Loksabha 2019: दहशतीच्या सावटाखाली जगणारा नगरकर; पत्राने खळबळ

Loksabha 2019: दहशतीच्या सावटाखाली जगणारा नगरकर; पत्राने खळबळ

नगर: पहिल्या दोन टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर उद्या (ता.23)ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात राज्यभर गाजत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचेही मतदान होणार आहे. यावेळी फेसबुकवर सुराज्य अहमदनगर या पेजवरून एक पत्र टाकण्यात आले आहे. दहशतीखाली असणाऱ्या नगरकरांचे नगरकरानां पत्र अशा आशयाखाली हे पत्र टाकण्यात आले आहे. हे पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.

हे पत्र जसेच्या तसे,

हे प्रिय बंधु भगिनीनो,

सप्रेम नमस्कार विनंती विशेष मी सध्या दडपणाखाली आहे, त्यामुळे हा निनावी लेखन प्रपचं,

पूर्वीच्या काळी पेंढाऱ्यांची एक जमात असे ही जमात कोणत्याही राजवटीला न मानता सामान्य जनतेचा छळ करून त्यांचे जीव घेत असत. समांतर न्याय व्यवस्था चालवत असत. सरकारी मालमत्ता लुटणे, लोकांना ठार करून त्यांची संपत्ती हडप करणे. अशी कामे ते करत असत. हा व्यापक सामूहिक गुन्हेगारीचा एक प्रकार होता. तेच पेंढारी आजकाल नगर शहरात अवतरले आहेत की काय असा प्रत्यय नगरच्या लोकांना येतो आहे.

सहकाराची पंढरी, दुधाचे आगार, मोठी पाणलोट धरणे, शिर्डी-शिंगणापूर असली लोकप्रिय नवदैवते, राळेगण-हिवरे बाजार मधील आदर्श गाव कामे, स्नेहालय-माउली सारखे समाजसेवी प्रकल्प, कला साहित्यक्षेत्रातील थोर व्यक्ति, बालकवी, ना.वा. टिळक, लक्ष्मीबाई टिळक, ख्रिस्तगीतकार कृ. र. सांगळे, उमाकांत ठोमरे ते आजचे रंगनाथ पठारे, थोर कलाकार, साहित्यीकांनी मोडक, मधुकर तोडमल ते सदाशिव अमरापूरकर, मिलिंद शिंदे ते आजचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी नगरची सकारात्मक प्रतिमा घडविली. परंतु या साऱ्यांवर एका क्षणात बोळा फिरवून नगरच्या पेंढाऱ्यांनी शहराची वाट लावली आहे. अर्थात हे अभद्र काम त्यांनी ऐंशीच्या दशकापासून सुरू केलेले दिसते.

चौकाचौकात पहिलवान, वस्ताद ही नगरची जुनी ओळख होती. पुढे यातीलच काही पहिलवान दादागिरीच्या क्षेत्रात उतरले. समाजासाठी ताकद वापरणारे छबुराव रानबोकेंसारखे पहिलवान इतिहासजमा झाले आणि काळे धंदे, दादागिरी करणारे, जुगार-दारू अड्डे चालवणारे लोक या नगरला बिघडवू लागले होते.

जुन्या हिंदी चित्रपटात दाखवत तसे इथे सत्तर-ऐंशीच्या दशकात असलेले कुणी टांगेवाला, कुणी हमाल, कुणी दूधवाला, कुणी हातगाडीवाला छोटी मोठी दादागिरी करत, गुंडगिरीने साम्राज्य तयार करीत आज महत्त्वाची पदे बळकावून बसले आहेत आणि मग हेच गावगुंड पुढे त्यांनी गुंडगिरीची मोठ बांधावी. सर्वपक्षीय सोयरे-धायरे राखून होत असलेली ही संघटित गुन्हेगारी आता नगर शहराला नवी नाही. दारू, मटका, जुगार, हॉटेली, वेश्याव्यवसाय अशा साऱ्याच गोरखधंद्यात यांचा हात आहे, भैया, भाऊ हे यांचे परवलीचे शब्द आहेत.

