भाजपच्या राष्ट्रीय संघटनमंत्री पदी 'यांची' नियुक्ती

BL Santosh
BL Santosh

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री म्हणून ज्येष्ठ संघनेते बी. एल. संतोष यांची नियुक्ती आज (रविवार) संध्याकाळी करण्यात आली. भाजप व त्याची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात पूल बांधण्याचे व समन्वयाचे काम संघटनमंत्री करतात. भाजप अजूनही चाचपडत असलेल्या दक्षिणेतील राज्यांत दीर्घकाळ संघकार्याचा अनुभव असलेले संतोष हे संघातून आलेले मूलतः संघाचे प्रतिनिधी आहेत. संतोष यांची नियुक्ती भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केल्याचे जाहीर झाले आहे. संघटनमंत्री हे भाजप संघटनेमध्ये पक्षाध्यक्षांनंतरचे सर्वांत महत्वाचे पद असते. 

गेली तेरा वर्षे या पदावर असलेले रामलाल संघात परतल्यावर याच गटात उपसंघटनमंत्री असलेले संतोष यांना बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला. 2006 मध्ये संजय जोशी यांच्या जागी रामलाल यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी लालकृष्ण अडवानी, नितीन गडकरी, राजनाथसिंह, नरेंद्र मोदी व शहा या विविध प्रकृतीच्या नेत्यांच्या काळात संघ व भाजप यांच्यातील समन्वयाचे काम उत्तमपणे केल्याची संघपरिवाराची भावना आहे. त्यामुळेच ते 13 वर्षे या पदावर राहिले. मात्र 2019 च्या यशानंतर रामलाल, आता पुन्हा संघात परतावे असे वाटते, अशी भावना बोलून दाखवीत असत. त्यांनी याबाबत शहा यांना दोनदा पत्रे पाठविली होती. रामलाल यांचे वय व त्यांची संघात परतण्याची तीव्र इच्छा पाहता त्यांना मोदी-शहा जोडीने काहीशा अनिच्छेनेच निरोप दिल्याचे समजते. ते आता संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख म्हणून काम पाहतील.

केमिकल अभियांत्रिकीतील पदवीधर व माहिती-तंत्रज्ञानातील तज्ज्ञ असलेले संतोष त्याच आधारावर भाजपच्या विस्ताराची रूपरेषा तयार करण्याचे काम गेली काही वर्षे पडद्याआडून करत आहेत. त्यांच्याशिवाय सध्या भाजपमध्ये शिवप्रकाश, सतीश वेलणकर व सौदानसिंह हे आणखी तीन सह संघटनमंत्रीही आहेत. यातील वेलणकरांच्या नावाचीही चर्चा चालू होती. मात्र दक्षिणेतील राज्यांमध्ये बस्तान बसविण्यासाठी मोदी-शहा यांनी संतोष यांची निवड केल्याचे स्पष्ट आहे. 

संतोष हे मूळचे कर्नाटकचे (जि. शिमोगा) आहेत. मात्र तेथील वरिष्ठ भाजप नेते बी एस येदियुरप्पा यांचे व त्यांचे चांगले संबंध नाहीत अशीही माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com