मालवणजवळ घुसखोर ट्रॉलर्सवर कारवाई

मालवणजवळ घुसखोर ट्रॉलर्सवर कारवाई

मालवण - येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात आठ वावाच्या आत घुसखोरी करत मासळीची लूट करणारे रत्नागिरीतील तीन पर्ससीन ट्रॉलर्स मत्स्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्त गस्तीनौकेद्वारे पकडले. कारवाईदरम्यान ट्रॉलर्स पळून जाऊ नयेत, यासाठी स्थानिक मच्छीमारही या मोहिमेत सहभागी झाले.

तिन्ही ट्रॉलर्स येथील बंदरात दुपारी उशिरा आणले. या ट्रॉलर्सवरील मासळीचा तत्काळ लिलाव करण्याच्या तसेच मासळी लिलावाच्या पाचपट दंडाच्या कारवाईचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त राजकुमार महाडिक यांना दिल्या. तिन्ही ट्रॉलर्सवरील मासळीचा ७३ हजार ४०० रुपयांचा लिलाव झाला. 

सकाळी जिल्ह्याबाहेरील हायस्पीड, पर्ससीनधारकांनी आठ वावाच्या आत घुसखोरी करत मासळीची लूट सुरू केल्याचे दिसताच पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे मत्स्य व पोलिस प्रशासनाने संयुक्त गस्तीनौकेद्वारे मोहीम हाती घेत रत्नागिरीतील साहिल अमर मुकादम यांच्या मालकीचा अल अमर-२, हनिफ मुल्ला यांच्या मालकीचा महमदी-२, जमीर होडेकर यांच्या मालकीचा अबेझमझम हे तीन ट्रॉलर्स पकडले. पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर ८५ खलाशी होते.  
दरम्यान, तिन्ही ट्रॉलर्सवर कारवाईचा निर्णय होईपर्यंत येथील बंदरात अवरुद्ध करून ठेवणार आहेत. या ट्रॉलर्सवर सागरी सुरक्षेचे कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहतील, अशी माहिती मत्स्यव्यवसायचे परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी पळून गेलेल्या ट्रॉलरसंदर्भात उद्या (ता. १८) तहसीलदारांकडे प्रतिवेदन दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कारवाई मोहिमेत महाडवाला, पोलिस कर्मचारी सुनील वेंगुर्लेकर, सिद्धेश चिपकर, सागरी सुरक्षा पोलिस चंद्रकांत कुबल, स्थानिक मच्छीमारही सहभागी झाले. 

ट्रॉलरला बांधली गस्ती नौका 
दांडी आवार येथे मासळीच्या लिलावाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. हे ट्रॉलर्स पळून जाऊ नयेत, यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाची गस्तीनौका त्या ट्रॉलर्संना बांधून ठेवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com