लोकसभेतील 'हसवाहसवी'ची भाजपकडून गंभीर दखल

Priatm Munde and Raksha Khadase
Priatm Munde and Raksha Khadase

नवी दिल्ली : लोकसभेत खासदार डॉ. भारती पवार यांचे भाषण सुरू असताना सतारूढ भाजपच्याच खासदार प्रीतम मुंडे व रक्षा खडसे ज्या विचित्र पद्धतीने हसत होत्या, त्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पक्षनेतृत्वाने या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेतल्याचे समजले आहे. आगामी संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान या दोघींचे नाव न घेता, 'गंभीरपणे वर्तनाची अपेक्षा असलेल्या संसदीय सभागृहात आपण नेमके कशासाठी येतो?' असा तीव्र सवाल स्वपक्षीय खासदारांना विचारण्याचीही चिन्हे आहेत. 

याबाबत भाजप नेतृत्वाने डॉ. पवार यांच्याशी संपर्क साधून झाल्या प्रकारची माहिती घेतल्याचे कळते. त्यांनाही व्हिडीओ पाहिल्यावरच आपल्या भाषणावेळी मागे हे प्रकार चालू होते, असे समजले. मुंडे व महाजन या दोघींकडूनही झाल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे. हा प्रकार विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक पसरविला व आपल्या हसण्याचा उद्देश डॉ. पवार यांची चेष्टा करण्याचा नव्हता, असे दोघींचेही म्हणणे असले तरी बाकाच्या खाली लपून हसण्याइतके त्यावेळी सभागृहात काय घडले होते, असा प्रश्‍न भाजप नेत्यांना पडला आहे.

वर्षभरापूर्वी मोदी यांनी राज्यसभेत असेच अवेळी व विकट हास्य करणाऱ्या रेणुका चौधरी यांना थेट रामायण मालिकेतील राक्षशिणीची उपमा दिली होती. भाजप नेतृत्व ज्या घराणेशाही राजकारणाला उठताबसता शिव्या घालते, त्याच घराणेशाहीचे प्रतिनिधीत्व या दोघीही करतात असे सांगितले जाते. 

येत्या मंगळवारी (ता. 23) भाजप संसदीय पक्षाची बैठक आहे. या अधिवेशनातील ही बहुधा अखेरची बैठक असेल. अधिवेशनाचा कालावधी वाढला, तर आणखी एक बैठक होऊ शकते. संसदीय बैठकीत पंतप्रधान भाजपच्या खासदारांना सातत्याने संसदेतील उपस्थिती व वर्तनाबाबत धडे देत असतात. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही नव्या खासदारांना 'संसद हॉलमध्ये चकाट्या पिटण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा ग्रंथालयात बसा' अशा स्वरूपाचा सल्ला नुकताच दिला होता.

यंदा लोकसभेने आतापावेतो या शतकातील विक्रमी कामकाज केले आहे. मात्र, जास्तीत जास्त खासदारांची उपस्थिती म्हणजे वाटेल तसे वागणे असे होत नाही, असे एका ज्येष्ठ पक्षनेत्याचे मत आहे. संसदेत भाजपचे खासदार अनेकदा जांभया देताना, हास्यविनोद करताना दिसतात. त्यामुळे संसदेत केवळ दैनिक दोन हजारांचा भत्ता व हजेरीसाठी हजेरी न लावता तुमचे वर्तनही योग्य ठेवा, असा संदेश पंतप्रधान खडसे व मुंडे यांचे नाव न घेता देऊ शकतात, असे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com