कोलेस्टेरॉल

cholesterol
cholesterol

कोलेस्टेरॉल जितके कमी तितके चांगले हा निव्वळ गैरसमज आहे. प्रमाणापेक्षा कोलेस्टेरॉल कमी असलेली व्यक्‍ती ‘निरोगी’ नसते, उलट अशा व्यक्‍तींमध्ये अशक्‍तता, गळून गेल्यासारखे वाटणे, अनुत्साह वाटणे अशी लक्षणे आढळतात. शिवाय कोलेस्टेरॉल कमीत कमी ठेवण्यासाठी डाएटचा अतिरेक झाल्यानेही शरीराचे मोठे नुकसान झालेले दिसते.

आधुनिक वैद्यकातील सर्वाधिक प्रचलित आणि सरसकट सगळ्यांना माहिती असणारा शब्द म्हणजे कोलेस्टेरॉल. त्यातही चांगले कोलेस्टेरॉल, वाईट कोलेस्टेरॉल असे प्रकार असतात. दोन वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅब्जमध्ये कोलेस्टेरॉल तपासले तर त्यातील नॉर्मल कोलेस्टेरॉलची नोंद वेगवेगळी असते. या सर्वांमुळे जनसामान्यांमध्ये कोलेस्टेरॉलच्या बाबतीत मोठी संदिग्धता असते. म्हणूनच आपण आज कोलेस्टेरॉलभोवतीचे गैरसमजाचे वलय कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कोलेस्टेरॉल जितके कमी तितके चांगले असा एक गैरसमज सर्वसामान्य लोकांमध्ये आढळतो. मात्र कोलेस्टेरॉल प्रमाणापेक्षा अधिक वाढले तरच आरोग्यास घातक ठरू शकते. एका विशिष्ट पातळीपर्यंत (साधारणतः १५० ते २३० पर्यंत) कोलेस्टेरॉल रक्‍तात सापडणे उलट आवश्‍यक असते.

आयुर्वेदामध्ये ‘आम’ नावाची एक संकल्पना समजावलेली आहे. शरीरात आमाची लक्षणे दिसत असताना वैज्ञानिक पृथक्करणाने प्रयोगशाळेत रक्‍ताच्या तपासण्या केल्या असता, रक्‍तात जी काही आमद्रव्ये सापडतात त्यांनाच कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स वगैरे नावे दिलेली दिसतात.

थोडक्‍यात समजावयाचे तर, आपण खाल्लेल्या अन्नाचे जाठराग्नीकडून पचन झाले की अन्नापासून ‘आहाररस’ हा सार भाग तयार होतो, जो पुढच्या सातही धातूत रूपांतरित होतो व शरीरशक्‍ती, उत्साह, कर्मसामर्थ्यास कारणीभूत ठरतो. ही आदर्श पचनसंस्था म्हणता येईल. मात्र काही कारणांनी हा जाठराग्नी थकला, मंद झाला, पचनाचे काम शंभर टक्के करेनासा झाला की मग मात्र अन्न संपूर्णतया पचत नाही, अर्थातच आहाररस सारस्वरूप न बनता अर्धे पचलेले - अर्धे न पचलेले अशा स्वरूपाचा तयार होतो. असा अर्धपक्व आहाररस म्हणजेच ‘आम’ अनारोग्यास कारणीभूत ठरतो. 
आमाचे स्वरूप स्पष्ट करताना वाग्भटाचार्य म्हणतात. 
अविपक्वं असंयुक्‍तं दुर्गंधं बहुपिच्छिलम्‌ । 
सदनं सर्वगात्राणां आम इति अभिधीयते ।।
......अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
जो अर्धवट पचलेल्या स्वरूपात असतो, जो शरीरपोषणास उपयुक्‍त नसून उलट शरीरास हानिकारक ठरतो, दुर्गंधित असून जो शरीरात चिकटून राहून शरीराला जडपणा आणून शरीरसामर्थ्य कमी करतो अशा पदार्थाला ‘आम’ म्हणतात.

