सरकार वाचवण्यासाठी कर्नाटकात काँग्रेसपुढे 'हा' प्रस्ताव 

सरकार वाचवण्यासाठी कर्नाटकात काँग्रेसपुढे 'हा' प्रस्ताव 

बंगळूर - राज्यातील राजकीय पेच दिवसेंदिवस किचकट बनत असतानाच सरकार वाचविण्यासाठी युती सर्व पर्यायावर विचार करीत आहे. याचाच एक भाग म्हणून धजदने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी रविवारी (ता. 21) या वृत्ताला दुजोरा दिला. दुसरीकडे असंतुष्टांनी आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट करुन राजीनामा परत घेणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. 

युती सरकार वाचविण्यासाठी व काँग्रेसबरोबरची मैत्री कायम ठेवण्यासाठी धजदच्या नेत्यांची कोणत्याही त्यागाची तयारी असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, मुंबईला गेलेल्या आमदारांचे मनपरिवर्तन करण्यात आम्हाला यश येईल, यावर माझा अजूनही विश्वास आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात निश्‍चितपणे यशस्वी होतील. धजदने कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, हे खरे आहे. सिध्दरामय्या यांच्यासह कुणीही मुख्यमंत्री झाला तरी त्याला आमचा विरोध नसेल. मला व परमेश्वर यांनाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली आहे. परंतु, सध्या युती सरकार वाचविण्यास आमचे प्रथम प्राधान्य आहे. सोमवारी काय घडते, हे पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

धजदकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर येताच कॉंग्रेसमधील हालचाली वाढल्या आहेत. रविवारी रात्री ताज विवांतामध्ये या विषयावर कॉंग्रेस आमदारांची बैठक होणार असल्याचे समजते. शुक्रवारी अधिवेशन संपल्यानंतर काही आमदार आपापल्या मतदारसंघात परत गेले आहेत. त्या सर्वाना परत येण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

धजदच्या ऑफरमुळे असंतुष्ट आमदारांना परत आणण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी निकटवर्तीय आमदार जमीर अहमद खान व जमीर अहमद यांच्यासोबत अज्ञातस्थळी जाऊन हालचाली सुरु केल्याचे समजते. धजद असहाय्य अवस्थेत असून कॉंग्रेसमध्ये नवा उत्साह संचारला आहे. मात्र, कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन अंतर्गत चढाओढ सुरु झाल्याचे दिसत आहे. 

बंगळूरला परतणार नाही 
मुख्यमंत्री कुणीही झाले तरी राजीनामा परत घेणार नसल्याचे सांगून असंतुष्ट आमदारांनी सध्या बंगळूरला परत येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईत रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. धजदचे एच विश्वनाथ म्हणाले, आमच्या धोरणात मुळीच बदल झालेला नाही. मुख्यमंत्री कुणीही झाले तरी आम्ही राजीनामा परत घेणार नाही. एमटीबी नागराज यांनी सिधादरामय्यांसह कुणीही आमच्याशी संपर्क साधला नसल्याचे सांगून संपर्क साधला तरी त्यांच्याशी चर्चाही करणार नाही. आम्ही सर्वजण एक आहोत असे सांगून आपल्यात मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com