व्याजदर कपातीचा लाभ मिळणार लवकरच

व्याजदर कपातीचा लाभ मिळणार लवकरच

नवी दिल्ली - सलग तीन पतधोरणांमध्ये रेपो दरात कपात केल्यानंतर बॅंकांकडूनही लवकरच व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना दिला जाईल, अशी अपेक्षा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. यामुळे नजीकच्या काळात गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

सोमवारी (ता. ८) रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाने दास यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. चालू वर्षात रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात पाऊण टक्‍क्‍याची (०.७५) कपात करण्यात आली आहे. पतधोरणात अर्धा टक्के (०.५०) व्याजदर कमी केल्यानंतर त्यातील केवळ ०.२१ टक्केच प्रत्यक्ष लाभ बॅंकांनी ग्राहकांना दिला होता. यापूर्वी व्याजदर कपातीचा लाभ देण्यासाठी बॅंका सहा महिन्यांचा अवधी घेत होत्या, मात्र आता सकारात्मक बाब म्हणून दोन ते तीन महिन्यांत बॅंकांकडून यासंदर्भात निर्णय घेतला जात असल्याचे दास यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या महिन्यात पतधोरणानंतर एकूण तीन वेळा दर कपात झाली आहे. पाऊण टक्के रेपो दर कमी झाला आहे. १ जून रोजी बाजारात रोखतेचे प्रमाणदेखील पुरेसे होते. आम्ही बॅंकांकडून माहिती गोळा करत आहोत. त्यामुळे रेपो दर कपातीचा लाभ लवकरच ग्राहकांना मिळेल, असे दास यांनी सांगितले. 

अर्थव्यवस्थेचे रोख तरलता समाधानकारक आहे. ज्या बॅंकेला टंचाई जाणवेल, त्या बॅंकेस रिझर्व्ह बॅंकेकडून रोखता प्रमाण राखण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे दास यांनी सांगितले. बिगर बॅंकिंग वित्त संस्थांमधील (एनबीएफसी) स्थितीबाबत रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष असल्याचे दास यांनी 
सांगितले. 

‘एनबीएफसी’ कंपन्यांची एकूण उलाढाल आणि त्यांचे परत 
फेडीची पद्धत यावर बारकाईने लक्ष असल्याची माहिती दास यांनी दिली. बॅंकांना ७० हजार कोटींचे भांडवली अर्थसाहाय्य देण्याची घोषणा स्वागतार्ह आहे. यामुळे बॅंकांची आर्थिक स्थिती भक्कम होईल, असे दास यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com