‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती

‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती

दोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते क्षणिकच ठरले. 
अलीकडेच मायवेट चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हत्ती हटाओसाठी दोडामार्गात ‘हनी बी प्रोजेक्‍ट’ची राबवलेली संकल्पना फळाला आली आहे.

नैसर्गिक पद्धतीने राबवल्या गेलेल्या मोहिमेची रानटी हत्तींनी धास्ती घेतली असून मधुमक्षिका पालनाचे बॉक्‍स बसवलेल्या भागातून हत्तींनी काढता पाय घेतला आहे. मायवेट ट्रस्टचा देशातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा मायवेट संस्थेचे सचिव डॉ. युवराज कागीनकर यांनी केला आहे.

दोडामार्ग तालुका  हत्तींच्या उपद्रवाच्या दृष्टीने सर्वांत संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. कर्नाटकातून येणाऱ्या रानटी हत्तींनी आजवर इथं मोठ्या प्रमाणात शेती, बागायतीचं नुकसान केलं असून याठिकाणच्या हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने लाखो, करोडो रुपये खर्च केले; मात्र या सर्व उपाययोजना क्षणिक ठरल्याने येथील हत्तींचा उपद्रव काही कमी झालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी मायवेट चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हत्ती हटाओसाठी हनी बी प्रोजेक्‍ट अर्थात मधुमक्षिका पालनाचा पायलट प्रकल्प दोडामार्गात आणला.

दोडामार्गमधील बांबर्डे परिसरात या प्रकल्पांतर्गत १४ बॉक्‍स दोन सप्टेंबरला बसविण्यात आले; मात्र चारच दिवसांत याचे फायदे दिसून आले. पाच ते सहा सप्टेंबरला दोडामार्गात शिरकाव केलेल्या रानटी हत्तींनी या भागात फिरकणे टाळले. यानंतरच्या कालावधीतही या परिसरात हत्ती दिसून आले नाहीत, अशी माहिती मायवेट संस्थेचे सचिव डॉ. कागीनकर यांनी दिली.  
शासनाने दोडामार्गात हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी लाखो, करोडो रुपये खर्ची घालूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही; मात्र मायवेट संस्थेने नैसर्गिक पद्धतीने राबवलेला पायलट प्रोजेक्‍ट यशस्वी ठरल्याने हत्ती हटाओसाठी राजकारण बाजूला ठेवून शासन स्तरावरून याचा गंभीर विचार झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने हत्तीमुक्त जिल्हा बनवता येईल.

‘‘हत्तींचा मोठा उपद्रव असलेल्या तामिळनाडू राज्यासह थायलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांत प्रकल्प यशस्वी झाला. त्यापाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गातदेखील नैसर्गिक पद्धतीने हत्ती हटाओचा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्यामुळे शासन स्तरावरून मदत मिळाल्यास संपूर्ण दोडामार्ग तालुक्‍यात अशाच पद्धतीने हत्तींचा बंदोबस्त करता येईल.’’
-डॉ. युवराज कागीनकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com