Ratnagiri Dam Mishap : छोटीचा मृतदेह मिळाला नाही ही खंत!

Ratnagiri Dam Mishap : छोटीचा मृतदेह मिळाला नाही ही खंत!

चिपळूण - कोकणातील दऱ्या - खोऱ्यांमधील धरण क्षेत्रात शोधमोहिमेत येणाऱ्या अनंत अडचणी भेंदवाडीत संपर्क यंत्रणेचा अभाव, नदी प्रवाहात कोठूनही अचानक लोंढा येण्याची शक्‍यता अशा स्थितीत शोध कार्यासाठी भौगोलिक परिघ दिवसागणिक वाढला. चाळीस किलोमीटर लांबीवरील वाशिष्ठीपासून धरणापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने उलट तपास करीत शोध घेण्यात आला. तेवीसपैकी केवळ सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह मिळाला नाही, ही खंत शोध मोहिमेचे नेतृत्व करणारे कमांडर सचितानंद गावडे यांनी व्यक्त केली. 

तिवरेतून वाहून गेलेल्यांची दाभोळ खाडीपर्यंत शोधमोहीम सुरू होती. वाहून गेलेल्यांचा शोध घेण्याची जबाबदारी एनडीआरएफ जवानांवर टाकण्यात आली. जोडीला रत्नागिरी व आसपासची स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोकांचाही सहभाग होता. या मोहिमेचे नेतृत्व करणारे सचितानंद गावडेंनी त्यांच्या समोरील अडचणी सांगत होते.

आधी धरण क्षेत्रात एनडीआरएफने अपवादानेच काम केले. धरण क्षेत्राचा जवानांनी बुधवारपासून ताबा घेतला. शोध मोहीम सुरू करताना भेंदवाडीत अडथळे लक्षात आल्यामुळे क्विकली डिप्लोऐबल ऍन्टीना वापरून सेटेलाईट फोनचा वापर केला. त्यामुळे फोटो, व्हिडिओ पाठवणे तसेच फोन व व्हिडिओ कॉलिंग करणे सोपे झाले. धरण क्षेत्राच्या नकाशातून पाण्याचा प्रवाह वाशिष्ठीला कसा मिळाला याची मनोमन खूणगाठ साऱ्यांनी बांधली. सुरवातीला धरणाजवळच्या गाळात मृतदेह अडकल्याचा अंदाज घेऊन जेसीबीचा उपयोग केला. पहिल्या दोन दिवसांत धरणापासून चार ते दहा किलोमीटरच्या पट्ट्यात शोधमोहीम सुरू होती. मात्र तीन दिवसानंतर मृतदेह वाशिष्ठीपर्यंत 35 कि.मी दूरवर गेल्याचे लक्षात आल्यावर शोधाचा परिघ वाढवावाच लागला. एनडीआरएफने यामध्ये मोठी भूमिका बजावली. 

जणू मार्गदर्शकाचेच काम केले 
मृतदेह शोधण्यासाठी बाहेरून येणाऱ्यांना स्थानिक अथवा नदी, खाडीच्या काठावरील कातकरी, भोई यांचाच उपयोग झाला, असे गावचे मंगेश शिंदे यांनी सांगितले. पाणी उलट सुलट कोठे जाईल कोणत्या जाळीत मृतदेह अडकू शकतात, हे त्यांच्या अनुभवाने स्थानिक ठामपणे सांगू शकतात. याचा प्रत्यय या शोधमोहिमेत आला. आकले गावच्या ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळाले. मृतदेह शोधताना त्यांनी जणू मार्गदर्शकाचेच काम केले, अशी कबुली एनडीआरएफने दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com