शिवसेना, स्वाभिमानमध्ये थेट लढाई

शिवसेना, स्वाभिमानमध्ये थेट लढाई

युती झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. ‘एकला चलो’चा नारा देत निवडणूक तयारीला लागलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानचे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याने त्यांना ‘व्होट बॅंक’ टिकवण्यासाठी झगडावे लागेल. सेनेतर्फे विनायक राऊत, स्वाभिमानतर्फे डॉ. नीलेश राणे यांची उमेदवारी पक्‍की असली तरी काँग्रेसतर्फे नविनचंद्र बांदिवडेकर यांना तिकीट मिळण्याची शक्‍यता आहे. थेट लढती असल्या तरी अंतर्गत फोडाफोडी, फंदफितुरीला ऊत येण्याची शक्‍यता आहे.

गेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निकालाचा विचार करता दोडामार्ग ते चिपळूणपर्यंत पसरलेल्या या लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा प्रभाव आहे. गेल्या साडेचार वर्षांत येथे सत्तेच्या जोरावर भाजपनेही पाय रोवले आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने शिवसेनेसाठी ही लढत सोपी झाली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाने सगळ्यात आधी येथे निवडणूक तयारी सुरू केली आहे.

धडाकेबाज आरोप-प्रत्यारोप, स्थानिक प्रश्‍नांवर सत्ताधाऱ्यांविरोधात राळ उठवत वातावरणनिर्मितीही सुरू केली आहे. राणेंची वैयक्तिक क्रेझ, निवडणूक लढण्याची शैली याच्या जोरावर शिवसेनेसमोर त्यांचे प्रमुख आव्हान असणार आहे. काँग्रेस आघाडीतर्फे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर आणि भंडारी महासंघाचे नेते नविनचंद्र बांदिवडेकर यांची नावे चर्चेत आहेत; मात्र मुणगेकर यांचा विचार मुंबईत उमेदवारीसाठी होऊ शकतो. यामुळे बांदिवडेकर यांच्या उमेदवारीची शक्‍यता जास्त आहे.

शिवसेनेचे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कणकवली वगळता उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे. शिवसेनेचे सचिवपद असल्याने त्याचे उमेदवार विनायक राऊत यांचे संघटनेवर पूर्ण नियंत्रण आहे. राऊत यांनी विकासकामे किती केली यापेक्षाही त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे असलेले वर्चस्व ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू असणार आहे. मध्यंतरी नाणार रिफायनरी विरोधावरून वादळ उठले होते. युतीची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारची प्रक्रिया थांबवणार असल्याचे सांगतानाच याचे श्रेय शिवसेनेला मिळेल, याची काळजी घेतली. याचा फायदाही राऊत यांना होऊ शकतो.

भाजपतर्फे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जात होता; मात्र ही जागा शिवसेना सोडण्याची शक्‍यता जवळपास नाही. मुळात बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात भाजपला घुसण्याची संधी शिवसेना देणार नाही. शिवसेनेचे राजकीय शत्रू असलेल्या नारायण राणे यांनी येथून नीलेश राणेंची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे. यामुळे ही जागा भाजपला सोडल्यास शिवसेनेने लढाईतून माघार घेतल्याचा संदेश जाऊ शकतो. तो त्यांना परवडणार नाही. यामुळे भाजपला येथे शिवसेनेला मदत केल्याशिवाय पर्याय नाही.

गेल्या लोकसभेच्या तुलनेत भाजपची मते वाढली आहेत. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या स्थानिक पातळीवरील दिग्गज नेत्यांकडे बऱ्यापैकी ‘व्होट बॅंक’ आहे. राष्ट्रीय पातळीवरील राजकारण पाहून आणि मोदी फॅक्‍टरमुळे मतदान करणारे युतीचा घटकपक्ष म्हणून शिवसेनेकडेच वळतील, असे चित्र आहे. अर्थात शिवसेनेच्या राऊत यांना भाजपलाही विश्‍वासात घेऊन प्रचार करावा लागणार आहे. अन्यथा अंतर्गत नाराजीतून काही प्रमाणात फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

भाजपचा थेट उमेदवार असता तर शिवसेनेसाठी आव्हान तगडे झाले असते; मात्र युतीमुळे मतविभागणीचा धोका कमी झाला आहे. शिवसेनेसाठी ही चांगली स्थिती असली तरी अंतर्गत फंदफितुरी रोखण्याचे आव्हान त्यांच्यासाठी स्वपक्षाबरोबरच भाजपबाबतही असणार आहे.

आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडेच राहण्याची शक्‍यता आहे. येथे काँग्रेसला मानणारी ‘व्होट बॅंक’, भाजपविरोधी मतदार, याचा फायदा त्यांना होणार आहे. भंडारी महासंघाचे पदाधिकारी बांदिवडेकर यांना उमेदवारीची शक्‍यता आहे. तसे झाल्यास भंडारी समाजाची मते बहुसंख्येने काँग्रेसकडे वळू शकतात. अल्पसंख्याक समाजाच्या मतांचाही काँग्रेसला फायदा होतो. रत्नागिरी काही भाग आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघ वगळता राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव या मतदारसंघात नाही. राष्ट्रवादीची मते आपल्याकडे वळवण्यासाठी विधानसभा मतदारसंघ वगळता राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव या मतदारसंघात नाही. राष्ट्रवादीची मते आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेस काय रणनीती आखते यावरही त्यांच्या मतांची संख्या ठरणार आहे.
एकूणच या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

संघटनात्मकदृष्ट्या अधिक ताकद असलेल्या शिवसेनेला शह देण्यासाठी स्वाभिमान आणि काँग्रेसला फोडाफोडीचे राजकारण करावे लागणार आहे. स्वाभिमानला सिंधुदुर्गात जास्त मते मिळवावी लागणार आहेत. 

सावंतवाडी मतदारसंघ 
या मतदारसंघात शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा प्रभाव आहे; मात्र अलीकडे त्यांच्या कमी झालेल्या संपर्कामुळे मतदारात नाराजीचा सूर आहे. असे असले तरी मतदारसंघाची नस माहिती असल्याने व येथे शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांची संख्या लक्षात घेता ही नाराजी फारशी प्रभावी ठरेल, असे चित्र नाही. आगामी विधानसभेची गणिते लक्षात घेता केसरकर यांना लोकसभेसाठी पूर्ण ताकद लावल्याशिवाय पर्याय नाही. या मतदारसंघात माजी आमदार राजन तेली यांनी भाजपची ताकद वाढवली आहे; मात्र युतीमुळे त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. तेली भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवून आहेत. त्यांची शिवसेनेला किती साथ मिळणार यावरही बरीच गणिते अवलंबून आहे. या मतदारसंघात राणेंना मानणाऱ्या मतदारांची संख्याही मोठी आहे. स्वाभिमानतर्फे विधानसभेसाठी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब इच्छुक आहेत, ते माजी खासदार नीलेश राणे यांना गॉडफादर मानतात. दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्‍यातही राणेंना मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्वाभिमानचे संघटनात्मक केजही चांगले असल्याने शिवसेना आणि स्वाभिमानमध्ये येथे कडवी झुंज होईल. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, कार्याध्यक्ष विलास गावडे याच मतदारसंघातील असल्याने त्यांनाही ताकद लावावी लागणार आहे.

कुडाळ मतदारसंघ
मूळ नारायण राणेंचा मतदारसंघ असलेल्या या जागेवर गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक निवडून आले होते. नाईक यांनी जनसंपर्क बऱ्यापैकी टिकवून ठेवला आहे. खासदार राऊत यांचा हा घरचा मतदारसंघ आहे. विविध विकासकामे आणि त्यांचा प्रभावी प्रचार याच्या जोरावर गावागावांत शिवसेना पोचवण्याचा प्रयत्न झाला आहे. अर्थात येथे स्वाभिमानचे बळही चांगले आहे. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा चांगला प्रभाव आहे. स्वतः राणेंना मानणाऱ्या मतदारांची संख्याही मोठी आहे. यामुळे दोन्ही पक्षात येथे तोडीस तोड लढत अपेक्षित आहे. भाजप तुलनेत कमजोर असली तरी गेल्या साडेचार वर्षात येथे मतदारसंख्या वाढली आहे, तरी शिवसेनेच्या पाठीशी राहणार की नाही, हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसला येथे पारंपरिक मतदारांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. येथे मच्छीमार समाजाचा प्रभाव आहे. ही मते कोणाच्या पारड्यात पडतात यावर बेरीज-वजाबाकी ठरणार आहे.

कणकवली मतदारसंघ
राणेंचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात स्वाभिमान किती मोठे मताधिक्‍य मिळवते, यावर एकूण निकाल प्रभाव टाकणार आहे. आमदार नीतेश राणे यांनी या मतदारसंघात प्रभावी संघटनात्मक काम केले आहे. याशिवाय जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत आदी दिग्गजांची स्वाभिमानला मिळणारी साथ ताकद वाढवणारी ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपचा प्रभाव आहे. शिवसेना-भाजपची साथ मिळवण्यात किती यशस्वी ठरते, यावर त्यांची येथील मतसंख्या ठरणार आहे.

