापडत असल्याचे आढळून येते. मात्र, फॉस्फोनिकचा बाऊ करून डाळिंबाची निर्यात धोक्यात येत असल्यास अपेडाने पावले टाकायला हवी, असे डाळिंब उत्पादकांना वाटते. 

भारतीय डाळिंबात 'फॉस्फोनिक'चे अंश सापडत असले, तरी त्याला शेतकरी अजिबात जबाबदार नाहीत. मुळात ''फॉस्फोनिक''ची मर्यादा पातळी वाढवून दिल्यास भारतीय डाळिंबाच्या निर्याती पुन्हा सुरळीत होऊ शकते. अपेडाने त्यात लक्ष घालण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ

नेमके कारण अस्पष्ट
राज्यातील डाळिंबाच्या बागांमध्ये कोणताही उत्पादक फॉस्फोनिक अॅसिडचा वापर करीत नाही. तरीदेखील त्याचे अंश केवळ डाळिंबात कशामुळे सापडतात, याचा शोध राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ घेत आहेत. ‘‘काहींच्या मते फॉसेटिल या बुरशीनाशकातून फॉस्फोनिकचे अंश डाळिंबात येतात, तर काहींच्या मते फॉस्फरस गटातील खतांमधून अंश येत असल्याचे सांगितले जाते. मात्र, या दोघांचा कधीही वापर न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागेतील फळांमध्येदेखील फॉस्फोनिकचे अंश सापडत आहेत,’’ असे अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांचे म्हणणे आहे.

डाळिंब उत्पादक शेतकरी 
राज्यात कष्टाने निर्यातक्षम माल तयार करीत आहेत. फॉस्फोनिक अॅसिडचा थेट वापर शेतकरी कधीही करीत नाहीत. मात्र, इतर मूलद्रव्यांच्या माध्यमातून 'फॉस्पोनिक'चा शिरकाव मालात होऊ शकतो. त्यामुळे देशाच्या मध्यवर्ती संदर्भ प्रयोगशाळेने या समस्येचा अभ्यास करावा. त्याचे विस्तृत विश्लेषण अहवाल युरोपीय कोडेक्सच्या निदर्शनास आणून दिल्यास 'फॉस्फोनिक'ची 'एमआरएल' वाढवून दिली जाऊ शकते.
- गोविंद हांडे, निर्यातक्षम फळ प्रणालीचे अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com