सांगलीमध्ये काँग्रेसला उमेदवारच मिळेना..!

सांगलीमध्ये काँग्रेसला उमेदवारच मिळेना..!

काँग्रेसचा बालेकिल्ला सांगली २०१४ मध्ये मोदी लाटेत ढासळला. संजय पाटील यांनी ‘कमळ’ फुलवले. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरता ठरेना, तर भाजपकडून संजय पाटील मैदानात उतरणार, हे निश्‍चित आहे. पक्षांतर्गत विरोध त्यांना जवळजवळ नाहीच. त्यांनी प्रचाराचा नारळही फोडलेला आहे. 

खासदार संजय पाटील यांनी आगामी लोकसभेसाठी भाजपमधील स्वतःचे स्थान भक्कम करत मतदारसंघात घट्ट पाय रोवले आहेत. याउलट काँग्रेसचा उमेदवारच ठरलेला नाही. तो सांगलीत नव्हे, तर परंपरेप्रमाणे दिल्लीतच अंतिम होईल, अशी सध्यस्थिती आहे. सध्या काँग्रेसकडून निवडणुकीच्या तोंडावर प्रतीक यांच्यासह पृथ्वीराज गुलाबराव पाटील, विश्‍वजित पतंगराव कदम, विशाल प्रकाशबापू पाटील यांची नावे चर्चेत आहेत. 

काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करू शकतो, हे इथे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधील संजय पाटील यांना आयात करून सिद्ध केले. आजवर पक्षांतरे झाली तरी दोन्ही काँग्रेसमध्येच व्हायची. आता दोन्ही काँग्रेसमधील नेतेमंडळी भाजपमध्ये स्थिरावली नव्हे, विसावली आहेत. अनेकजण खासदारांवर नाराज असले तरी ते त्यांची उमेदवारी रोखू शकत नाहीत. 

पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील या दिवंगत नेत्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीला उणीव जाणवते आहे. दादा कुटुंबाहेर उमेदवारी देण्याची चर्चा असली तरी प्रतीक आणि विशाल हेच दादांचे नातू प्रबळ दावेदार असतील. पतंगरावांचे पुत्र आमदार विश्‍वजित येथे तगडा उमेदवार ठरू शकतात; मात्र त्यांना मुंबईतच रस आहे. विशाल पाटलांनाही दिल्ली नकोय. त्यामुळे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज यांनी लोकसभेसाठी जोरदार दावा केलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांनी नाव पुढे रेटले आहे. इथे काँग्रेससाठी ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रामाणिक मदतीची अधिक गरज असेल. अर्थात, आघाडी झाली तरी ही मदत दादांच्या नातवांसाठी कितपत याबद्दल शंकाच आहे.

२०१४ ची मतविभागणी 
संजय पाटील (भाजप) - ६,११,५६३ (विजयी)
प्रतीक पाटील (काँग्रेस) - ३,७२,९७१

मतदारसंघातील प्रश्‍न 
ऊसदर प्रश्‍नावर तोडग्यास होणारा विलंब
दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात अपयश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com