पुन्हा स्वाइन फ्लू, डेंग्यू...

पुन्हा स्वाइन फ्लू, डेंग्यू...

जरासे कमी झालेले स्वाइन फ्लू , डेंग्यू वगैरे विकार सध्या पुन्हा एकदा डोके वर काढत आहेत. जेव्हा वातावरण सर्वच अंगांनी दूषित होते तेव्हा असे रोग वाढतात असा स्पष्ट उल्लेख आयुर्वेदात आहे. 

साथीचे विकार किंवा वातावरण, अन्न वगैरे दूषित झाल्यामुळे होणारे विकार अत्यंत अवघड असतात, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. साधा एक साथीचा विकार म्हणजे सर्दी-पडसे. हा छोटासा विकार पुढे न्यूमोनियापर्यंत जाऊ नये म्हणून पहिल्यापासूनच काळजी घ्यायची असते. पण हा विकार एकट्याने भोगण्याचा आहे असे समजून जर शिंकताना नाकावर रुमाल धरला, इकडे तिकडे थुंकी टाकली नाही किंवा स्वतःचे कपडे वेगळे ठेवले तर हा विकार एकट्याने सहन करण्यासारखा आहे, त्यात इतरांची ‘साथ’ मिळविण्याची गरज नाही. अनेक जण एका वाहनातून प्रवास करत असताना एखाद्याला सर्दी झालेली असली तर त्याने योग्य काळजी घेणे, अशा व्यक्‍तीने रुमालावर निलगिरीचे थेंब टाकणे आवश्‍यक असते. जेणेकरून इतरांना सर्दीचा संसर्ग होणार नाही. अशा प्रकारे एकूण सर्वच साथीचे विकार पसरू नेत यासाठी खूप काळजी घेणे आवश्‍यक असते.

साथीच्या विकारात वारंवार अनुभवायला मिळणारा विकार आहे इन्फ्ल्यूएंझा. हवेत जेव्हा बदल होतो तेव्हा याचे विषाणू तयार होऊन साथ पसरवितात. हे विषाणू अनेकांना अंथरुणावर झोपवूनच परत जातात. सर्वसाधारणपणे यावर इलाज करणे सोपे असते. परंतु त्याच्यातही मेंदूचा ज्वर येऊन माणसे दगावणे वगैरे घातक प्रकार आहेत. 

प्लेग, कॉलरा, बर्ड फ्लू वगैरे साथीच्या विकारांना संपूर्ण मानवजात घाबरते. या रोगांचा प्रसार फार झपाट्याने होते, यावर इलाज करणे अवघड असतात, तसेच या विकारांमध्ये मनुष्य दगावू शकतो. एखाद्या गावात हा रोग असा काही पसरतो की, या गावातील डॉक्‍टराला सुद्धा लागण झाल्याने इलाज करणारा कोणीच मिळत नाही.

हे साथीचे रोग सुरू होण्यात माणसांची भरपूर चूक असते. पाणी स्वच्छ न ठेवणे, तलाव, विहीर वगैरेंचे पाणी दूषित करणे, जमिनीखालचे पाण्याचे मोठे नळ फुटून त्यात आजूबाजूला असलेल्या गटाराचे पाणी मिसळणे, अशा माणसाच्या चुकीमुळे खूप रोग साथीने येतात व अनेकांचे बळी साथीने घेऊन परत जातात. 

अर्थात हे सर्व टाळण्यासाठी लोकशिक्षण आवश्‍यक असते. तसेच छोट्या छोट्या भूप्रदेशांचे रक्षण करणेही आवश्‍यक असते. श्री साईबाबांच्या काळची गोष्ट निदान महाराष्ट्रातील सर्वांनाच माहीत आहे. श्री साईबाबा शिर्डीत असताना पटकीची साथ येणार असा रंग दिसला असता, श्री साईबाबांनी स्वतः दळून शिर्डीभोवती पिठाची रेषा आखून रोगाला आत यायला अटकाव केला. अशा कथांमधून एक गोष्ट नक्की समजते की, साथीच्या रोगाच्या वेळी सर्वांनीच स्वतःची व एका विशिष्ट भूप्रदेशाची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक असते, यातून कुणाचीच सुटका नसते, मग तो यती असो, संन्यासी असो, कुणी सामान्य असो किंवा श्री साईबाबांसारखे अवतारी पुरुष असो. सर्वांनाच साथीच्या रोगाशी लढत द्यायला तयार व्हावे लागते. 

धुरी करणे, साधा धूप नव्हे तर विशिष्ट वनस्पतींपासून बनविलेले धूप जाळणे, हा साथीच्या रोगांना आटोक्‍यात ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. पूर्वीच्या काळी होणाऱ्या यज्ञयागादी क्रियांच्या पाठीमागे साथीचे रोग पसरू नयेत असा हेतू असावा. त्यामुळे यज्ञयागादी क्रिया समाजहितासाठी आहेत असे म्हटले जात असे. 

त्याचप्रमाणे जे जंतू साथीच्या रोगास कारणीभूत असतात, ते अनाकलनीय वा सूक्ष्मदर्शकाखालीही दिसू न शकणारे असतील तर त्यांना ग्रहचिकित्सा या सदरात टाकले आहे, त्यांना आयुर्वेदाने ‘पिशाच’ असे नाव दिलेले आहे व यांची खूप काळजी घ्यावी लागते असे सांगितलेली आहे. या सर्व पिशाचांचे स्थान घाणीत असल्याने त्यांच्यापासून दूर राहण्यास स्वच्छता पाळणे अत्यावश्‍यक ठरते. म्हणून साथीच्या रोगांना टाळण्यासाठी स्वच्छता बाळगणे खूप आवश्‍यक असते. 

सर्वसाधारणपणे दिवाळी-दसऱ्याच्या सुमाराला वर्षातून एकदा घर साफ केले जाते, रंगरंगोटी केली जाते, घरात नवे पडदे नवे फर्निचर वगैरे केले जाते. परंतु दर पंधरा दिवसांनी, जमलेच तर आठवड्याने, घरातील सर्व जळमटे काढून घरातली प्रत्येक कोपरा साफ करणे, संडास-बाथरूम विशेष करून स्वच्छ करणे आवश्‍यक असते. बाहेरच्या चार लोकांची ऊठ-बस ज्या ठिकाणी असते अशा ठिकाणी तर विशेष लक्ष देऊन साफ-सफाई करणे आवश्‍यक असते, कचरा इकडे तिकडे न फेकणे किंवा शहरात टाकलेला कचरा वेळेवर उचलून जाळणे हे सर्व निगुतीने केले तर साथीच्या रोगांना आळा बसतो. कचऱ्याचे ढीग गावाबाहेर टाकले जात असल्याने तेथे जंतुसंसर्ग तयार होऊन गावात येत असतील तर गावाभोवती जंतूंना प्रतिबंध करणारी पावडर वगैरे टाकणे, शिर्डीच्या श्री साईबाबांनी ओढलेली ‘रेघ’ याबाबतीत आदर्श समजायला हरकत नाही. तेव्हा एकूण शहरातील कचरा शहरापासून दूर नेऊन त्याची पूर्ण विल्हेवाट लागणे खूपच आवश्‍यक आहे. सांडपाणी व साठलेली पाण्याची डबकी हे तर साथीच्या रोगांचे माहेरघर असते, तेव्हा त्याची नीट व्यवस्था करणे आवश्‍यक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com