पाकिस्तानला झटका, भारताच्या कुटनितीला यश

masood-azhar.
masood-azhar.

नवी दिल्ली - जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आज फ्रान्सचे पाठबळ मिळाले. फ्रान्स एक-दोन दिवसांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मसूदच्या विरोधातील ठराव मांडणार आहे. 

मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्याची संयुक्त राष्ट्र संघात ही चौथी वेळ आहे. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मसूद अजहर याच्याविरुद्ध ठराव मांडला जाण्याची गेल्या दहा वर्षांतील ही चौथी वेळ असेल. याआधी भारताने 2009 आणि 2016 मध्ये अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करून जैशे महंमदवर बंदी घालण्याची मागणी केली होती. जानेवारी 2016 मध्ये पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारही मसूद अजहरच होता. भारताच्या मागणीला 2016 मध्ये अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने पाठिंबा दर्शविला होता. 2017 मध्ये या तिन्ही देशांनी अशाच प्रकारचा आणखी एक प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात मांडला होता. मात्र, त्या वेळी चीनने नकाराधिकाराचा वापर केल्याने ठराव बारगळला होता. 

आता पुन्हा फ्रान्स इतर देशांच्या मदतीने मसूद अजहर विरोधातील ठराव मांडणार आहे. येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया केली जाईल, असे फ्रान्समधील सूत्रांनी सांगितले. 
फ्रान्सच्या अध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार फिलीप इटिएन्ने आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यात आज सकाळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दहशतवादाविरोधात दोन्ही देशांनी एकत्रितपणे राजनैतिक प्रयत्न करावेत, अशी इच्छाही फ्रान्सने या चर्चेवेळी व्यक्त केली. 

पाकिस्तानविरोधातही प्रस्ताव शक्‍य 
फ्रान्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा समावेश "ग्रे लिस्ट'मध्ये कायम ठेवण्याचा प्रस्तावही मांडण्यात येण्याची शक्‍यता आहे. सध्या पॅरिसमध्ये "फायनान्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्स'ची बैठक सुरू आहे. या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदतीच्या मुद्‌द्‌यावर जून 2018मध्ये पाकिस्तानला "ग्रे लिस्ट'मध्ये टाकण्यात आले होते. तसेच त्यांनी त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न केल्यास ऑक्‍टोबर 2019मध्ये त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्तावही पुढे येऊ शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com