माढ्यात पवारांच्या एन्ट्रीने भाजप हतबल

Madha-Loksabha Constituency
Madha-Loksabha Constituency

स्वाभिमानीच्या हातातून २०१४ च्या निवडणुकीत सुटलेला माढा लोकसभा मतदारसंघ यंदा मिळवण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली होती. राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव बाजूला सारत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी २०१९ ची निवडणूक माढ्यातून लढण्याचे संकेत दिले आहेत. पवार यांच्या विरोधात लढण्यासाठी तगडा उमेदवार सध्या तरी भाजपकडे नसल्याने माढ्याची जागा भाजप मित्रपक्षाला देणार की सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा उभे करणार, याबाबत उत्सुकता आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई यांचा २००४ च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत आताचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पराभव केला होता. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची संधी सुभाष देशमुखांना मिळाली. देशमुख पराभूत झाले, त्याचे राजकीय आणि इतर फटके त्यांना अद्यापही सहन करावे लागताहेत.

सहकारमंत्रीपदावर आल्यापासून देशमुख सेबी, बेकायदा बंगला, निवडणूक कालावधीत सापडलेली रोख रक्कम, शेतकऱ्यांच्या नावावर लोकमंगल कारखान्याने परस्पर उचललेले कर्ज, लोकमंगल दूध भुकटी प्रकरण, तूरडाळ प्रकरण यामुळे आरोपांच्या ससेमिऱ्यात आहेत. पवार यांच्या विरोधात भाजपने २०१९ साठी देशमुख यांना संधी दिल्यास भाजपला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

विजयसिंह मोहिते पाटलांसाठी २०१९ ची निवडणूक कठीण असल्याने त्यांनी शरद पवार यांना गळ घातल्याची चर्चा आता रंगत आहे. मोहिते-पाटलांच्या आर्थिकदृष्ट्या अडचणीतील संस्था,  वसुलीसाठीची सुरू असलेली कारवाई, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मोहिते पाटलांचे ताणलेले संबंध यामुळे त्यांनी माघार घेतल्याचा अंदाज आहे. 

माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय यांनी भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले. पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत यांनी भाजपच्या माध्यमातून विधान परिषदेवर संधी मिळविली. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता साडेचार वर्षे भाजपकडून सत्तेचा लाभ घेतला. शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवल्यास २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिंदे-परिचारक यांना राजकीय पत्ते खुले करावे लागणार आहेत. त्यासाठी पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचा आग्रह मोहिते-पाटलांनी केल्याचा अर्थ लावला जात आहे.

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्‍न
    मतदारसंघात रोजगार देणाऱ्या मोठ्या प्रकल्पाची आवश्‍यकता
    अर्धवट उपसा सिंचन योजनांसाठी भरीव निधीची गरज 
    रखडलेले पंढरपूर-लोणंद लोहमार्गाची कामे 
    ‘उजनी’तून २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याचा मुद्दा
    केळी, डाळिंब, द्राक्ष पिकांवरील प्रक्रिया उद्योगाची गरज 

२०१४ ची मतविभागणी
    विजयसिंह मोहिते-पाटील : (राष्ट्रवादी काँग्रेस) ४,८९,९८९ (वि)
    सदाभाऊ खोत : (स्वाभिमानी शेतकरी संघटना) ४,६४,६४५
    (कै.) प्रतापसिंह मोहिते-पाटील : (अपक्ष) २५,१८७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com