धमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव 

धमकीचा निरोप खुनाचा वाटून धावाधाव 

संगमेश्वर - खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एकाने भावाला तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या सैन्यातील मुलाला ही धमकी कळवली. त्याने मारून टाकले, अशा समजुतीने ही माहिती त्याने वरिष्ठांना सांगितले आणि सैन्यातून पोलिसांना खून शोधण्याचा फतवा आला. यातून घडले ते "अगा जे घडलेच नाही' असे नाट्य. 

गणेश विसर्जन शांततेत पार पडले, म्हणत संगमेश्वर पोलिस निःश्‍वास टाकतायत तोच रात्री आठच्या सुमारास हेडऑफिसमधून फोन आला. नायरी निवळी धनगरवाड्यात एका वृद्धाचा खून झाला असून त्याचा मृतदेह जंगलात टाकल्याची खबर मिळाली. लष्कर शिपाई बावधने याचे वडील दत्ताराम बिरु बावधने (62) हे नायरी निवळी धनगरवाड्यात राहत असून त्यांचा, भाऊ सखाराम ऊर्फ चिंगळ्या बावधने (56) याने खून केला आहे. त्यांचा मृतदेह जंगलात पडला आहे. मुख्यालयात रिपोट करा, असा संदेश आला.

त्यानुसार अकरा जणांचे पथक निवळीत पोहोचले. स्थानिकांना बरोबर घेऊन पोलिस धनगरवाड्यात दाखल झाले. पोलिस पाहून ग्रामस्थांना धक्का बसला. येथे खुनाचा प्रकार घडला नाही, दत्ताराम व त्याचा भाऊ चिंगळ्या यांचे किरकोळ भांडण झाले, असे सांगत ग्रामस्थांनी दत्तारामला हजरच केला.

दोघांचे जमिनीवरून भांडण आहे. कडाक्‍याच्या भांडणात दत्तारामाला किरकोळ दुखापत झाली. त्यावेळी चिंगळ्याने तुझे दोन्ही पाय तोडून जंगलात टाकतो, अशी धमकी दिली.

तुझ्या बापाला काकाने ठार मारून हात पाय तोडून जंगलात मारून टाकण्याची धमकी दिली, ही माहिती लष्करात असणाऱ्या मुलाला दिली. तेव्हा मुलाने हात-पाय तोडून मारले एवढेच ऐकले व घाबरून त्याने ही माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी पोलिस मुख्यालयात फर्मान काढले. त्यातून पुढील प्रकार घडला. पोलिसांना तपशील कळताच भावाला मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे या आरोपाखाली चिंगळ्याला ताब्यात घेण्यास गेले, तेव्हा तो फरार झाल्याचे आढळले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com