अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

Balaji-Tambe
Balaji-Tambe

शुक्र यथाव्यवस्थित राहण्यासाठी शुक्ररक्षण महत्त्वाचे असते, तसेच शुक्रपोषक आहार-रसायनांचे सेवन करणेही महत्त्वाचे असते. ब्रह्मचर्याचे पालन करताना या सर्व गोष्टी ध्यानात ठेवल्या,तर त्यामुळे दीर्घायुष्याचा लाभ होऊ शकतो. 

चरकसंहितेतील अग्र्यसंग्रहाची माहिती आपण घेतो आहोत. काल-बुद्धी व इंद्रिय यांचा मिथ्यायोग सर्व रोगांचे कारण असतो हे आपण पाहिले. आता यापुढचा भाग पाहू या.

रजस्वलाभिगमन्‌ अलक्ष्मीकराणाम्‌ - स्त्री रजस्वला असताना समागम करणे हे दुर्भाग्याला कारण ठरते, म्हणजे पैशाच्या व आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारक असते. भाग्याची निश्‍चित व्याख्या करता येत नसल्याने हे सूत्र समजणे अवघड असले, तरी स्त्रीसाठी या काळात विश्रांती आवश्‍यक असल्याने तिला शारीरिक, मानसिक पातळीवर उत्कंठा निर्माण होऊ नये हा उद्देश तरी लक्षात येऊ शकेल. 

ब्रह्मचर्य आयुष्यकराणाम्‌ - आयुष्य वाढविणाऱ्या कारणांमध्ये ब्रह्मचर्य हे सर्वांत मोठे कारण होय. 

ब्रह्मचर्य हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणजे शरीराची व मेंदूची विशेष काळजी घेणे, शुक्रसंवर्धन करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवणे आणि अत्यल्प मैथुन करणे. मनःशांती, आध्यात्मिक उन्नती या प्रकारची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ब्रह्मचर्य व्रत घेता येते, परंतु हे अतिशय कठीण समजले जाते. तर वैवाहिक ब्रह्मचर्य म्हणजे गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यावर नियमांचे उल्लंघन न करता वैवाहिक जीवन जगणे. आयुर्वेदाला अपेक्षित असणारे ब्रह्मचर्य हे या प्रकारचे वैवाहिक ब्रह्मचर्य होय. 

वैवाहिक ब्रह्मचर्याचे आयुर्वेदाने सांगितलेले काही महत्त्वाचे नियम याप्रमाणे, 
  शरीरधातू अशक्‍त झाले असताना मैथुन करू नये.
  वाताच्या काळात म्हणजे सकाळी वा संध्याकाळी मैथुन करू नये.
  भूक वा तहान लागली असता मैथुन करू नये.
  इच्छा नसताना मैथुन करू नये.
  रजःस्वला स्त्रीने मैथुन करू नये.
  अप्रिय, निंदित आचरण असलेल्या स्त्रीबरोबर किंवा पुरुषाबरोबर मैथुन करू नये.
  पुरुषापेक्षा स्त्री वयाने मोठी असणे हेही मैथुनासाठी योग्य नाही. 
  परस्त्री वा परपुरुषाबरोबर मैथुन करू नये.
- सार्वजनिक ठिकाणी, अनोळखी ठिकाणी किंवा गुरू, देवता यांच्या निवासस्थानी मैथुन करू नये.
वैवाहिक जीवनामध्ये मैथुनाचे स्थान महत्त्वाचे असते, पण त्याचे प्रमाण योग्य असणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. आयुर्वेदात उभयतांची प्रकृती व ऋतू यांच्या समन्वयाने हे प्रमाण ठरविण्यास सांगितले आहे. 
विश्रब्धदृष्टो रहसि तत्कामस्तरुणः पुमान्‌।
समस्थिताः सुरभिमुक्‍तमूत्रादिरव्यथः ।।
...अष्टांगसंग्रह
जितक्‍या मैथुनाने मन व शरीर स्थिर राहील तितक्‍या प्रमाणातच मैथुन करावे.