हा आम शरीरात निर्माण झाला की त्यामुळे विविध रोग, रोगलक्षणे उत्पन्न होऊ शकतात. म्हणूनच रोगाला आयुर्वेदात ‘आमय’ असेही म्हटले जाते. रक्‍ताच्या तपासणीमध्ये कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स वाढलेले दिसतात तेव्हा आमाची पुढील लक्षणेही दिसत असतात.
स्रोतोरोधबलभ्रंशगौरवानिलमूढताः। आलस्यापक्तिनिष्ठीवमलसंगारुचिक्‍लमाः ।।
......अष्टांगहृदय सूत्रस्थान
अंग जखडल्यासारखे वाटते, शरीरातील विविध पदार्थांचे वहन अडखळत होते, उदा. मलप्रवृत्ती व्यवस्थित होते. तर लघवी अडखळत होते, रक्‍ताच्या वहनाला अडथळा निर्माण होऊ शकतो. शरीरशक्‍ती कमी होते, काम करायचे सामर्थ्य राहात नाही, गळून गेल्यासारखे वाटते, शरीरावयव जड, बोजड वाटू लागतात, वायूच्या प्राकृत गतीला आणि दिशेला अडथळा निर्माण झाल्यामुळे पोट फुगणे, ढेकर येणे वगैरे त्रास होऊ लागतात. उत्साह राहात नाही, उलट आळस भरून राहतो, पचन बिघडते, मळमळते, तोंडाची रुची बिघडते, मलप्रवृत्ती साफ होत नाही अशी लक्षणे दिसायला लागली की शरीरात आम बनण्याची प्रक्रिया थांबवावी लागते, त्यासाठी अशक्‍त झालेल्या, मंदावलेल्या जाठराग्नीला पूर्ववत करणे सर्वात महत्त्वाचे असते.

कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईडचा विचार करताना आमाबरोबरच मेदधातूचाही विचार करावा लागतो. मेदधातू हा शरीरातील चौथ्या क्रमांकाचा धातू आहे. तोही एका नियत प्रमाणात शरीरात असणे आवश्‍यक असते. मात्र जाठराग्नी मंदावला की त्याचे सहकारी धात्वग्नी (धातूंचे अग्नी) देखील मंदावतात.

अर्थातच आहाररस पुढच्या पुढच्या धातूत परिवर्तित होण्याची प्रक्रिया व्यवस्थित व संपूर्णतया होत नाही. प्रत्येक परिवर्तनामध्ये काहीतरी वैगुण्य शिल्लक राहिले की शरीराधातूचा समतोल बिघडतो. विशेषतः मेदाग्नी मंद झाल्याने मेदधातू अपाचित किंवा साम (स-आम) स्वरूपात तयार झाला की त्याचा परिणाम वजन वाढण्याबरोबरच कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स अवाजवी प्रमाणात वाढण्यात होतो.

‘आम’ शरीरात कशामुळे उत्पन्न होतो हे समजले तर त्याच्या प्रतिबंधासाठी आणि ओघानेच कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌सच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न करता येतील.
विरुद्धाशनाजीर्णशीलिनो विषलक्षणम्‌ । 
आमदोषं महाघोरं वर्जयेत्‌ विषसंज्ञकम्‌ ।।
... अष्टांगहृदय सूत्रस्थान
विरुद्ध अन्न म्हणजे एकमेकांना अनुकूल नसणारे अन्न एकत्र मिसळून खाण्याने अग्नी बिघडतो, परिणामतः शरीरात आम वाढतो. भुकेचा विचार न करता अति प्रमाणात खात राहणे; अपचन झालेले असतानाही खाणे; तसेच पचावयास जड, शिळे, डीप फ्रोजन अन्न खाणे; आंबवलेले, तेलकट, झणझणीत अन्नाचे अति सेवन करणे; रोज रोज पिझ्झा, चीज बर्गर, पनीर-मसालासारख्या फॅन्सी डिशेस्‌ खाणे; अवेळी जेवण; रात्री फार उशिरा जेवणे, दुपारच्या जेवणानंतर झोपणे; व्यायाम न करणे; सतत मानसिक ताणाखाली राहणे व त्यावर उपाय म्हणून मद्य वा धूम्रपानाच्या आहारी जाणे वगैरे कारणांनी हळूहळू आम तयार होण्यास सुरुवात होते. त्यावर वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स वाढू शकतात.
म्हणून वाढलेले कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स कमी करण्यासाठी आम-अपचन आणि मेदधातूची अपाचित अवस्था या दोघांचाही विचार करावा लागेल. त्यासाठी लंघन हा एक सर्वोत्तम उपाय आहे असे सांगता येईल.

