भाजपचा भरोसा मोदींवर; काँग्रेसचा राहुलवर 

Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra Modi

जयपूर : राजस्थानात यंदा सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात उत्साह असला, तरी सत्तारूढ भाजपनेही काही पत्ते राखून ठेवले आहेत. पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी या पक्षाने कंबर कसली आहे. 

मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या कारभाराविषयी नाराज असलेले मतदार यंदा कॉंग्रेसला संधी देण्याची शक्‍यता विविध अंदाजांतून व्यक्त झाली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राजस्थान शाखेच्या कारभारात लक्ष घातले असून, संघटानात्मक बदल सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचा मुख्य प्रचारक असल्यामुळे त्यांच्या सभांचेही आयोजन करण्यात आले आहे. मोदींच्या सभांनंतर वातावरण बदलण्याची भाजपला आशा आहे. मात्र, कॉंग्रेसनेही पुन्हा सत्तेवर येण्यासाठी डावपेच आखले आहेत. 

सरकारविषयीची नाराजी आणि परंपरागत मतदार होण्याच्या शक्‍यतेमुळे भाजपचे नेतृत्व धास्तावले आहे. यात फार बदल होण्याची शक्‍यता नसल्यामुळे आता भाजपचा भरोसा मोदींच्या सभांवरच आहे. मोदींच्या सभांना 23 नोव्हेंबरपासून अलवरमधून प्रारंभ होईल. 26 नोव्हेंबरला जयपूर आणि भिलवाडा, 27 नोव्हेंबरला नागौर आणि कोटा तर 28 नोव्हेंबरला डुंगरपूर आणि दौसामध्ये मोदींच्या सभा होतील. हनुमानगड, सिकर आणि जोधपूरमध्ये चार डिसेंबरला मोदींच्या सभा होणार आहेत. 

मोदींनंतर भाजपचा भरोसा आहे तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेवर. गोरखनाथ मठाचे मुख्य महंत असलेल्या योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव राजस्थानातही असून, या मठाचे अनुयायी राज्याच्या बहुतेक जिल्ह्यांत आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या किमान बारा सभा होणार आहेत. संघटना कौशल्याबद्दल प्रसिद्ध असलेले पक्षाध्यक्ष अमित शहा हेही मैदानात उतरले असून, त्यांनी मंडळ स्तरापासून बूथ स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या शिवाय केंद्रीय मंत्र्यांनाही प्रचारासाठी आणले जाणार आहे. 

सत्तेवर पुन्हा येण्यासाठी आसुसलेल्या कॉंग्रेसचा मुख्य आधार पक्षाध्यक्ष राहुल गांधी आहेत. निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच राहुल यांनी राजस्थानचे दौरे सुरू केले असून, गेल्या चार महिन्यांत सहा सभा घेतल्या आहेत. आता प्रत्यक्ष प्रचारात ते किमान बारा सभा घेणार असून, रोड शोही करणार आहेत. "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा दौराही होणार आहे. मात्र, त्या एकदाच येतील असे समजते. "राफेल' विमान व्यवहार आणि सीबीआय वादाच्या मुद्द्यांचा फायदा होण्याचीही कॉंग्रेसला आशा आहे. राज्य सरकारवर नाराज असलेल्या राजपूत समाजालाही आपल्याकडे वळविण्याचे कॉंग्रेसचे प्रयत्न आहेत. 

हार्दिक, जिग्नेश, अल्पेशवर भरोसा 
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला घाम फोडणाऱ्या हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर हेही कॉंग्रेसच्या भात्यातील बाण आहेत. गुजरातला लागून असलेल्या उदयपूर विभागात हार्दिक पटेल यांच्या प्रचाराचा फायदा होऊन पाटीदार आणि गुर्जर समाजाची मते आपल्याकडे वळतील असा कॉंग्रेसचा होरा आहे. मेवानी गेले तीन महिने दौरे करत असून, त्यांचा प्रभाव पडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com