ज्येष्ठ हिंदी समीक्षक, कवी नामवरसिंह यांचे निधन

ज्येष्ठ हिंदी समीक्षक, कवी नामवरसिंह यांचे निधन

नवी दिल्ली- "मुझ में ढल कर बोल रहे जो वे समझेंगे। अगर दिखेगी कमी स्वयं को ही भर लेंगे।।' असा दुर्दम्य विश्‍वास आपल्या कवितेतून गेली किमान 65 वर्षे जागविणारे विख्यात हिंदी कवी व समीक्षक नामवरसिंह (वय 92) यांचे काल रात्री दिल्लीच्या "एम्स' रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. आज दुपारी लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

नामवरसिंह गेल्या महिन्यात दिल्लीतील निवासस्थानी पडले होते. त्यानंतर त्यांना "एम्स'मध्ये दाखल करण्यात आले; पण वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावत गेली व त्यांनी काल अखेरचा श्‍वास घेतला. त्यांना साहित्य अकादमी सन्मान लाभला. साहित्यिकांची सामाजिक बांधिलकी व सामीलकी यावर निडरपणे लिहिणारे व तसेच वागणारे नामवरसिंह यांनी असहिष्णुतेच्या प्रत्येक कालखंडाला कडाडून विरोध केला होता. अलीकडे ज्ञानपीठ समितीवरही त्यांनी टीकास्त्र सोडले होते. 

नामवरसिंह यांचा जन्म 28 जुलै 1927 रोजी वाराणसीजवळ चंदौली जिल्ह्यातील जीयनपूर गावात झला. विख्यात हिंदी साहित्यिक हजारीप्रसाद द्विवेदी यांचे ते पट्टशिष्य होते. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) व बनारस हिंदू विद्यापीठात दीर्घकाळ अध्यापन केले. सुरवातीच्या काळात सागर व जोधपूर विद्यापीठांतही त्यांनी काम केले. बनारस विद्यापीठातून हिंदी साहित्यावर एमए व डॉक्‍टरेट करणारे नामवरसिंह यांनी हिंदी साहित्यातील समीक्षेला नवी दिशा दिली. "जनयुग' व "आलोचना' या दोन हिंदी नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले. नामवरसिंह यांनी तब्बल सहा दशकांपूर्वी राजकीय क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न केला व चंदौली विधानसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली. मात्र ते पराभूत झाले होते. 

प्रमुख साहित्यकृती 
बकलम खपद, हिंदी के विकास में अपभ्रंश का योग, आधुनिक साहित्य की प्रवृत्तियॉं, छायावाद, पृथ्वीराज रासो की भाषा, इतिहास और आलोचना, कहानी नई कहानी, कविता के नए प्रतिमान, दूसरी परंपरा की खोज, वाद विवाद संवाद, कहना न होगा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com