अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) प्रमेह - कायमचा मागे लागणारा रोग

Doctor
Doctor

धातूंचे यथायोग्य पोषण करण्यासाठी कार्यक्षम असणारी पचन व्यवस्था मंद झाल्याने धातूंच्या शिथिलतेत अजूनच भर पडते व शिथिलतेच्या मागोमाग अशक्‍तता येते. शरीरशुद्धी व धातूंना पुनर्जीवन देण्यासाठी रसायन सेवन हे महत्त्वाचे असते.

आयुर्वेद हा ज्ञानाच्या विशाल सागराप्रमाणे आहे. त्यातील महत्त्वाच्या आणि अतिशय नेमकेपणाने सांगता येणाऱ्या गोष्टींचा संग्रह म्हणजे अग्र्यसंग्रह. अग्र्यसंग्रहाचा नीट अभ्यास असला तर आयुर्वेदाचे मर्म समजणे फार सोपे होते. मागच्या वेळी आपण रोगसमूह घेऊन येणाऱ्या रोगांमध्ये क्षयरोग अग्रणी असतो हे पाहिले. आता या पुढचा विषय पाहू. 

प्रमेहोऽनुषणिाम्‌ - कायम लक्ष द्याव्या लागणाऱ्या रोगांमध्ये प्रमेह हा अग्रणी होय.

मधुमेह हा प्रमेहाचा एक प्रकार. त्यातही प्रमेहातील वातज प्रकारांपैकी मधुमेह हा एक प्रकार असतो. औषधोपचारांच्या मदतीने मधुमेह सहसा नियंत्रणात ठेवता येतो, पण पूर्ण बरा होणे तितकेसे सोपे नसते. याचे कारण प्रमेहाच्या संप्राप्तीमध्ये सापडते.

प्रमेह कसा होतो हे सांगताना ‘कफ सपित्तः पवनश्‍च दोषाः’ असा उल्लेख केलेला सापडतो. अर्थात प्रमेह होण्यामागे तिन्ही दोष कारणीभूत असतात, त्यातही कफदोष अग्रणी असतो. चरकसंहितेत या कफदोषाचे स्वरूप अजून स्पष्ट केलेले आहे, ते म्हणजे ‘बहु द्रवः श्‍लेष्मा दोषविशेषः’ म्हणजे द्रव गुणाने वाढलेल्या कफदोषामुळे प्रमेह होतो. 

प्रमेह होण्याची आयुर्वेदाने सांगितलेली कारणे पाहिली तर ती सर्व कफदोष वाढविणारी आहेत हे लक्षात येते. 

दिवास्वप्नाव्यायामालस्यप्रसक्‍तं शीतास्निग्धमधुरमेद्य द्रवान्नपानसेविनं पुरुषं जानीयात्‌ प्रमेही भविष्यतीति ।।
...सुश्रुत निदानस्थान
दिवसा झोपणे, व्यायाम न करणे, आळस करणे, सातत्याने बैठे काम करणे, मेद वाढविणारे व चरबीयुक्‍त मिठायांनी युक्‍त आहार करणे, अति प्रमाणात द्रवाहार घेणे, विशेषतः दही, नवे धान्य, नवा गूळ व त्यापासून बनविलेले पदार्थ यांचा रोजच्या आहारात किंवा अति प्रमाणात समावेश असणे वगैरेंमुळे शरीरातील द्रवगुण वाढतो, द्रवगुणयुक्‍त कफदोष वाढतो अर्थात त्यामुळे शरीराचे दृढत्व कमी होते, सर्व शरीरधातू अतिरिक्‍त ओलाव्यामुळे शिथिल व सैल झाल्यासारखे होतात, द्रवगुण वाढल्याने अग्नी मंद होतो, मुख्य जाठराग्नी मंद झाला की हळूहळू क्रमाक्रमाने बाकीचे धात्वग्नी मंद होतात, शरीरातील रस-रक्‍त-मांसादी धातूंना क्रमशः परिवर्तित करणारी, धातूंचे यथायोग्य पोषण करण्यासाठी कार्यक्षम असणारी पचनव्यवस्था मंद झाल्याने धातूंच्या शिथिलतेत अजूनच भर पडते व शिथिलतेच्या मागोमाग अशक्‍तता येते. 

शरीरातील द्रवता वाढल्याने व कफदोषाचे असंतुलन झाल्याने मुख्य परिणाम होतो तो पुढील शरीरधातूंवर,
मेदोऽस्रशुक्रांबुवसालसिका।
मज्जा रसौजः पिशितं च दूष्याः ।।
मेद, रक्‍त, शुक्र, रस, मज्जा, मांस, ओज, वसा, लसिका ही सर्व प्रमेह रोगातली ‘दूष्य’ म्हणजे शरीरातील बिघडणारे घटक असतात. 
जवळजवळ सगळ्याच धातूंची, एवढेच नाही तर सातही धातूंचे सार असलेल्या ‘ओज’ तत्त्वाची ताकद कमी झाली की शरीरातल्या सगळ्याच महत्त्वाच्या अवयवांची व पर्यायाने एकंदर सगळ्याच शरीरक्रियांची सक्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. 

म्हणून मधुमेहावर फक्‍त रक्‍तातील साखर कमी करणारी औषधे घेणे पुरेसे नसते, तर पुढीलप्रमाणे सर्व बाजूंनी उपाययोजना करावी लागते. 
१. एकूण पचनसंस्था चांगले कार्य करेल अशी योजना. 
२. मूत्रसंस्थेचे कार्य व्यवस्थित चालेल, शरीरात वीर्यवर्धन होऊन शक्‍ती वाढेल अशी योजना.
३. रक्‍तात जमलेली साखर कमी करण्याची योजना. 
४. मधुमेहाचे मुख्य औषध म्हणजे शरीरात साखर पचविण्यासाठी केलेली योजना. 

यातही शरीरशुद्धी व धातूंना पुनर्जीवन देण्यासाठी रसायन सेवन हे महत्त्वाचे असते. विरेचन, बस्तीसारख्या आयुर्वेदीय उपचारांनी प्रमेहाचे मूळ कारण ‘कफः सपित्तः पवनश्‍च दोषाः’ हे तिन्ही दोष संतुलित होऊ शकतात. शरीरातील अतिरिक्‍त वाढलेली द्रवता कमी होऊ शकते, द्रवता कमी झाली की जाठराग्नी प्रदीप्त होऊ शकतो, पाठोपाठ धात्वग्नीही आपापले काम योग्य प्रकारे करू लागतात. अशा प्रकारे एकदा का रोगाची मूळ जडणघडण (संप्राप्ती) संपुष्टात आली की बाकीच्या गोष्टी क्रमाक्रमाने सुधारू शकतात. शिवाय या प्रकारच्या उपचारांनी शरीरशुद्धी झाली की शिथिल धातूंना पुन्हा सशक्‍त करणाऱ्या रसायनांचा अधिक चांगल्या प्रकारे परिणाम होतो.

पर्यायाने निरनिराळे शरीरावयव, शरीरसंस्था पुन्हा कार्यक्षम होतात, आपापली कामे योग्य प्रकारे निभावण्यास सक्षम होतात. तरीही पथ्यापथ्य सांभाळणे, नियमित व्यायाम करणे, आचरणात आवश्‍यक ती काळजी घेणे हे सर्व सांभाळावे लागते. म्हणून चरकाचार्य या ठिकाणी म्हणतात की कायम लक्ष द्याव्या लागणाऱ्या रोगांमध्ये प्रमेह हा अग्रणी होय.

अग्र्यसंग्रहातील यापुढच्या विषयाची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com