मोदींनी ट्रम्प यांना निमंत्रण दिलेले नाही; सरकारचा खुलासा

jayshankar
jayshankar

नवी दिल्ली : काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचे कोणताही प्रस्ताव किंवा निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेले नाही असा खुलासा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत केला. मात्र संतप्त विरोधकांचे समाधान न झाल्याने वरिष्ठ सभागृहाचे कामकाज पूर्वार्धात पुन्हा ठप्प पडले. या मुद्यावर मोदींनीच सभागृहात येऊन खुलासा करावा या मागणीवर विरोधक ठाम आहेत. मात्र संसदेतच असलेल्या पंतप्रधानांनी ती दुपारपर्यंत तरी मान्य केल्याचे दिसले नाही. 

भारताने ट्रम्प यांचे ताजे भडक विधान संपूर्णपणे फेटाळताना काल रात्री (ता. 22) खोटारडा अशी संभावना केली होती. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी प्रथम राज्यसभेत व नंतर लोकसभेतही ट्रम्प यांचा दावा फेटाळला पण विरोधी पक्षांचे समाधान झालेले नाही व मोदी असे बोलले नसतीलच यावरही त्यांचा विश्वास बसलेला नाही.

सिमला करार व लाहोर जाहीरनामा यानुसार काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेनेच सोडवावा व कोणत्याही तिसऱया देशाला नाक खुपसू देऊ नये असे भारत व पाकने निःसंदिग्धपणे ठरविलेले असताना पंतप्रधआन परस्पर अमेरिकेच्या अध्यक्षांना असे आवतण कसे देऊ शकतात असे संतप्त विरोधकांनी विचारले. जयशंकर यांच्या खुलाशानंतर समाधान न झालेल्या विरोधी पक्षनेत्यांनी सकाळी साडेअकरा वाजता संसदेच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधून संताप व्यक्त केला. ट्रम्प यांनी विदेशमंत्र्यांचे नाव घेतले नसून पंतप्रधानांचे नाव घेतले आहे, तेव्हा मोदी यांनीच संसदेसमोर येऊन त्यांच्यात व ट्रम्पमध्ये नेमकी काय चर्चा झाली व कोणी काय आमंत्रण दिले याचा खुलासा करावा. यावर विरोधक एकजुटीने ठाम आहेत. राज्यसभेत विरोधकांचे बहुमत आहे.

इतक्या संवेदनशील मुद्यावर अमेरिकेच्या राष्ट्रपतींना भलताच प्रस्ताव देऊन वरून त्यावर संसदेला सामोरे जाण्याचीही त्यांची तयारी नसणे हे धक्कादायक असल्याचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी नमूद केले. भारत-पाकमधील संबंधांच्या पाशर्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत येऊन खुलासा करावा असे सांगताना विरोधी नेत्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी खोटे बोलत नाहीत. पण ट्रम्प यांचे विधान साऱया जगाने पाहिले आहे. असा प्रस्ताव हा भारताची भूमिका तसेच एकता-अखंडतेवर आघात आहे व भारताच्या परराष्ट्रल धोरणातील इतका मोठा बदल करताना मोदींना संसदेला विश्वासात घ्यावेसे वाटले नाही हे दुर्देव आहे.

जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, ओसाका येथे पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचे आश्वासन अजिबात दिलेले नाही. ट्रम्प यांचे ते विधान सत्यापासून फारच दूर (म्हणजे खोटारडेपणाचे) आहे. काश्मीर प्रश्नी भारत सरकारचा दृष्टीकोन स्वच्छ आहे व तो कायम आहे की हा प्रश्न लाहोर व सिमला करारांनुसार दोन देशांतच वाटाघाटींद्वारे सोडवावा लागेल.

विश्वास कोणावर...
आनंद शर्मा व डी. राजा यांनी पंतप्रधानांकडूनच खुलासा व्हावा असा आग्रह धरला. राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी या गोंधळावर संतप्तपणे सांगितले की तुम्हाला (विरोधकांना) आपल्या सरकारवर विश्वास नाही व विदेशातील नेत्यावर विश्वास आहे काय...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com