दुष्काळी भागात वीस वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन

दुष्काळी भागात वीस वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन

सातारा जिल्ह्यात कायम दुष्काळी म्हणून खटाव तालुक्याची ओळख आहे. अशा प्रतिकूलतेतही तालुक्यातील निमसोड येथील विठ्ठल वरूडे यांनी वीस वर्षांपासून द्राक्ष निर्यातीत सातत्य ठेवले आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनासह रासायनिक अवशेषमुक्त द्राक्षांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनात आपला हातखंडा तयार करण्याबरोबर वेगळी ओळखही तयार केली आहे. 

सातारा जिल्ह्यात कायम दुष्काळाच्या झळा सोसणारा तालुका म्हणून खटावची ओळख आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी दुष्काळावर मात करून शेतीत यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात. निमसोड येथील वरूडे कुटुंब हे त्यापैकीच एक. विठ्ठल, राजेंद्र व रामकृष्ण असे तीन बंधूंचे हे कुटूंब असून रामकृष्ण यांच्याकडे शेतीची पूर्ण जबाबदारी असते. 

धडपडीतून द्राक्षशेती 
कुटूंबाची सुरवातीच्या काळात आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. केवळ पाच एकरच शेती होती. पाणीटंचाई असल्याने शेती कोरडवाहूच होती. कुटूंबाने मग छोटासा कापड व्यवसाय सुरू केला. शेतीत नवे करण्याची धडपड होती. सन १९८५ च्या सुमारास एक एकरात द्राक्षशेतीला आरंभ केला. बागा जगविण्यासाठी टँकरच्या पाण्याचाही वापर केला. त्या काळात बैलगाडीच्या सहाय्याने द्राक्षाची वाहतूक केली जात असल्याचे विठ्ठल सांगतात. टप्पाटप्प्याने द्राक्षक्षेत्रात वाढ केली. शेती व कापड व्यवसायातून जमीन खरेदी केली.  

द्राक्षशेतीचा विकास 
  ध्यास, चिकाटी, सातत्य या बाबींमधून वरूडे कुटूंबाने शेतीकडे चोख लक्ष देत शेती ४० एकरांच्या पुढे नेली.    सध्या द्राक्षक्षेत्र - २६ एकरांपर्यंत.    या पिकात दीर्घ अनुभव तयार करीत त्यात हातखंडा 

एकरी उत्पादन १२ ते १५ टनांच्या आसपास   वीस वर्षांचा निर्यातीचा अनुभव. आजचे सुमारे ८० टक्के उत्पादन निर्यातीसाठी.   वाण- टू क्लोन, रूटस्टॉक- डॉगरीज व वन टेन आर 

  जमिनीचा पोत खराब होऊ नये यासाठी विशेष लक्ष. शेणखत कंपोस्टचा अधिक वापर.    बागकामांसाठी नाशिक येथील प्रशिक्षित मजुरांचा वापर    बाजरी, मका, ताग आदी आंतरपिके  

कोल्ड स्टोरेज व पॅकहाउस 
 सह्याद्री ॲग्रो एक्सपोर्ट या नावाने ब्रॅडिंग व पॅकिंग  परिसरातील द्राक्ष उत्पादकांना सोबत घेऊन वरूडे यांनी भागीदारीत ७० टन क्षमतेचे ‘कोल्ड स्टोरेज’ व दहा टन क्षमतेचे प्री कूलिंग युनीट उभारले   निर्यातीसाठी ग्रोप्लस एक्सपोर्ट कंपनीची स्थापना  

थेट निर्यातीसाठी प्रयत्न 
सुरवातीच्या काळात विमानाने दोन टन निर्यातही साधली. विक्रीत अडचण आल्याने ती थांबविली. मध्यंतरी क्लोरमेक्वाट क्लोराईड वाढनियंत्रकाचे अवशेष आढळल्याच्या कारणांवरून निर्यातदारांनी पैसे न दिल्याने प्रचंड तोटा सहन केला. तरीही न खचता निर्यात थांबणार नाही याची दक्षता घेतली.   

नवी पिढी शेतात 
कुटुंबातील नवी पिढीपैकी चेतनने ॲग्री विषयातील पदवी घेतली आहे. रामकृष्ण यांचा मुलगा शुभमने देखील बीएस्सी ॲग्रीची पदवी घेऊन पुढील शिक्षण नेदरलॅंड येथे घेतले आहे. सध्या तो त्या देशात कार्यरत आहे. आपली नवी पिढी शेतीसह निर्यातीच्या बाजारपेठेसाठी मदत करेल, असा विश्‍वास रामकृष्ण यांना आहे. 

पुरस्काराने सन्मान 
द्राक्षशेतीतील कार्याबाबत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वरूडे यांना सन्मानित करण्यात आले आहे. यात २०११ मध्ये महाराष्ट्र राज्य बागायतगार संघाचे सन्मानपत्र, २०२ मध्ये अखिल महाराष्ट्र पुरस्कार, २०१६ मध्ये खाजगी कंपनीचा प्रथम पुरस्कार तसेच २०१७ मध्ये खटाव तालुका कृषीरत्न पुरस्कार आदींचा समावेश आहे. नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, व्यवस्थापक दीपक शिंदे, महाराष्ट्र राज्य बागायतगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटीद्वारे मार्गदर्शन केले आहे. कुटूंब एकसंघ असल्यानेच द्राक्ष शेती यशस्वी झाल्याचे वरूडे अभिमानाने सांगतात.
   रामकृष्ण वरूडे, ९४२३२६४६२१ 

उत्पादन व निर्यातीत सातत्य 
वरूडे यांचे सुमारे २६ एकर क्षेत्र द्राक्षाखाली आहे. दरवर्षी पाणी, हवामान या घटकांच्या आधारे  उत्पादनात बदल होतो. तरीही एकूण क्षेत्रातून दरवर्षी सुमारे ३०० टन ते त्याहून अधिक द्राक्षांचे उत्पादन व युरोपीय बाजारपेठेत निर्यात साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रति किलो ९५ रुपये, काहीवेळा ७० रुपये तर मागील वर्षी किलोला ६० ते ६५ रुपये दर मिळाला. काही द्राक्षे ते खाजगी कंपनीसही देतात. एकरी सरासरी किमान तीन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.  

दुष्काळातील पाणी व्यवस्थापन
दुष्काळ तीव्र असल्याने बागा जगविण्यासाठी वरूडे यांनी सातत्याने कष्ट घेतले. अनेकवेळा टँकरच्या पाण्याद्वारे द्राक्षवेली जगविल्या. पाण्याचा शाश्वत मार्ग असावा या दृष्टीने बारा किलोमीटर अंतरावरील टेंभू कालव्याच्या नजीक विहीर घेतली. त्यातील पाणी शेततळे तसेच अन्य विहिरीत सोडले. प्रत्येकी एक एकरात एक याप्रमाणे दोन शेततळी आहेत. पाण्याचा शंभर टक्के कार्यक्षम वापर व्हावा, यासाठी ड्रीप ॲटोमेशन प्रणाली बसविली आहे. मल्चिंग पेपरचाही वापर होतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com