फुकटच्या श्रेयासाठी राणेंचे चिखलफेक आंदोलन 

फुकटच्या श्रेयासाठी राणेंचे चिखलफेक आंदोलन 

कणकवली - येथे झालेले चिखलफेक आंदोलन हे फुकटचे श्रेय घेण्यासाठी होते. ती एक प्रकारची स्टंटबाजी होती. खरं तर आम्ही आदेश दिल्यानंतर हायवेची कामं सुरू झाली. आता पुढील पंधरा दिवसांत शहरात महामार्ग दुतर्फा सर्व अतिक्रमण हटविण्यात येतील आणि महामार्ग मोकळा करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

पालकमंत्री केसरकर यांनी हायवे अधिकाऱ्यांसमवेत झाराप ते खारेपाटण असा महामार्ग पाहणी दौरा केला. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, भाजपचे युवा नेते संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, महेश सावंत, शेखर राणे यांच्यासह इतर शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

श्री. केसरकर म्हणाले, ""झाराप ते खारेपाटण असा दौरा आज केला. यात कणकवली शहरातील सर्व्हिस रोड पूर्ण करणे, धोकादायक इमारती पाडणे, महामार्गावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पुढील 15 दिवसांत कणकवली शहरातील महामार्ग निश्‍चितपणे मोकळा होईल. सर्व खड्डे डांबराने पुन्हा बुजविण्यात येतील. याखेरीज नाल्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचेही निर्देश ठेकेदारांना दिले आहेत.'' 

ते म्हणाले, ""हायवेच्या समस्यांबाबत कणकवलीकरांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले होते. त्याची तातडीने दखल घेऊन मुंबईत सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात हायवे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच 30 जूनला सिंधुदुर्गात हायवे, पोलिस, परिवहन, महसूल आदी सर्व विभागांची बैठक घेतली. यामध्ये 15 दिवसांत हायवेच्या सर्व समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हायवेची कामे देखील सुरू झाली. ही कामे सुरू झाल्याचे लक्षात येताच शहरातील काही नेतेमंडळींनी फुकाचे श्रेय घेण्यासाठी गडनदीपुलावर आंदोलन केले. तेथे हायवे उपअभियंत्यांवर चिखलफेक करण्यात आली. असे प्रकार पुन्हा होऊ देणार नाही. जे कुणी चौपदरीकरणाच्या कामात आडकाठी आणतील त्यांच्यावर कडक कारवाई होणारच आहे.'' 

सूडबुद्धीने कारवाई नाही 
चिखलफेक आंदोलनानंतर आंदोलकांवर सूडबुद्धीने कारवाई झाली, हा आरोप पालकमंत्र्यांनी फेटाळला. सूडबुद्धीने कारवाई केली असती तर यातील काही आरोपींना रुग्णालयातही ठेवू दिले नसते. तातडीने पोलिस कोठडीत ठेवले असते. तसेच साडेचार वर्षांत सूडबुद्धीने कारवाई केल्याचे एक तरी उदाहरण दाखवा, असे पालकमंत्री केसरकर म्हणाले. 
 
चौकशीनंतरच गुन्हा 
तेर्से बांबार्डे येथील अपघातात ट्रक चालकाचा बळी गेला. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणी हायवे ठेकेदाराची चूक असल्याचे आढळून आले तर निश्‍चितपणे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे केसरकर म्हणाले. 

पोलिस बंदोबस्त 
कणकवली शहरात हायवे चौपदरीकरण कामासाठी 20 पोलिस तैनात केले आहेत. ते हायवे ठेकेदाराच्या सुरक्षिततेसाठी आणि आंदोलने दडपण्यासाठी आहेत का? या प्रश्‍नावर बोलताना हे पोलिस जनतेच्या कामांसाठी आहेत. बीएसएनएलची लाइन टाकताना कामगारांना मारहाण होते. असे प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त असल्याचा खुलासा पालकमंत्र्यांनी केला. 

राजकीय दबाव नको 
कणकवली महामार्गावर टपऱ्या, वाहने उभी करून महामार्गाच्या कोंडीत भर टाकली जातेय. धोकादायक इमारतींमुळेही नागरिकांच्या जीवितास धोका आहे. ही सर्व अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटविण्यात येतील; मात्र अशी कारवाई करताना कुणीही राजकीय दबाव आणू नका, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com