'जैशे महंमद'चा म्होरक्या मसूद अझहरला चीनचे अभय

Masood Azhar
Masood Azhar

न्यूयॉर्क: पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील अहवालावर चीनने पुन्हा तांत्रिक स्थगिती मिळविली आहे.

या प्रस्तावाची अंतिम मुदत संपण्यास काही काळाचा अवधी राहिलेला असताना चीनने या प्रस्तावाला स्थगिती मिळविली. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आणखी अवधी चीनने मागितला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघातील राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिली. अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जावे, म्हणून अमेरिकेप्रमाणेच अन्य देशांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या संदर्भात संयुक्त राष्ट्रांमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर आक्षेप घेण्यासाठीची चोवीस तासांची मुदत आज रात्री संपुष्टात आली. ही मुदत संपण्याआधीच चीनने यामध्ये पुन्हा खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या "अल कायदा निर्बंध समितीच्या कलम-1267'अंतर्गत अझहरला दहशतवादी घोषित केले जावे म्हणून फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने 27 फेब्रुवारी रोजीच या संदर्भातील प्रस्ताव मांडला होता.

नियमांचा दाखला
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य असलेल्या चीनकडे नकाराधिकार आहे. याआधीही भारताप्रमाणेच अन्य देशांनी अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जावे, म्हणून सादर करण्यात आलेला प्रस्ताव चीननेच तीन वेळा रोखून धरला होता. अझहरबाबत चीनने पुन्हा एकदा मवाळ भूमिका घेतली आहे. या संदर्भात चर्चा करताना सर्व निर्धारित नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. तसेच सर्वांना मान्य असा तोडगा यावर काढला जायला हवा, असा अजब दावा चीनने केला.

भारत-अमेरिकेची अपेक्षा
वॉशिंग्टन : पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाची दहशतवादाबाबतची चिंता समजून घ्यावी, तसेच पाकिस्तान सीमेवरील दहशतवादाचे कायमस्वरूपी उच्चाटन करावे, अशी अपेक्षा भारत आणि अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राजकीय व्यवहारविषयक विभागाचे उपमंत्री डेव्हिड हेल यांच्यात या अनुषंगाने चर्चा झाली असून, या संदर्भातील निवेदन भारतीय दूतावासाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अमेरिकेचा दबाव
वॉशिंग्टन : "जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जावे, म्हणून अमेरिकेने चीनवर दबाव आणला होता. मसूदने आंतरराष्ट्रीय दहशतवादी होण्याच्या सर्व कसोट्या पूर्ण केल्या असून, या संदर्भातील प्रस्तावास चीनने विरोध केल्यास तो प्रादेशिक स्थैर्य आणि शांततेच्या विरोधात राहील, असे अमेरिकेने म्हटले होते. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर जैशे महंमद आणि तिचा म्होरक्‍या मसूद अझहर तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com