व्हिटॅमिन्सच्या तपासण्या

व्हिटॅमिन्सच्या तपासण्या

जीवनसत्त्व ‘ब १२’ :  व्हिटॅमिन ‘ब १२’ हे अत्यंत महत्त्वाचे असे जीवनसत्त्व असून ते पाण्यात विरघळणारे आहे. व्हिटॅमिन ‘ब १२’चे कार्य काय असते?  लाल रक्तपेशीतील डीएनए तयार करणे  मज्जातंतूंचे कार्य करण्यास मदत करणे   फॉलिक ॲसिडच्या शोषणाला मदत करून त्याची पातळी योग्य राखणे   शरीरातील होमोसिस्टीनची पातळी कमी ठेवणे   शरीरातील कामासाठी ऊर्जा मुक्त करण्यास मदत करणे  

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे काय होते? :  रक्तक्षय (ॲनिमिया)   मज्जातंतूंचे कार्य मंदावल्यामुळे नैराश्‍य, चिडचिड होणे   वजन घटणे, तोंड येणे, पोटाच्या तक्रारी, पाळीच्या तक्रारी, हातापायाला मुंग्या येणे  रक्तातील होमोसिटीनचे प्रमाण वाढून हृदयविकार अथवा स्ट्रोकची शक्‍यता वाढणे

कोणत्या अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्त्व ‘ब १२’ आढळते? :   याचा मुख्य स्रोत हा प्राणिज पदार्थांमध्ये असतो.  पोर्क, चिकन, मटण, अंडी यामध्ये. याशिवाय काही प्रमाणात दूध, दही आणि चीज यात.  काही प्रकारच्या बुरशींमध्ये ‘ब १२’ जीवनसत्त्व असते. त्यामुळेच शाकाहारी लोकांमध्ये याची कमतरता होण्याचे प्रमाण मोठे आहे. याशिवाय जठराच्या तक्रारी, आजार, तसेच आतड्यांचे आजार असलेल्या लोकांमध्येही कमतरता आढळते. कारण आहारातून ‘ब १२’ जीवनसत्त्वाचे शोषण शरीरात योग्य प्रकारे होण्यात हे आजार अडथळे आणतात. 

तपासणी : जीवनसत्त्व ‘ब १२’ हे रक्तातून तपासले जाते आणि ते कोणत्याही वेळी देता येते. त्यासाठी उपाशी असण्याची गरज नसते. सामान्य पातळी २०० ते ९०० अशी असते. सदर तपासणीसोबत अथवा त्या आधी हिमोग्राम ही मूलभूत तपासणी केली असल्यास त्यामध्ये लाल रक्तपेशींचा आकार प्रमाणापेक्षा जास्त वाढून मॅक्रोसायटिक पद्धतीचा रक्तक्षय (ॲनिमिया) झालेला आढळतो. यासाठीच वयस्क व्यक्ती, स्तन्यपान करणाऱ्या माता आणि पूर्ण शाकाहारी असलेल्या व्यक्तींनी ‘ब १२’च्या गोळ्या घेणे उपयुक्त ठरते. निदानाच्या तीव्रतेनुसार इंजेक्‍शनमधूनदेखील हे देता येते. शिवाय पाण्यात विरघळणारे असल्यामुळे शरीरात अतिरिक्त झाल्यास ‘ब १२’चे लघवीतून उत्सर्जन होते. 

जीवनसत्त्व ‘ड’ : व्हिटॅमिन ‘डी’ हे शरीरातील आणखी एक अत्यंत महत्त्वाचे असे जीवनसत्त्व असून ते ‘फॅट सोल्युबल’ म्हणजे चरबीत विरघळणारे आहे. व्हिटॅमिन ‘डी’ म्हणजेच व्हिटॅमिन ‘डी टोटल’ असून ते ‘डी २’  आणि ‘डी ३’ या प्रकारांनी बनलेले असते.   ‘डी २’ हे वनस्पतीजन्य असून ‘डी ३’ हे सूर्यप्रकाशातून, तसेच प्राणिज पदार्थांमधून मिळते.  

