राज्यात थाटात गणेश विसर्जन

राज्यात थाटात गणेश विसर्जन

पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या निनादात रविवारी लाडक्‍या गणरायाला राज्यभरात ठिकठिकाणी वाजतगाजत निरोप दिला. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासह प्रमुख शहरात निर्विघ्नपणे मिरवणुका पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि-श्‍वास सोडला. पुण्यासह अनेक ठिकाणी रविवारी सकाळी सुरू झालेल्या मिरवणुका सोमवारी दुपारपर्यंत सुरू होत्या. यंदा "डीजे'वर बंदी राहिल्याने राज्यातील मिरवणुकांत पारंपरिक ढोल-ताशा आणि पारंपरिक कलापथकांचाच बोलबाला राहिलेला असताना पुण्यात मात्र न्यायालयाच्या आदेशाला काही गणेश मंडळांनी दुर्लक्ष केल्याने मिरवणुकीला गालबोट लागले. 

गेल्या दहा दिवसांपासून राज्यात गणेशोत्सवाचे चैतन्यमय वातावरण होते. रविवार सकाळपासूनच घरच्या गणपतीला निरोप देण्याची तयारी घरोघरी सुरू होती. घरच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर मंडळाच्या मिरवणुका पाहण्यासाठी मंडळी घराबाहेर पडली. मुंबई आणि पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे. राज्यभरातून हजारो नागरिक पारंपरिक विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी येतात. यंदाही रविवारी मुंबई आणि पुण्यात गर्दीने उच्चांक नोंदवला. पुण्यात मानाचे पाच कसबा, तांबडी जोगेश्‍वरी, गुरुजी तीालम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतींचे पारंपरिकरित्या विसर्जन झाल्यानंतर अन्य मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या. मानाच्या गणपतींवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजरात आणि रांगोळ्या काढून मानाच्या गणपतींचे अलका टॉकीज चौकात स्वागत करण्यात आले. सायंकाळ होताच गर्दी वाढू लागली आणि रोषणाईंच्या देखाव्यांचे आगमन होऊ लागले. दरवर्षी रात्री बारा वाजता निघणारे मंडई गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती यंदा रात्री साडेदहाच्या सुमारास निघाले. वेळेआधीच दर्शन झाल्याने भाविकांच्या उत्साहाला भरते आले आणि लक्ष्मी रस्ता ओसंडून वाहू लागला. मुंबईतही लालबागचा राजा, तेजुकायाचा गणपती, गणेश गल्लीचा राजा, परळचा राजा यांच्याही मिरवणुका भव्यदिव्य रूपात निघाल्या. मिरवणुकांत पारंपरिकबरोबरच सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांचा समावेश होता. विसर्जन मिरवणुकीत गोंधळ होणार नाही, यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली गेली. 

मिरवणूक कालावधी 
मुंबई- 25 तास 
पुणे - 26.36 तास 
औरंगाबाद - 14 तास 
लातूर - 17 तास 
बीड - 9 तास 
उस्मानाबाद - 9 तास 
नांदेड - 18 तास 
हिंगोली - साडेसात तास 
परभणी - सात तास 
जालना - 8 तास 
नाशिक- 12 तास 
जळगाव - 18 तास 
कोल्हापूर - 22 तास 
मिरज - 32 तास 
सोलापूर - 14 तास 
अमरावती- 10 तास 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com