कोकणातील धरण क्षेत्रे भीतीच्या छायेत 

कोकणातील धरण क्षेत्रे भीतीच्या छायेत 

तिवरे धरण दुर्घटनेमुळे कोकणात एका नव्या दहशतीला तोंड फुटले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात मिळून छोटी-मोठी 101 धरणे आहेत. याशिवाय काहींचे काम सुरू आहे. या धरण क्षेत्रात राहणाऱ्यांच्या मनात आता भितीने घर केलय. कोकणच्या नद्याची रचना, वेग, भौगोलीक, भूरूप रचना, प्राकृतिक रचना, इथे होणारे छोटे-मोठे भूकंप या सगळ्या गोष्टी उर्वरीत महराष्ट्राच्या तुलनेत खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे इथे केवळ धरणच नाही; तर जलसंधारणाची कोणतीही कामे करताना स्वतंत्र धोरण, निती ठरवणे गरजेचे आहे. जेणेकरून तिवरे दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.  

तिवरेची दुर्घटना 
चिपळूणपासून साधारण 40 किलोमीटरवरील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले तिवरे गाव धरण फुटीमुळे चर्चेत आले. खरे तर हे धरण नव्हे तर पाझर तलाव होता; पण दुर्घटनेची तीव्रता इतकी होती की यात एक अख्खी वाडी उद्‌ध्वस्त झाली. ही दुर्घटना कोकणातील जलसंधारण कामांबाबत एक खूप मोठा धडा मात्र घालून गेली. आजुबाजुच्या गावांमध्ये पाणी पातळी राखली जावी या हेतुने तिवरेत 1996ला या धरणाचे बांधकाम सुरू झाले. चिपळुणचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचे बंधू संतोष चव्हाण यांच्या खेमराज कन्स्ट्रक्‍शनने या मातीच्या प्रकल्पाचे काम 2000 मध्ये पूर्ण केले. अवघ्या 19 वर्षांत ही दुर्घटना घडली. यामुळे कोकणातील इतर धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र चर्चेत आला आहे. 

35 वर्षांपासूनची धरणे 
रत्नागिरी जिल्ह्यात छोटी-मोठी 68 आणि सिंधुदुर्गात 33 मिळून 101 धरणे आहेत. या शिवाय बऱ्याच प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तिलारी, देवघर, अरुणा, कोर्ले-सातोंडी, नातुवाडी, गडनदी, अर्जुना असे काही अपवाद वगळता बहुसंख्य धरणे छोटी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील आहेत. सिंधुदुर्गात तिलारी जलविद्युत, तिलारी आंतरराज्य ही मोठी देवघर, अरुणा, कोर्ले-सातंडी ही मध्यम तर शिवडाव, नाधवडे, ओटाव, दैंदोनवाडी, तरंदळे, आडेली, आंबोली, चोरगेवाडी, हातेरी, माडखोल, निळेली, ओरोस बुद्रुक, सनमटेंब, तळेवाडी डिगस, दाबाचीवाडी, पावशी, शिरवल, पुळास, वाफोली, कारिवडे, धामापूर, हरकुळ, ओसरगाव, ओझरम, पोईप, शिरगाव, इथवली, लोरे ही लघुपाटबंधारेकडची धरणे आहेत. याशिवाय पाणी पुरवठ्यासाठीही पाण्याखोलसारखी धरणे आहेत. 

काय आहे अवस्था? 
यातील बरेच प्रकल्प 30 ते 35 वर्षे जुने आहेत. शिवाय साठवण प्रकल्पांची संख्या जास्त आहे. यातील बहुसंख्य प्रकल्पांची दीर्घकाळ देखभाल दुरूस्ती झालेली नाही. अनेक धरणे गाळाने निम्मी अधिक भरली आहेत. यामुळे त्यांच्या साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. काही प्रकल्प तर पुरेसे पाणीच साठत नसल्याने निरूपयोगी ठरले आहेत. धरणच नाही तर कोकणात कोट्यवधीचा निधी खर्चुन उभारलेले बंधारे, तलाव हेही काही काळाने गाळाचा प्रश्‍न, निकृष्ट काम, चुकीची जागा आदी कारणाने निरूपयोगी बनतात. दुसरीकडे सिंधुदुर्गात पाणी पातळी खालावत आहे. यामुळे जलसंधारण प्रकल्पांची गरजही ठळक होत आहे. यातच आता धरणामुळे निर्माण होणाऱ्या अनामिक भीतीचे मोहोळ तयार झाले आहे. यातून एक विचित्र कोंडी तयार झाली असून तिवरेच्या घटनेनंतर ती अधिक जटील झाली आहे. 