लंघनाचे निरनिराळे प्रकार असू शकतात. रात्रीचे जेवण बंद करणे, रात्री फक्‍त द्रवाहार - सूप घेणे, काही दिवस नियमाने रात्री फक्‍त मुगाची खिचडी खाणे या प्रकारे प्रकृती, एकंदर जीवनपद्धतीला अनुरूप असे ‘लंघन’ केल्यास पचन सुधारून कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स कमी करता येतात.

उकळलेले गरम पाणी पिणे हाही धात्वग्नी वर्धन करून अतिरिक्‍त आम पचवण्याचा उत्तम उपाय आहे. नुसतेच रक्‍तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स कमी करणे आणि या प्रकारे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌सच्या निर्मितीस मुळापासून प्रतिबंध करणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. एकंदर पचन सुधारणे, आमपचन झाले की त्याचा फायदा संपूर्ण शरीराला होतो, मानसिक पातळीवरही उत्साह, सृजनात्मकता अनुभूत होते व सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे कोलेस्टेरॉल प्रमाणापेक्षा कमी होण्याचीही यत्किंचितही भीती राहात नाही. 

प्रकृतीनुरूप शास्त्रीय पद्धतीने ‘पंचकर्म’ हे तर यासाठी वरदानच होय. डोळे विस्फारतील इतक्‍या प्रमाणात वाढलेले कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे पंचकर्माने कमी होताना दिसतात.

पंचकर्माच्या सुरुवातीला ‘एवढे तूप कसे घेऊ’ अशी शंका बाळगणारे रुग्ण पंचकर्माअखेरीस ‘अख्ख्या वर्षात जेवढे तूप खाऊ शकलो नाही तेवढे तूप या पंधरा-वीस दिवसांत खाल्ले, तरीही बाकीच्या उपायांनी कमी न झालेले कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स कमी झाले म्हणजे नवलच आहे’ असे उद्गार काढतात तेव्हा खरोखरच पंचकर्माची महती एकवार पुन्हा प्रत्ययाला येते.

येथे एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले साजूक तूप म्हणजे ताजे शुद्ध दूध (ज्यावर क्रीम काढणे, घालणे वगैरे प्रक्रिया केलेल्या नाहीत असे दूध) वर येईपर्यंत गरम करून, वर आलेल्या मलईला विरजण लावून तयार झालेले दही घुसळून काढलेल्या लोण्याचे बनवलेले तूप आहारात योग्य प्रमाणात अंतर्भूत करण्याने कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स वाढत नाहीत. तळलेल्या गोष्टी किंवा चुकीच्या पद्धतीने तयार केलेले तूप खाल्ल्यास एक वेळ कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स वाढत असले तरी आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेल्या साजूक तुपाचे सेवन केल्याने (रोज पाच-सहा चमचे) कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स वाढत नाहीत. 

या सर्व उपायांबरोबरच ‘व्यायाम’ हाही एक श्रेष्ठ उपाय आहे. रोज किमान पस्तीस मिनिटे चालायला जाणे, संतुलन क्रियायोगाचा अभ्यास करणे, प्रकृतीला अनुरूप योगासने करणे, सूर्यनमस्कार घालणे, श्वसनावर नियंत्रण ठेवणाऱ्या भस्रिका, दीर्घ श्वसनादी क्रिया करणे यामुळेही कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स कमी व्हायला मदत होते.

थोडक्‍यात सांगायचे म्हणजे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌स वाढलेले असल्यास पचन व्यवस्थेवर अतिरिक्‍त ताण येणार नाही यासाठी आहार-आचरणात आवश्‍यक ते बदल करावेत. आमपाचन, मेदपचनासाठी योग्य औषधोपचार सुरू करावेत, मुळावर काम करणाच्या दृष्टीने तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पंचकर्म करावे. यालाच आयुर्वेदिक जीवनशैलीची व औषधांची जोड कायम ठेवल्यास पुन्हा कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्‌सचा बागुलबुवा कधीच छळणार नाही व खऱ्या अर्थाने निर-आमय जीवन जगता येईल.
प्रमाणापेक्षा कोलेस्टेरॉल कमी असलेली व्यक्‍ती ‘निरोगी’ नसते, उलट अशा व्यक्‍तींमध्ये अशक्‍तता, गळून गेल्यासारखे वाटणे, अनुत्साह वाटणे अशी लक्षणे आढळतात. शिवाय कोलेस्टेरॉल कमीत कमी ठेवण्यासाठी डाएटचा अतिरेक झाल्यानेही शरीराचे मोठे नुकसान झालेले दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com