राजापूर मतदारसंघ
नाणार रिफायनरी प्रकल्पाचा प्रभाव या मतदारसंघात आहे. येथे शिवसेनेची ताकद जास्त आहे. मध्यंतरी नाणारच्या मुद्द्यावर शिवसेनेला नाराजीचा सामना करावा लागला होता; पण युतीच्या घोषणेवेळी मुख्यमंत्र्यांनी नाणार थांबवण्याचे आश्‍वासन दिल्याने त्याचा फायदा शिवसेनेला मिळू शकतो. शिवसेनेत स्थानिक पातळीवर अंतर्गत गटबाजीही आहे. आमदार राजन साळवी यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी म्हणून आमदार उदय सामंत यांच्याकडे पाहिले जाते. अलीकडे संघटनात्मक पदांच्या वाटपात सामंत गटाला झुकते माप मिळाल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे सचिवपद असल्याने हे झुकते माप खासदार राऊत यांनी दिल्याचा राजकीय अर्थ यातून काढला जातो; मात्र अंतर्गत गटबाजी, आगामी विधानसभेच्या लढती विचारात घेता साळवी यांना लोकसभेत राऊत यांच्यासाठी पूर्ण ताकद लावावीच लागणार आहे. येथे भाजप आणि शिवसेनेत फारसे 
सख्य नाही. भाजपची ताकदही मर्यादीत आहे; मात्र पुढची गणिते पाहता शिवसेनेला भाजपशी जुळवून घ्यावे लागणार आहे. येथे स्वाभिमानने चांगली वातावरण निर्मिती केली आहे. बरेच पक्ष प्रवेशही घडवून आणले. याचा प्रभाव मतदानावर किती होतो यावर राजकीय गणिते ठरणार आहेत. काँग्रेसमधील काही मते, शिवसेनेतील अंतर्गत नाराजी याचा फायदा स्वाभिमानला होवू शकतो. काँग्रेसला येथे पारंपरिक मतदारांवरच अवलंबून रहावे लागण्याची शक्‍यता आहे.

रत्नागिरी मतदार संघ
या मतदार संघात शिवसेनेच्या उदय सामंत यांची ताकद आहे. राऊत यांच्याशी असलेले सख्य लक्षात घेता ते पूर्ण ताकद लावणार यात शंका नाही; मात्र भाजपची ताकदही बऱ्यापैकी आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने आणि सामंत यांच्यात राजकीय स्पर्धा आहे. यामुळे भाजप शिवसेनाला किती मनापासून मदत करणार हा प्रश्‍न आहे. स्वाभिमानने येथे चांगली वातावरण निर्मिती केली आहे. पक्ष प्रवेश घडवून आणून काही भागात बऱ्यापैकी प्रभाव टाकला आहे. राणेंना मानणारे मतदारही येथे आहेत. भाजपची काही मतेही त्यांच्याकडे वळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. काँग्रेसला पारंपरिक मतांचा फायदा घेणार आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेले मतदारही येथे आहेत. ते कोणाला साथ देणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

चिपळूण मतदार संघ
या मतदार संघात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. भाजपशी युती झाल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे; मात्र स्वाभिमाननेही येथे चांगली वातावरण निर्मिती केली आहे. राणेंना मानणारी व्होट बॅंक येथे आहे. राष्ट्रवादीचे शेखर निकम कोणाला साथ देतात यावरही बरीच गणिते अवलंबून आहे. काँग्रेसकडे येथे पारंपरिक मते आहेत; मात्र संघटनात्मक पातळीवर त्यांची फारशी फळी नाही. निकम त्यांना आपली पूर्ण ताकद देणार का हा प्रश्‍न आहे. राणेंशी राजकीय शत्रूत्व असलेल्या राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय काँग्रेसचे रमेश कदम कितपत साथ देणार यावरही काँग्रेसच्या मतांची संख्या ठरणार आहे.

स्वतःचा पक्ष घेऊन नारायण राणे प्रथमच मैदानात...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदाच स्वतःचा पक्ष घेऊन मोठ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. यामुळे या लढतीत स्वाभिमानला आणि राणेंना माणणारी मते त्यांच्याकडे वळणार आहेत. सिंधुदुर्गात असलेले राजकीय वर्चस्व, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता, संघटनात्मक बळ ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. त्यांनी नीलेश राणेंची उमेदवारीही जाहीर केली आहे. निवडणूक लढवण्याची आक्रमक शैली राणेंकडे आहे. याचा फायदाही त्यांना होऊ शकतो. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजीचा फायदा उठवल्याचा प्रयत्नही स्वाभिमानकडून केला जाणार आहे. सध्या आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गाकडे, तर माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी रत्नागिरीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com