पॅटर्नच चुकीचा 
ही कोंडी फोडण्यासाठीची बरीचशी उत्तरे येथील वैशिष्ट्यपूर्ण भूरूप रचनेत आहेत. महाराष्ट्रात जलसंधारण कामांचे स्वरूप सर्वत्र सारखेच आहे. यामुळे कोकणात उर्वरीत महराष्ट्राच्या रचनेचा प्राधान्याने विचार केलेली जलसंधारण कामांची निती वापरून धरणे, बंधारे उभारले जातात. याचाच भाग म्हणून येथे सऱ्हास मातीची धरणे, कोल्हापूर टाईप बंधारे यावर आत्तापर्यंत कोट्यवधीचा खर्च झाला आहे. प्रत्यक्षात कोकणची भौगोलीक रचना, येथील नद्या, त्यांचा वेग, लांबी यात इतर भागाच्या तुलनेत खूप मोठा फरक आहे. इतर भागात संथ वाहणाऱ्या मोठ्या, लांबलचक नद्यांची संख्या जास्त आहे. फारसे तीव्र उतार नाहीत. जमिनीची जलधारण क्षमता वेगळी आहे. 

भौगोलिक रचना अशी 
कोकणची निर्मितीच मुळात वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्वालामुखीपासून बसलेल्या कोकण किनारपट्टीवर कठीण अशा बेसॉल्ट खडकाचे प्रमाण जास्त आहे. असे असले तरी कोकणची निर्मिती सह्याद्री पर्वताच्या प्रस्तरभंगापासून झाली असल्याने काही भागात भूगर्भ अत्यंत कमकुवत आहे. सह्याद्रीपासून अरबी समुद्रापर्यंतची लांबी अवघी 80-90 किलोमीटरची आहे. इथल्या नद्याही उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत वेगळ्या आहेत. बहुसंख्य नद्या पश्‍चिमवाहिनी असून त्या सह्याद्रीमध्ये उगम पाऊन समुद्राला जावून मिळतात. उगमापासून मुखापर्यंतचा नदीचा प्रवाह एकंदर तीन टप्प्यात विभागाला जातो. नद्यांच्या उगमापासून पर्वत पायथ्यापर्यंत नदीचा वरचा टप्पा म्हणजे युवावस्था, पायथ्यानंतरची मंद उताराची प्रौढावस्था व सपाट, मंद उताराच्या प्रदेशातील नदीचा प्रवास म्हणजे वृद्धावस्था. कोकणात तीव्र उतारामुळे नद्याची युवावस्था अधिक असते. तीव्र वेगामुळे नद्यामुळे खनन किंवा अपक्षरण कार्य जास्त प्रमाणात होते. 

कशा येतात अडचणी? 
कोकणात धरण बांधताना सऱ्हास दोन डोंगरामधील चिंचोळ्या दरीचा भाग निवडला जातो. साहजिकच तेथे नदी युवा अवस्थेमुळे खळाळती, वेगवान असते. अशा ठिकाणी कोणताही जलसंधारण प्रकल्प राबवायचा झाल्यास तेथे पाया मजबूत असणे आवश्‍यक असते. धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भूगर्भातल्या खडकांचा प्रकार, पायाकरता योग्य खडकापर्यंत पोचण्यासाठी वरच्या थरांची खोली, खडकांची घनता, त्याची पारगम्यता, त्यातील पाण्याचे प्रमाण, वजन पेलण्याची क्षमता किंवा ताकद असे खडकांचे अभियांत्रिकी गुणधर्म माहित करून जागा निश्‍चित करणे आवश्‍यक असते; मात्र सऱ्हास आधी धरणाची जागा निश्‍चित केली जाते, पुर्नवसन, भूसंपादनाचा विचार होतो व मग भूरुप व इतर सर्व्हेचा केवळ सोपस्कार पार पाडला जातो. कमी खर्च असल्याने मातीच्या धरणाला व इतर जलसंधारण प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते. मातीचे धरण बांधतानाही मधल्या भागात चिकट मजबूत राहणाऱ्या काळ्या मातीचा वापर अपेक्षीत असतो; मात्र कोकणात काळी माती कमी प्रमाणात मिळत असल्याने सऱ्हास उपलब्ध लाल माती वापरली जाते. जलसाठा क्षेत्रात साचणाऱ्या गाळाची, धरण देखभालीचा फारसा विचार होत नाही. 

