सेतू पुरुष : प्रशांत शेटये

Manohar Parrikar
Manohar Parrikar

२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही झाले. 
- प्रशांत शेटये

मनोहर पर्रीकर हे ८० च्या दशकापासून गोव्याच्या राजकारणात सक्रीय होते. पण, १९९४ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राजकारणाच्या मुख्य प्रवाहात ते सामील झाले. १९९४ ते १९९९ पर्यंत प्रभावी विरोधी नेते म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीत ते सत्तास्थानी पोचले आणि २००० मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. ते मुख्यमंत्री बनल्यापासून म्हणजे २००० ते आजपर्यंतचा सुमारे १९ वर्षांचा कालखंड (यात पर्रीकर ९ वर्षे मुख्यमंत्री व अडीच वर्षे संरक्षणमंत्री) हा गोव्याच्या एकूणच विकासाच्यादृष्टीने व त्यातही पूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने सोनेरी ठरला आहे. 

गोव्याच्या विकासाचा पाया निश्‍चितच गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी घातला होता. गोव्याचे भाग्यविधाते म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर हे सर्वश्रूत आहे. मुक्तीनंतर बहुजनवादी मगो सरकार सत्तेत आले आणि मगोचे नेते भाऊसाहेब बांदोडकर यांनी गावोगावी व वाड्यावाड्यावर शाळा उभारून शिक्षण बहुजनांच्या दारापर्यंत नेले. पाण्याची ददात असणार नाही याची दक्षता घेत धरणे उभारली. बांदोडकरांच्या या द्रष्टेपणाचे सकारात्मक परिणाम आज गोव्यात दिसत आहेत. पुढे १९८७ साली कदंब महामंडळ स्थापन करून तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी गोव्यातील असंख्य गाव व विशेषतः दुर्गम भागातील गाव मुख्य शहरांना जोडले. टीका करणाऱ्यांच्या दृष्टीने कदंब महामंडळाची गाडी सरकारी पद्धतीने रडत-रखडत चाललेली असो, पण कदंब बससेवेमुळे गोव्यात मोठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्रांती घडली. ग्रामीण विद्यार्थी व नोकरदार व व्यावसायिकांना याचा मोठा लाभ मिळाला. त्याचे दृश्‍य परिणाम १९९० व त्या पुढच्या दशकात जाणवले. 

आयआयटीयन असलेले पर्रीकर यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर गोव्याच्या प्रगतीला जणू पंख लाभले. अभियंत्याचा ३६० अंशाचा दृष्टीकोन, उपजत बुद्धीमत्ता व अर्थकारणावर पकड लाभलेले पर्रीकर यांनी पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा सपाटाच गोव्यात सुरू केला आणि गोव्याचा चेहरामोहरा पूर्ण बदलून गेला. पर्रीकर यांना २००० ते २००५, २०१२ ते २०१४ व २०१७ ते २०१९ पर्यंत असे सुमारे नऊ वर्षे त्यांना मुख्यमंत्रिपद लाभले. २००१४ ते २०१७ पर्यंत अडीच वर्षे ते संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात होते. पण तरीही त्यांचा गोव्याच्या प्रशासनावर प्रभाव होता. 

मुख्यमंत्री म्हणून व सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून त्यांना लाभलेला साडेअकरा वर्षांचा हा काळ गोव्यासाठी महत्त्वाचा ठरला. पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत गोव्यात कितीतरी पूल झाले. आठवून पाहा. शापोरा नदीवरचा कोलवाळ पूल हा तुलनेने छोटा होता. पण, किती वर्षे या पुलाचे काम रेंगाळले होते. प्रवाशाना, वाहन चालकांना व पेडणेवासीयांना त्यामुळे बराच त्रास जाणवत होता. पर्रीकर यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत हा पूल बांधला. पेडणे तालुक्‍याला उर्वरीत गोव्याशी जोडणारा हा पहिलाच पूल होता. पण, पर्रीकर एवढ्यावरच थांबले नाहीत. शापोरा नदीवरच पीर्ण - वजरी पूल त्यांनी बांधला. या पुलाची अनेक वर्षांपासूनची मागणी पर्रीकर यांच्या हातून पूर्ण झाली. पुढे पेडणेवासीयांची आणखी मागणी पूर्ण करताना किरणपाणी - आरोंदा पूलही उभारण्यात आला. विकासाच्या बाबतीत मागच्या काही वर्षापर्यंत मागास राहिलेल्या पेडणे तालुक्‍यात आता पुलांचे भक्कम जाळे तयार झाले आहे. सध्या काम सुरू असलेल्या केरी-तेरेखोल पुलाचे नावही या यादीत जोडले गेले आहे. 

