दिवसा सूर्यप्रकाश प्यालेली काठी रात्री प्रकाश देते, या अद्‌भुत किमयेच्या संशोधनाची गरज

दिवसा सूर्यप्रकाश प्यालेली काठी रात्री प्रकाश देते, या अद्‌भुत किमयेच्या संशोधनाची गरज

दोडामार्ग -  परमे येथे दिवसा सूर्यप्रकाश प्यालेली काठी रात्रीच्या अंधारात प्रकाश परावर्तित करते आणि एक अद्‌भुत नजारा पाहायला मिळतो. या देवराईत सापडणाऱ्या काठीला सनकाठी असे म्हणतात. निसर्गाचा तो चमत्कार परमेतील देवराईत आजही पाहावयास मिळतो. निसर्गाच्या त्या अद्‌भुत किमयेचे संशोधन होण्याची गरज आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेले परमे गाव. परमे हे त्याकाळचे संस्थान. बारमाही वाहणाऱ्या तिलारी नदीच्या किनारी असलेल्या या गावात विपुल वनसंपदा. अनेक वन्यप्राण्यांचा सर्रास वावर. त्यातच निसर्गाशी तादात्म्य पावल्याने गावकऱ्यांची पापभीरू वृत्ती, त्यामुळे जंगलातील झाडे विशेषतः देवराईतील झाडांवर कुऱ्हाड चालविणे म्हणजे पाप करण्यासारखे.

साहजिकच वर्षानुवर्षे तिथली देवराई हिरवीगार, गर्द आणि समृद्ध. अलीकडे जुनाट झाडे जीर्ण होऊन कोसळल्याने देवराई विरळ दिसत असली तरी देवराईत कुऱ्हाडबंदी आहे. देवराईतील अनेक वेली झाडावरून खाली जमिनीवर येत सरपटत अनेक ठिकाणी पोचल्या आहेत, काही पुन्हा झाडावरही गेल्या आहेत. वेलींचे वय इतके जास्त आहे, की वेली आता भल्यामोठ्या झाडांच्या खोडांच्या आकाराच्या बनल्या आहेत.

 ‘माणूस जगण्यासाठी जंगले जगलीच पाहिजेत’

सगळीकडे कुऱ्हाड चालवून जंगले, देवराई आणि वनराई नष्ट केली जात असताना परमेतील ग्रामस्थांनी मात्र देवराई शाबूत ठेवली आहे. ‘माणूस जगण्यासाठी जंगले जगलीच पाहिजेत’, असा संदेशच जणू ते देत आहेत.

शिवाय अनेक वेलींनी सुंदर आकार धारण केले आहेत. हिरवीगार वनश्री, वेगवेगळ्या पक्ष्यांचे सतत ऐकत राहावेसे वाटतील इतके सुंदर आवाज, घनगर्द सावली आणि झुळूझुळू वाहणारा गार वारा; सगळेच विलोभनीय आणि हवेहवेसे आहे. दरम्यान, अलीकडच्या काही वर्षांत माणूस मतलबी बनला.

निसर्ग ओरबाडून, त्याला नष्ट करू स्वत:ची स्वप्ने प्रत्यक्षात आणू पाहू लागला आहे; पण त्यातून तो अधिक अडचणीत आला. जंगले तुटल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागले. अनेक ठिकाणी त्यांनी माणसांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले केले. वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. जंगले वाचली तर जल आणि जमीन वाचेल आणि पर्यायाने माणूसही वाचेल. त्यासाठी पिढ्यान्‌पिढ्याच्या देवराई, आसपासची वनराई आणि गावाशेजारची जंगले वाचली पाहिजेत. त्या पार्श्वभूमीवर परमेतील ग्रामस्थांनी देवराईच्या जतनातून केलेले पर्यावरणाचे रक्षणाचे विधायक काम बोधप्रद आहे. 

निसर्ग पर्यटनाला संधी
देवराईचा परिसर इतका सुंदर आहे, की अनेक शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी तेथे शैक्षणिक सहलीसाठी येतात. सनकाठीवर संशोधन होण्यासाठी पर्यटकांसह अभ्यासकही देवराईत पोचायला हवेत. गावकऱ्यांनी पर्यटकांसाठी सोईसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच निसर्ग अभ्यासकांना पाचारण करायला हवे. अनेक गावांसमोर पर्यावरण रक्षणाचा धडा देणाऱ्या गावाला जगाच्या पर्यटन नकाशावर पोचवण्यासाठी संयुक्त प्रयत्न आवश्‍यक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com