 व्हिटॅमिन ‘डी २’ आणि ‘डी ३’  हे दोन्हीही प्रकार हे थेट परिणामकारक नसतात. त्यांच्यावर यकृत आणि मूत्रपिंड यांमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर कॅल्सीट्रॉल नावाच्या संयुगात होत आणि हा प्रकार व्हिटॅमिन ‘डी’चा उपयुक्त प्रकार असतो. तथापि याचे शरीरातील ‘हाफ लाइफ’ (ज्ञात उधळण्याचा कालावधी) फक्त आठ तासांचा असून व्हिटॅमिन ‘डी टोटल’चा हाच कालावधी सुमारे पंचवीस दिवसांचा असतो. यामुळे व्हिटॅमिन ‘डी टोटल’ हीच चाचणी सर्वात जास्त ग्राह्य मानण्यात येते. ‘डी ३’ लिहिलेले असले तरीही व्हिटॅमिन ‘डी टोटल’ हीच चाचणी औषधोपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना बहुतांश वेळा अपेक्षित असते. 

व्हिटॅमिन ‘डी’चे कार्य :  जीवनसत्त्व ‘ड’ हे कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या शोषणाला मदत करते.  हाडे तयार करणे आणि त्यांच्या ठिसूळपणापासून प्रतिबंध करणे.  पेशींच्या निर्मितीत भाग घेणे आणि बाधित अथवा विकृत पेशींचा नाश करणे.  प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणे. 

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे काय होते? :  लहान मुलांमध्ये आणि प्रौढ अवस्थेत मुडदूस (रिकेट्‌स) हा आजार होतो. यामध्ये हाडांची वाढ नीट न झाल्याने वेडीवाकडी हाडे आणि त्यांचे मोडण्याचे प्रमाण वाढते.   वय वाढल्यानंतर हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते.   मनाचा समतोल कमी होणे आणि नैराश्‍य येणे.   मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांची शक्‍यता वाढणे. 

व्हिटॅमिन ‘डी’ कोणत्या पदार्थातून मिळते? :  याचा मुख्य स्रोत प्राणिज पदार्थ असतात. साल्मोन, टुना, मटण, लिव्हर, लिव्हर ऑइल, अंड्याचा पिवळा बलक, काही प्रमाणात दूध आणि चीज.   सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन ‘डी ३’ त्वचेखाली तयार होते. एका अभ्यासानुसार आठवड्यात दोन वेळा अर्धा-अर्धा तास कोणतेही लोशन न लावता शरीराच्या मोठ्या भागावर  सूर्यकिरण पडल्यास त्या मात्रेत हे व्हिटॅमिन तयार होते. उन्हातून फिरणे कमी झाल्यामुळे हल्ली बहुतांश लोकात याची कमतरता आढळते.  याशिवाय यकृत, मूत्रपिंड यांच्या आजारात शोषणप्रक्रियेत आणि विघटनप्रक्रियेत अडथळा आल्याने कमतरता उद्भवते. काळ्या व्यक्तींमध्ये त्वचेतून सूर्यकिरणे शोधण्याच्या प्रक्रियेला मेलॅनिन नावाचे द्रव्य प्रतिरोध करते अन्‌ त्यामुळे त्यांच्यात कमतरतेचे प्रमाण अधिक असते. वृद्ध मंडळी आणि स्तन्यपान देणाऱ्या माता यांच्यामध्येही कमतरता जास्त प्रमाणात आढळते. 

चाचणी  : व्हिटॅमिन ‘डी टोटल’ ही चाचणी रक्तातून होते आणि त्याचा नमुना कधीही देता येतो. याच्या सामान्य पातळीचे प्रमाण ३० ते ७० असते. तथापि हे जीवनसत्त्व चरबीत विरघळते आणि त्याचे  अतिरिक्त प्रमाण शरीरावर घातक परिणाम करू शकतात. व्हिटॅमिन ‘डी’ हे गोळ्या, पावडरी आणि इंजेक्‍शन या माध्यमातून उपलब्ध असते.  ज्येष्ठ व्यक्ती, स्तन्यपान देणाऱ्या माता, बंदिस्त ठिकाणी कामे करणारी मंडळी यांनी व्हिटॅमिन ‘डी’ घेणे हितावह ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com