गौरी लंकेश हत्या प्रकरणः शरद कळसकर होता बेळगावात

गौरी लंकेश हत्या प्रकरणः शरद कळसकर होता बेळगावात

बेळगाव - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी आधी महाराष्ट्र एटीएसने व नंतर सीबीआयने अटक केलेल्या शरद कळसकरचे नाव आता डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या दोघांच्याही हत्येत प्रमुख संशयित म्हणून पुढे आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या घडल्याच्या काळात म्हणजेच २०१५ व २०१७ या दरम्यान तो बेळगावात वास्तव्यास होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

लंकेश हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या बेळगावच्या भरत कुरणेने शरदला येथे घर भाड्याने घेण्यास मदत केली होती, असे कर्नाटकाच्या विशेष तपास पथकाच्या तपासात पुढे आले आहे. बेळगावातील वास्तव्यात शरदने येथे लेथ मशीन वर्कशॉप घातले होते. या वर्कशॉपमध्ये त्याने आपल्या लोकांसाठी किमान पाच गावठी पिस्तुले आणि सुटे भाग बनवले होते. ही सर्व पिस्तुले आणि सुटे भाग महाराष्ट्र एटीएसने ऑगस्ट महिन्यात जप्त केले आहेत. अमोल काळे याने विचारवंतांच्या हत्यांचा कट रचला होता. त्याला या पिस्तुलातील एक पिस्तूल लंकेश यांच्या हत्येसाठी वापरायचे होते. या पिस्तुलांची चाचणी भरत कुरणेच्या फार्म हाऊसवर कळसकरने घेतली. 

मात्र यापैकी एकही चांगल्या स्थितीत नसल्याने याआधी हत्येसाठी वापरलेले पिस्तुलच दोन हत्यांसाठी वापरण्यात आले अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

गुप्तचर खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या टोळीसाठी बेळगाव हा चांगला तळ बनला होता. त्यामुळेच कलबुर्गी आणि लंकेश हत्यांत कळसकरचा सहभाग नाकारता येत नाही. केवळ पिस्तुलाच्या बाबतीतच नव्हे तर चारही हत्यांमध्ये बरेच साम्य आहे. गुन्हेगारांची कार्यपद्धती, त्यांनी रचलेले कट आणि वापरलेली वाहने. लंकेश हत्येप्रमाणेच कलबुर्गी यांच्या हत्येसाठीही दोन वाहने वापरण्यात आली असावीत, असा संशय आम्हाला आहे असे या अधिकाऱ्याने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com