नगर शहर विस्तार पावू लागले. तसे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून बाहेरून लोक येऊन यात स्थिरावू लागले. यात भूमाफिया आणि त्यांना जोडून पुढे रेती माफिया जन्माला आले. जागे मध्ये गुंतवणुक करणारे पुढे बिल्डर झाले, दादागिरी करणारांशी बिल्डरलॉबीची साठगाठ झाली. शहरात हजार बिल्डर पण त्यांच्या बहुतांच्या खिशात राजकारण्यांची ठेव...तेव्हा आपण अंधेरनगरीत राहतोय असेच वाटत राहते. त्यांच्यातला निगरगट्टपणा क्रमाने तथाकथित सामाजिक, शिक्षण , कला आणि साहित्यक्षेत्रात अभिसरीत झाला आहे. आणि हे शहर अक्षरशः सडत गेले आहे. याला हे संघटित गुंड कारण. पर्यायी हे लोक पुन्हा मवाली, दादागिरी, गुंडगिरी करणारांच्या हाती नेतृत्व देण्यासाठी गेले. रोजची भांडणे, टोळीयुद्ध यातून या गावटग्यांनी एक नामी उपाय काढला. यांनी एकमेकांच्या घरात सोयीरसंबंध करून नगरला कायमचे दहशतीत लोटले. मग हे सारे एकमेकांच्या हातात घेत धाक घालून गाव हाकू लागले. 

मोक्याच्या जागा बळकावणे. विकलेल्या जागा आणि घरे कालांतराने पुन्हा बळजोरी करून कवडीमोल भावात खरेदी घेणे. घर खाली करत नसेल तर त्याला जिणे नकोसे करणे. असे विकृत उदयोग यांनी केले आहेत. दुसऱ्याची मोकळी असलेली घरे धाक दडपशाही करून बळकावणे. प्रसंगी लोकांचे खून करणे, आणि ते कायमसाठी दडपणे, हे कायमचेच झाले.कितीतरी गोरगरीब लोक, सरकारी नोकर, शिक्षक, यांचे त्यांच्या कुटुंबियांसह हालहाल करून खून केल्याचा घटना लोकांना आता मुखोदगत झाल्या आहेत. यातल्या एकाच्या नावावर गावातील चाळीस पेक्षा जास्त खून जमा आहेत. काळ्या धंद्याचे राखणं म्हणून सगळ्या मार्गावर यांच्या हॉटेली आहेत. भरमसाठ व्याजाने पैसे देऊन त्याच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शहरात अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत.

जिल्ह्यातील लोकांची विशिष्ठ गुन्ह्यात असलेली मानसिकता या नगरी प्रभावाने भारलेली आहे, उदाहरण म्हणून पाहायचे तर वीस वर्षांपूर्वीचे कोठेवाडी आणि नंतरचे सोनई, खर्डा,जवखेडा, कोपर्डी,कोतकर ही राज्य आणि देश ढवळून काढणारी गुन्हेगारी ठळक उदाहरणे फक्त गेल्या पाच वर्षातलीच आहेत, यात भर म्हणून नगर शहरातील भ्रष्ट सहकार, भेसळ, लूटमार, भ्रष्टाचार, दरोडे, अपहरण, ब्लॅकमेलिंग इथली बजबजपुरी, लुटारू समाजसेवक, भ्रष्टाचारी साहित्यिक अशी आणखी उदाहरणे काढली तर विविध क्षेत्रातील हे गुन्हेगार नगरकर देशाला चुकीच्या अर्थाने मार्गदर्शक ठरत आहेत. आणि प्रत्यक्ष बिहार सुधारला असल्याचे समोर आलेले असताना महाराष्ट्रातल्या नगरने त्याची जागा घेऊन ती कीड आपल्यात फोफावत असल्याचे दाखवून दिले आहे. विश्वासराव नांगरे-पाटील एस. पी. असताना त्यांनी एका किडीचा कायमचा बंदोबस्त केला, तर कृष्णप्रकाश एस. पी. असताना त्यांनी केलेला बंदोबस्त करूनही तो नंतरच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे न केल्यासारखा निष्प्रभ झाला.

इथल्या जनतेत गुंडांचा दबाव आहे. कोणतेही महत्त्वाचे सरकारी काम, खासगी काम यांच्या आशीर्वादाशिवाय पार पडत नाही. त्यामुळे इथे न्याय होणे दुरापास्त आहे. यांच्या हातून नाहक मारले गेलेले, खून झालेल्या घरच्या लोकांचे, विशेषतः लहान मुलांच्या तोंडचे उद्गार ऐकले तर नगरच्या पोटात सामान्य माणसाच्या अस्वस्थतेचा ज्वालामुखी खदखदतो आहे. हे ध्यानात घेता लवकर या प्रवृत्तीचा बंदोबस्त सरकारकडून झाला नाही तर चिडलेली जनता यांचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. आता ती वेळ आली आहे. हे चित्र बदले जावू शकते,

निर्णय तुमचा ...!

आपला, 
दहशतीच्या सावटाखाली जगणारा एक नगरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com