एक पेडणे तालुकाच नव्हे तर संपूर्ण गोव्यात पर्रीकर यांनी रस्ते व पुलांचे जाळे भक्कम केले. गोव्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगाव शहराच्या राणफोंड, खारेबांद व मुंगूल येथील जीर्ण पुलाच्या जागी नवीन पूल त्यांनी उभारले. खोर्जुवे येथील गोव्यातील पहिला केबल स्टेड पूल उभारला. हा पूल पर्यटकांचे आकर्षण ठरलाच, पण डिचोली तालक्‍यातील गावे म्हापसा व पणजीला जोडण्याचे महत्वाचे कामही या पुलाने केले. खांडोळा पुलाने डिचोली व सत्तरी तालुक्‍यातील गावांचे पणजी शहराशी असलेले अंतर कमी केले. तिसवाडीत कुंभारजुवे - गंवडळी पुलाची भर घालून तिसवाडीत पुलांच्या जाळ्याचा विस्तार त्यांनी केला. कुडचडे - सावर्डे येथील जीर्ण पुलाच्या जागी नवीन पूलही त्यांनीच उभारला. 

पणजी-फोंडा-बेळगाव महामार्गावर बाणस्तारी व खांडेपार येथे नवीन पूल बांधण्यात आले. सांगे तालुक्‍यातील दुर्गम भागांत व मुरगावमध्ये जासिंतो बेटाला जोडणारा पूल बांधण्याची कर्तबगारीही त्यांनी दाखवली. हे दोन्ही पूल बांधताना मतांच्या राजकीय लाभाचा विचार त्यांनी केला नाही हे विशेष. बार्देश तालुक्‍यातील कालवी पुलाची कहाणी तर वेगळीच आहे. या पुलास कारुण्याची किनार आहे. एका दुःखद घटनेमुळे या पुलाचे काम तातडीने त्यांनी हाती घेतले व पूर्ण केले. 

२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही झाले. हा केबल स्टेड पूल खऱ्या अर्थाने गोव्याचे भूषण ठरला आहे. राजधानी पणजी शहराच्या प्रवेशदारातच होणारी वाहतूक कोंडीची समस्या या पुलामुळे बऱ्याअंशी कमी होणार आहे. झुआरी नदीवरील दुसरा पूलही गोव्याचे आकर्षण ठरणार आहे. गालजीबाग, तळपण व झुआरी पूल पूर्ण झाल्यानंतर पत्रादेवी ते पोळे असा गोव्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच प्रवास जलद व सुकर होणार आहे. याच पुलांचा नव्हे तर एकूण सर्व पुलांचा लाभ गोव्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान असलेल्या पर्यटन व्यवसायास मिळणार आहे.  पर्रीकर यांचा गोव्याच्या राजकीय क्षितिजावर उदय झाल्यानंतर रस्ते, पूल, शाळा व सरकारी इमारती धडाधड उभ्या राहू लागल्या. त्यामुळे गोव्याचा नूर पालटून गेला. रस्ते व पुलांना राज्याच्या आर्थिक, समाजिक, शैक्षणिक विकासात खास स्थान आहे हे त्यांना उमगले होते. गोव्यासाठी भूषण ठरलेला अटल सेतुच्या उद्घाटनप्रसंगी पर्रीकर यांनी आपल्या मनोगतात पूल व रस्त्याचे महत्त्व त्यांनी विषद केले. यावेळी बोलताना त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनडी यांचे विधान उधृत केले होते. ‘अमेरिका संपन्न देश आहे. कारण रस्त्यांबाबत हा देश संपन्न आहे, हे केनडी यांचे विधान माझ्या कानात व मनात गुंजत होते. म्हणूनच मुख्यमंत्री बनल्यानंतर मी रस्ते व पुलांना प्राधान्य दिले ‘अशा शब्दांत त्यांनी पूल व रस्त्यांबाबतची आपली भावना व्यक्त केली होती. गोव्यात पुलांचे भक्कम जाळे विणून गोव्यात आर्थिक, सामाजिक विकासाच्या वाटा पर्रीकर यांनी खुल्या केल्या. या कर्तबगारीमुळे ते गोव्याचे सेतुपुरुष  ठरतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com