विजयची कमाल अन् भारताने 500 व्या वनडे विजयाचा उधळला गुलाल

australia
australia

नागपूर : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा अवघ्या आठ धावांनी निसटता पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्‍कम आघाडी घेतली. या विजयासह भारताने नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्‌ध शंभर टक्‍के रेकॉर्ड कायम ठेवत विजयाचा चौकारही मारला. शतकावीर विराट कोहली व तीन बळी टिपणारा कुलदीप यादव भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. 

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या षटकात अकरा धावांची आवश्‍यकता असताना विजय शंकरने मार्कस स्टॉईनिस व ऍडम झम्पाला बाद करून भारताच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. मार्कस स्टॉईनिस (65 चेंडूंत 52 धावा) व पीटर हॅण्डस्कॉम्ब (59 चेंडूंत 48 धावा) यांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. फिरकीपटू कुलदीप यादवने तीन आणि जसप्रीत बुमराह व विजयशंकरने प्रत्येकी दोन गडी बाद करून विजयात निर्णायक योगदान दिले. विजयासाठी 251 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षट्‌कात 242 धावांत आटोपला. कर्णधार आरोन फिंच व उस्मान ख्वाजाने 83 धावांची मजबूत सलामी देत संघाला दमदार सुरूवात करून दिली. मात्र त्यानंतर नियमित अंतराने गडी बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला. फिंचने 37, ख्वाजाने 38 धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताला पुन्हा एकदा सलामीच्या जोडीने अपयशाची मालिका कायम राखली. या वेळी रोहित शर्माने निराशा केली. त्याला भोपळाही फोडता आला नाही. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारताची ही सुरवात नक्कीच निराशाजनक होती. शिखर धवनही फार काळ तग धरू शकला नाही. अंबाती रायुडू यानेही कर्णधाराला साथ देण्याची तयारी दाखवली नाही. अशा वेळी विजय शंकरने अष्टपैलूत्व सिद्ध करताना कोहलीला साथ केली. कोहलीला त्याच्याकडून मिळालेली साथ वगळता अन्य भारतीय फलंदाजांनी साफ निराशा केली. संयमाचा अभाव आणि आततायीपणामुळे त्यांना जेमतेम अडीचशेचीच मजल शक्‍य झाली. 

पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाल्यावर विजय शंकरने कोहलीला साथ केली. कर्णधार एका बाजूने लढत असताना, विजयने दुसऱ्या बाजूने धाडसी फटके मारण्याचा धोका पत्करला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 71 चेंडूंत 81 धावांची भागीदारी केली. ही जोडी केवळ दुर्दैवाने फुटली. झम्पाला सरळ टोलाविल्यावर चेंडू झम्पाच्या हाताला लागून यष्ट्यांवर आदळला आणि त्या वेळी धाव घेण्यासाठी काहिसा पुढे आलेला विजय शंकर धावबाद झाला. त्याने 41 चेंडूंत 46 धावा केल्या. केदार आणि विराट एकत्र आल्याने भारताला अजून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र, झम्पाने एका षटकात लागोपाठच्या चेंडूवर केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी यांना बाद करून भारताला धक्का दिला. त्यानंतर एकांड्या शिलेदार कोहलीला रवींद्र जडेजाची थोडीफार साथ मिळाली. कोहलीने या दरम्यानच्या षटकांत एकदिवसीय कारकिर्दीमधील 40वे शतक पूर्ण केले. पण, भारताचे तळाचे फलंदाज पॅट कमिन्ससमोर टिकू शकले नाहीत.

जडेजा सहावा क्रिकेटपटू 
अष्टपैलू रवींद्र जडेजाने आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन हजार धावा आणि शंभर बळी पूर्ण करण्याची कामगिरी केली. असा बहूमान मिळविणारा तो भारताचा सहावा क्रिकेटपटू ठरला. जडेजाला दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी दहा धावांची आवश्‍यकता होती. जडेजाच्या अगोदर माजी कर्णधार कपिल देव, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व युवराजसिंगने अशी कामगिरी केली होती. या सामन्यात विराटनेही वनडे कारकीर्दीतील एक हजार चौकार पूर्ण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com