भूकंपाचाही विचार हवा 
जलसंधारण प्रकल्पांसाठी भूकंप हाही अडचणीचा असतो. धरण किंवा जलसाठवणीच्या सर्व प्रकल्पात पायावर प्रचंड ताण असतो. अगदी छोट्या भूकंपाचाही या पायावर प्रभाव पडत असतो. कोकणात भूकंपाचा फार प्रभाव पडत नाही, असा सार्वत्रिक समज आहे; मात्र अशा प्रकल्पाच्या बांधकामावर प्रभाव पडतच असतो हे अनेक धरण क्षेत्रातील भूकंपाचे आकडेच बोलतात. कोयनेच्या क्षेत्रात 1967 ते 2017 या काळात 1 लाख 20 हजार 315 छोटे-मोठे भूकंपाचे धक्के बसले आहेत. यावरून अशा प्रकल्पाच्या बांधकामात या घटकाचा किती मध्यवर्ती विचार करायला हवा याची कल्पना येते. प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टींचा किती गांभीर्याने विचार होतो हा प्रश्‍न आहे. 

स्वतंत्र जलनितीची गरज 

एकूणच कोकणसाठी जलसंधारण प्रकल्पांची गरज आहेच; मात्र ते उभारताना येथील भौगोलिक स्थितीचा प्राधान्याने विचार व्हायला हवा. ज्या जागेत जोड आणि प्रस्तरभंग आहेत त्यांची आजची स्थिती, पुन्हा भूकंप होण्याची शक्‍यता आणि त्याची क्षमता अभ्यासणे गरजेचे असते. गाळ साचण्याचे प्रमाण लक्षात घेवून त्याचा ठराविक काळानंतर उपसा करण्याची व्यवस्था मूळ प्रकल्पात गरजेची आहे. पक्के बंधारे बांधण्यासाठीही कोकणसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान, धोरण निश्‍चित करण्याची गरज आहे. थोडक्‍यात कोकणसाठी स्वतंत्र जलसंधारण निती निश्‍चित करण्याची गरज आहे. यासाठी निधीची तरतुद करण्याबाबतही स्वतंत्र धोरण आवश्‍यक आहे. 

कोकणची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुळात या भागाची निर्मिती प्रस्तरभंगातून झाली आहे. यामुळे जलसंधारणाचा कोणताही प्रकल्प राबवताना तेथील भूरूपचा, भू-रचनेचा, प्राकृतिक रचनेचा अभ्यास आवश्‍यक आहे. त्या भागातील भूकंप स्थितीही लक्षात घ्यावी. यासाठी धरण व इतर जलसंधारण प्रकल्प राबविताना भूगर्भ शास्त्रज्ञांचा सल्ला गरजेचा आहे.'' 
- प्रा. हसन खान,
भूगर्भ अभ्यासक. 

लघुपाटबंधारेच्या कार्यकक्षेतील सर्व धरणांच्या पाण्याचा वापर होतो. पोईप व ओसरगाव येथील पाण्यासाठ्याबाबत काही अडचणी आहेत. त्याचा अहवाल शासनाला कळवला आहे. यावर्षी धरणांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट झाले. त्यानुसार काही धरणांच्या दुरूस्तीची शिफारस केली होती. ती दुरूस्ती तत्काळ झाली आहे. जिल्ह्यातील धरणांना धोका नाही. कर्मचारी वेळोवेळी पाहणी करतात. धोका संभवल्यास तातडीने आवश्‍यक पावले उचलली जातात. 
- विलास गोसावी,
शाखा अभियंता, लघुपाटबंधारे विभाग 

सिंधुदुर्गातील धरणांचे  बुडीत क्षेत्र हेक्‍टरमध्ये 

चोरगेवाडी57.70 
हातेरी45.34 
निळेली30.35 
ओरोस31.25 
तळेवाडी43.05 
दाभाचीवाडी54.65 
पावशी72.00 
पुळास26.00 
हरकुळ56.68 
पोईप38.00 
ओझरम36.00 
लोरे68.445 
ओसरगाव25.59 
तिथवली30.23 
शिरगाव26.20 
धामापूर43.30 
आडेली70.00 
सनमटेंब46.00 
कारिवडे18.00 
ओंबोली18.60 
शिरवल45.34 
वाफोली34.82 
माडखोल41.986 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com