Loksabha 2019 : नवीन पुणे घडविण्यासाठीच संसदेमध्ये जाणार

Girish-Bapat
Girish-Bapat

पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक पुण्याचे स्वप्न मी पाहिले असून, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण लोकसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास पुणेकरांची पुरेपूर साथ मिळेल,’’ असा विश्‍वास भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रथमच लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले असल्याने त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्‍न - राज्यात मंत्री असताना दिल्लीत खासदार म्हणून जाण्याचा निर्णय का घेतला?
उत्तर -
 मला स्थानिक पातळीवरचा आणि राज्यपातळीवरचा प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा उपयोग केंद्रात जाऊन पुण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी करावा, असा आपला या मागचा विचार आहे. मंत्रिपदाचा मोह मला कधीच नव्हता. मंत्रिपद हे मिरवण्याचे पद नाही, तर ते कामाचे पद आहे. गेल्या साडेचार वर्षांत संपूर्ण राज्य आणि पालकमंत्री म्हणून पुणे जिल्हा मी पिंजून काढला वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्‍न मी मार्गी लावले. केंद्र सरकारकडून मोठ्या शहरांसाठी चांगला निधी येत असतो, अनेक चांगले प्रकल्प केंद्राकडून करता येऊ शकतात. वाढत्या पुण्यासाठी मी खासदार म्हणून अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो. यासाठीच मी लोकसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या विकासाची गती वाढावी यासाठी तुमचे नियोजन काय आहे?
-
विकासाची गती गेल्या पन्नास वर्षांत खूपच कमी होती. ती आम्ही वाढवली आहे. गेल्या पाच वर्षांत पुण्याचे अनेक रखडलेले प्रश्‍न आम्ही सोडविले. मेट्रो, रिंगरोड, पीएमआरडीए, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो, पुण्याचा विकास आराखडा, आंतरराष्ट्रीय विमानतळ, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, बेबी कॅनॉलचा वापर, स्मार्ट सिटी असे प्रकल्प कार्यान्वित केले आहे. शहराच्या विकासाचा हा वेग अधिक वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिक निधी आणण्याची गरज आहे.

आपल्या अनुभवाच्या जोरावर हे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र यांच्या समन्वयातून शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो, याचा मला विश्‍वास आहे.

पुण्यात वाहतुकीचा प्रश्‍न जटिल आहे, तो सोडविण्यासाठी काय उपाययोजना करणार?
-
शहर झपाट्याने वाढत आहे. मागच्या सरकारच्या काळात पीएमपीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर झाली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आम्ही सर्वांत पहिल्यांदा पीएमपी सक्षमीकरणाची योजना हाती घेतली. जादा बस आणण्यासाठी प्रयत्न केला. लवकरच ५०० ई बस आणि ८४० सीएनजीबस पीएमपीच्या ताफ्यात येतील. दुसरीकडे मेट्रोचे काम सुरू करून ते आज प्रगतिपथावर आहे. येत्या तीन वर्षांत ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम खासगी भागीदारीतून सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्याशिवाय पुण्यातील वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लागणार नाही, त्यामुळे पीएमपीचे सक्षमीकरण, मेट्रो, एचसीएमटीआर, रिंगरोडचे जाळे, रेल्वेचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला मला अधिक गती द्यायची आहे. 

पुण्यात आता जे प्रकल्प सुरू आहेत, ते वेळेत पूर्ण होणार काय?
-
शहरात आज केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आणले आहेत. त्यात पुणे मेट्रो, पीएमआरडीए मेट्रोचे १९ हजार ५३३ कोटींचे काम सुरू झाले आहे. याशिवाय स्मार्ट सिटी, जायका, नॅशनल हायवेमार्फत रस्त्यांची कामे याशिवाय चांदणी चौकातील उड्डाण पूल व इतर कामे, पालखी मार्ग, प्रधानमंत्री आवास योजना, रिंगरोड आदी कामांचा समावेश आहे. या प्रत्येक कामावर आपले व्यक्तिगत लक्ष आहे. समान पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होईल. पुण्यासाठी यातील प्रत्येक प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आणि दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत. ते वेळेवरच पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मेट्रोच्या कामावरून आपल्या हे लक्षात आले असेल. 

या वेळी मोदी लाट आहे असे वाटते का? 
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामाची लाट संपूर्ण देशभर आहेच. त्यांनी असंख्य योजना आणल्या, अनेक बदल केले. आयुष्यमान योजना, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणे अशी कितीतरी कामे आहेत. याशिवाय राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची कामे यामुळे आम्ही विकासाच्या लाटेवरच विजयी होणार आहोत.

गेल्या ४० वर्षांत पुणेकरांच्या सुख-दु:खात मला सहभागी होता आले आहे, त्यांचा प्रचारादरम्यान मला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. त्यामुळे पुणेकरांचा या वेळीही भाजप-आघाडीला संपूर्ण पाठिंबा असेल याबाबत पूर्ण खात्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com