वैवाहिक ब्रह्मचर्यामध्ये ‘ब्रह्मचर्य’ हा शब्द वापरला आहे, कारण त्यामध्ये ‘शुक्राचे रक्षण’ करण्याला महत्त्व दिलेले आहे. आयुर्वेदात ब्रह्मचर्य, मैथुन वगैरे विषयांची माहिती ज्या अध्यायात दिली त्याच अध्यायात शुक्रधातूचे महत्त्वही पटवून दिलेले सापडते. 
कायस्य तेजः परमं हि शुक्रमाहारसारादपि सारभूतम्‌ ।
जितात्मना तत्परिरक्षणीयं ततो वपुः सन्ततिरप्युदारा ।।
...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
आहाराचे सार असणारा शुक्रधातू हेच शरीरातील परमश्रेष्ठ तेज आहे म्हणून संयमी बनून शुक्रधातूचे रक्षण करावे, कारण शुक्राच्या बळावरच शरीर उत्कृष्ट, निरोगी राहते आणि भावी संततीही संपन्न अशी जन्माला येते. 
शुक्रधातूचे सर्वतोपरी रक्षण म्हणजे ब्रह्मचर्य, हा ब्रह्मचर्याचा खरा अर्थ यातून स्पष्ट होतो. श्रीरामभक्‍त हनुमान, समर्थ श्री रामदास ब्रह्मचारी म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांच्या शरीरसंपदेबद्दल, समर्थ शरीराबद्दलही नावाजलेले आहेत. ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या योगी, संतजनाच्या चेहऱ्यावरची तेजस्विताही हेच प्रतिपादन करते.

शुक्ररक्षण होण्यासाठी फक्‍त मैथुन संयमित ठेवणेच पुरेसे आहे असे नाही, तर सातत्याने मैथुनाची कल्पना करणे, हस्तमैथुन यातूनही शुक्रधातूचा ऱ्हास होणे शक्‍य असते. मैथुनसमयी शरीरातून उत्सर्जित होणारे वीर्य हे शुक्रधातूचे दृश्‍य स्वरूप असले तरी तो संपूर्ण शरीराला व्यापून असतो. हृदय, मेंदू वगैरे महत्त्वाच्या अवयवांचे कार्य परिपूर्णतेने होण्यासाठी शुक्रधातूची आवश्‍यकता असते. एकूणच उत्साह, जोश, शरीराचे नवचैतन्य व्यवस्थित राहण्यासाठी शुक्रधातूची मोठी आवश्‍यकता असते. अतिमैथुन किंवा इतर कोणत्याही कारणाने शुक्रक्षय झाला तर त्यातून अनेक शारीरिक-मानसिक व अवघड विकार होऊ शकतात. 

संपन्न अपत्याची इच्छा असणाऱ्या पुरुषाने पंचविसाव्या वर्षी विवाह करावा, म्हणजेच पंचविसाव्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करून मग गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा, असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. अकाली वयात मैथुन, शुक्राचा नाश संपूर्णतः निषिद्ध समजला जातो, हे पुढील सूत्रावरून स्पष्ट होते. 

अतिबालो ह्यसंपूर्णसर्वधातुः स्त्रियं व्रजन्‌ ।
उपशुष्येत सहसा तडागमिव काजलम्‌ ।।
...चरक चिकित्सास्थान
लहान वयात जोपर्यंत शरीरधातू पूर्णपणे तयार झालेले नसतात तेव्हा शुक्रऱ्हास झाला तर, तो मनुष्य कमी पाणी असलेला तलाव जसा शुष्क होईल तसा सुकून जाईल, अर्थात त्याची शक्‍ती क्षीण होईल. 

शुक्र यथाव्यवस्थित राहण्यासाठी शुक्ररक्षण महत्त्वाचे असते, तसेच शुक्रपोषक आहार-रसायनांचे सेवन करणेही महत्त्वाचे असते. ब्रह्मचर्याचे पालन करताना या सर्व गोष्टी ध्यानात ठेवल्या तर त्यामुळे दीर्घायुष्याचा लाभ होऊ शकतो. अग्र्यसंग्रहातील यापुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यात पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com