सिंधुदुर्गातील पाच कौल कारखाने बंद

सिंधुदुर्गातील पाच कौल कारखाने बंद

कुडाळ - जिल्ह्यातील कौल कारखाने सलाईनवर आहेत. पाच कारखाने बंद तर तीन कारखाने संकटात असून शासनाच्या सहकार्याची गरज असल्याचे सूर या व्यावसायिक उद्योजकातून उमटत आहेत.

नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिकतेचे आक्रमण प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे. जुन्या रूढी परंपरा तसेच व्यवसायामुळे मागे पडत आहेत. याचा फटका सर्वच क्षेत्रात बसत आहे. सिमेंटच्या इमारती, बंगले त्यावर स्लॅब, पत्रे अशी घरे आली आणि कौलारू घरांचा जमाना मागे पडला. या आधुनिकतेत कौल कारखाने बंद पडत आहेत.

जिल्ह्यात आठ कारखाने होते. त्यापैकी पाच कारखाने बंद पडले असून तीन कारखाने सुरू आहेत व ते केव्हा बंद होतील हे सांगता येत नाही. विटा व कौले हा कोकणचा मोठा व्यवसाय होता. सुरुवातीला या व्यवसायावर कुंभार समाजाची मक्तेदारी होती; पण कालांतराने म्हणजे 1850 मध्ये जर्मन उद्योगपतीने मेंगलोर येथे पहिली कौलाची फॅक्‍टरी सुरू केली आणि घराच्या छपरावर गावठी नळ्याची जागा टप्याटप्याने मेंगलोर कौलांनी घेतली. त्याकाळी मेंगलोर येथे तयार होणारी कौले कोकणात आणणे आणि ती आपल्या घरांच्या छपरावर घालणे सर्वांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील कारखाने या भागात स्थापन झाले. या कौलांना स्थानिकांनी पसंती दिली. त्यामुळे जिल्ह्यात सुरू झालेल्या कारखान्यांमधून तयार होणारी कौले स्थानिकांना आर्थिकदृष्ट्या परवडू लागली.

हळूहळू घरांच्या छपरावरील नळे गेले व मंगलोरी कौले आली. कौलाचे कारखाने आर्थिकदृष्ट्या चांगले चालू लागले. हजारो लोकांना रोजगार मिळू लागला. त्यामुळे त्याकाळी शासनाचे याकडे लक्ष गेले व शासनाच्या जाचक अटीचा सामना या व्यवसायावर होऊ लागला.

शासनाने मातीवर रॉयल्टी भरमसाठ सुरू केली. पक्‍क्‍या मालावर व्हॅट व आता जीएसटी लावला. या व्यवसायाला लागणारे इंधन म्हणजे लाकूड व लाकूडतोड्याला बंदी आणली. पर्यावरणाची परवानगी मिळणे कठीण झाले. लोक स्लॅब, पत्र्याची घरे बांधू लागले आणि कौल कारखाने संकटात आले.

जिल्ह्यात आठ कौल कारखाने होते. त्यापैकी आरे (ता. देवगड), आईनमळा (ता. कुडाळ), निरवडे (ता. सावंतवाडी), वेस्ट कोस्ट (ता. कुडाळ), वाटुळ (ता. राजापूर) हे पाच कारखाने बंद पडले आहेत. जगन्नाथ रूफिंग स्टाइल्स (पिंगुळी), सहकारी कारखाना (नेमळे), महाराष्ट्र कौल इंडस्ट्रीज (आडेली) हे तीन कारखाने सुरू आहेत. तेही सलाईनवर आहेत.

माजी आमदार व कामगार नेते (कै.) जयानंद मठकर यांनी त्यावेळी कौल कारखाने सुरू राहावेत, यासाठी शासन दरबारी खूप प्रयत्न केले. त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने यादृष्टीने व्यवसायाकडे पाहिले नाही. आता तरी सर्व लोकप्रतिनिधींनी हा व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.

काैल कारखानदाराच्या प्रमुख मागण्या - 

  • मातीची रॉयल्टी रद्द करणे.
  • नदी तलावातील गाळ काढण्यास परवानगी देणे.
  • घरकुल योजना, अंगणवाडी, शाळा यांना कौले वापरणे सक्तीचे करणे.
  • वित्तीय संस्थाकडून कर्जपुरवठा करणे.
  • जळाऊ लाकूड वापरण्यास संधी द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com