केरळमध्ये राजकीय संघर्षाला धार

केरळमध्ये राजकीय संघर्षाला धार

कन्नूर/तिरुअनंतपुरम- शबरीमला मंदिरात दोन महिलांच्या प्रवेशानंतर बुधवारपासून (ता. 2) केरळमध्ये हिंसाचार भडका उडाला. महिला प्रवेशविरोधी आंदोलनात राजकीय पक्ष व संघटना उतरल्याने आज चौथ्या दिवशी त्याची तीव्रता आणखी वाढली आहे. उत्तर केरळमधील कन्नूर जिल्ह्यात भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरोधात सत्ताधारी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, असे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. या पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांची घरे व दुकानांवर हल्ले करण्यात आले.

"माकप'चे आमदार ए. एन. शमसीर यांचे मडपीडीकाईल येथील घर, भाजपचे नेते व राज्यसभा सदस्य व्ही. मुरलीधरन यांचे वडियिल पीडिकीया येथील व "माकप'चे माजी कन्नूर जिल्हा चिटणीस पी. सासी यांचे थलासेरी येथील घरावर काल रात्री गावठी बॉंबहल्ला करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. पेरुबंरा येथील माकपच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला, तर आरएसएसचे नेते के. चंद्रशेखरन यांना मारहाण करण्यात आली. परियाराम येथील आरएसएसचे कार्यालय आज सकाळी जाळण्यात आले.

या हल्ल्यांमुळे जनजीवन विस्कळित झाले असून, संवेनशील असलेल्या या जिल्ह्यात एक वर्षाने पुन्हा राजकीय हिंसाचाराचे दर्शन झाले. कन्नूरप्रमाणेच कोझिकोड, पाटणमटिट्टामधील मल्लपुरम आणि अदूर येथेही असेच हल्ले व तोडफोडीच्या घटना काल रात्री व आज सकाळी घडल्या.

शबरीमला प्रकरणावरून केरळमधील हिंसक कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक लोकनाथ बेहेरा यांनी राज्यात दक्षतेचा इशारा दिला आहे. पक्षनेत्यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. कन्नूरमधील हिंसाचारप्रकरणी गेल्या दोन दिवसांत 260 जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात गस्त व छाप्यांचे प्रमाण वाढविले आहे. थलासेरी येथे आज पोलिसांनी संचलन केले.

केरळमध्ये दंगली घडवून आणण्याचा आरएसएसचा प्रयत्न असून, शांतता चर्चाही त्यांनी उधळून लावली. भाजप व आरएसएसच्या ताब्यातील मंदिरे व शैक्षणिक संस्थांचा वापर ते शस्त्रागारासारखा करीत आहेत. हिंसाग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी पक्ष पुढाकार घेईल. -कोडीयरी बालकृष्णन, राज्य चिटणीस, माकप 

 संघ परिवाराने राज्यातील हिंसाचार थांबवावा. शांततेसाठी डावे पक्ष प्रयत्न करीत आहेत. -पी. जयराजन, कन्नूर जिल्हा चिटणीस, माकप 

शबरीमला मंदिरातील प्रवेशाच्या वादावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी माकप हिंसाचाराच्या घटना जाणीवपूर्वक घडवून आणीत आहे. वडियिल पीडिकीया येथील माझे वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्यात आला. त्या वेळी घरात माझी बहीण, मेव्हणे व त्यांची मुलगी होती. पण, सुदैवाने सर्व सुखरूप आहेत. -व्ही. मुरलीधरन, खासदार, भाजप 

शुद्धीकरण करणारे पुजारी "ब्राह्मण राक्षस' ः सुधाकरन 
मासिक पाळी येण्याच्या वयातील दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराचे शुद्धीकरण करणारे पुजारी "ब्राह्मण राक्षस' आहेत, अशी टीका केरळचे सार्वजनिक बांधकाममंत्री व मार्क्‍सवादी कम्यनिस्ट पक्षाचे नेते जी. सुधाकरन यांनी शनिवारी केली. 

कनकदुर्गा (वय 44) व बिंदू (वय 42) यांनी मंगळवारी (ता.1) मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून अय्यप्पा देवाचे दर्शन घेतले. या ऐतिहासिक घटनेने मंदिराची शेकडे वर्षांची परंपरा मोडीत निघाल्याने पुजारी कंदरू राजीवरू यांनी शुद्धीकरणासाठी मंदिर बंद केले. या घटनेवरून सुधाकरन यांनी पुजाऱ्याला लक्ष्य केले. "जी व्यक्ती स्वतःच्या बहिणीला अपवित्र समजते, ती मानव असू शकेल काय, असा प्रश्‍न त्यांनी केला. "हा पुजारी "जातीयवादी राक्षसाचे प्रतीक आहे. तो ब्राह्मण नाही तर "ब्राह्मण राक्षस' आहे. तो भयानक असू शकतो,' अशा शब्दांत त्यांनी राजीवरू यांच्यावर हल्ला चढवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com