पवारांची माढ्यातील एन्ट्री पूर्वनियोजितच!

Sharad-Pawar
Sharad-Pawar

सातारा - शरद पवारांच्या कृतीचा अंदाज बांधणे कठीण म्हटले जात असले, तरी कोणतीही कृती ते विचारपूर्वकच करत असतात. त्यातून जो संदेश घ्यायचा, तो कार्यकर्ते घेत असतात. लोकांनाही कालांतराने या कृतीचे कारण स्पष्ट होत जाते. आताही माढा मतदारसंघातील गेल्या चार वर्षांतील शरद पवारांचे कार्यक्रम, त्यांनी केलेल्या भेटी-गाठी तसेच घेतलेल्या निर्णयांचे अन्वयार्थ आता लोक काढू लागले आहेत. त्यातून माढा मतदारसंघातील एन्ट्री अचानक नसून पूर्ण अभ्यास व नियोजनपूर्वकच असल्याचे समोर येत आहे.

२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय झाला. या पुढे थेट लोकांमधून निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र, पवारांच्या मनात काय असू शकते, याचे केवळ अंदाजच बांधले जाऊ शकतात. याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. तशीच आता त्यांच्या माढा मतदारसंघातून मैदानात उतरण्याच्या निर्णयातही दिसत आहे. २०१४ मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच पवारांना २०१९ च्या निवडणुकांचे निकाल कोणत्या स्तरावर येऊ शकतात, याचा अंदाज पुरेपूर आला होता की काय, अशी म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली दिसते. कारण पवारांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय आताच आणि अचानक घेतला, असे त्यांना ओळखणाऱ्या कार्यकर्त्यांना व लोकांनाही पटणारा, रुचणारा नाही. त्यासाठी त्यांच्याकडून दाखले दिले जात आहेत.

सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदींनी संसद आदर्श ग्राम अभियान सुरू केले. पुणे, सातारा मतदारसंघाऐवजी पवारांनी माढा मतदारसंघातील एनकूळ या गावाची निवड केली. हा निव्वळ योगायोग म्हणायचा का? या गावातील शाळेसाठी पवारांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले. त्याचा मोठा कार्यक्रमही झाला. त्यानंतर पवारांची वारंवार माढा मतदारसंघामध्ये सक्रियता वाढलेली होती. खरे तर, प्रभाकर देशमुख यांच्या निवृत्ती समारंभावेळी पवारांनी त्यांच्यावर काही जबाबदारी सोपवण्याचे सूतोवाच केले होते. त्याच वेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. फलटण-माण या जिल्ह्यातील मतदारसंघाचे सोडा. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातील तालुक्‍यांतील लोकांना प्रभाकर देशमुख हे लोकसभेचे उमेदवार असतील हे पटत नव्हते. मात्र, प्रभाकर देशमुख सक्रिय झाल्याने विजयसिंह मोहिते-पाटील लोकसभेला नसतील, एवढी खात्री त्यांना पटायला लागली होती.

माण-खटावमध्ये जलसंधारणाच्या कामाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी पवारांनी आपल्या दौऱ्याच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंतचा संपर्क कायम ठेवला होता. माणच्या दौऱ्यामध्ये केवळ दोन तासांच्या प्रवासातच जलसंधारणासाठी पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचे कसब दाखवून त्यांनी लोकांवर आपली छाप पाडली होती. महिमानगडच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या कायापालटासाठी त्यांनी केलेल्या कामाचीही चर्चा झाली होती.

बेरजेचे राजकारण...
माण दौऱ्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत गाडीतून फिरून बेरजेचे काम साधले होते. पवारांची ही कृती त्यांच्या माढ्याच्या पुढच्या रणनीतीचाच एक भाग होती, असे आता बोलले जाऊ लागले आहे. गेल्या चार वर्षांत माढा मतदारसंघाएवढे काम व दौरे पवारांनी कुठेच केले नाहीत. त्यामुळे त्यांची माढ्यावरील स्वारी पूर्वनियोजित तयारीचा भाग होता आणि पूर्ण तयारीनिशीच ते मैदानात उतरलेत, असे कार्यकर्ते ठामपणे सांगू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com