आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या विधवांची वणवण 

आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या विधवांची वणवण 

सोलापूर -  राज्यात जानेवारी 2014 ते जून 2019 (साडेपाच वर्षे) पर्यंत 15 हजार 172 तर जानेवारी 2001 ते डिसेंबर 2013 (13 वर्षे) पर्यंत 15 हजार 664 शेतकऱ्यांनी जिवनयात्रा संपवली. दरम्यान, पतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचा संसार सावरण्याच्या उद्देशाने तब्बल 15 हजार 260 शेतकरी विधवा पत्नींची शासकीय मदतीसाठी वणवण सुरु असून थकलेल्या विधवांची मुलेही आता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, मागील 19 वर्षांपासून ते आत्महत्याग्रस्त शेतकरी शासकीय निकषांनुसार मदतीसाठी पात्र आहेत की नाहीत, याचा शोध सुरुच असल्याचे चित्र पहायला मिळते. 

पावसाची हुलकावणी अन्‌ पाण्याअभावी पिकांचे नुकसान, शेतमालांचे अस्थिर दर, कर्जमाफीची प्रतीक्षा अन्‌ बॅंकांकडून कर्ज मिळेना, सावकारांचा तगादा यासह अन्य कारणांमुळे राज्यात मागील 19 वर्षांमध्ये तब्बल 30 हजार 836 बळीराजाने मृत्यूला जवळ केले. कुटुंबातील कर्ता पुरुष जग सोडून गेल्याने अडचणीत सापडलेला संसार सावरण्याकरिता विधवा पत्नींना शासकीय मदतीच्या आधार गरज असते. त्यातून मुलांच्या शिक्षणाची फी असो की उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होते. मात्र, 2014 ते जून 2019 पर्यंत पाच हजार 456 तर 2001 ते 2013 या कालावधीतील आठ हजार 848 अशा तब्बल 14 हजार 304 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अपात्र ठरविण्यात आले. त्यातील बहूतांश कुटुंबांनी कागदपत्रांची पूर्तता केली असतानाही ते आत्महत्याग्रस्त शेतकरीच होते की नाही, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा शोध संबंधित यंत्रणेला लागल्याचे दिसत नाही. 

शेतकरी आत्महत्या केल्यानंतर शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सरकारकडून मदत केली जाते. मदतीच्या प्रतीक्षेतील कुटुंबियांची पडताळणी करुन त्यांनाही तत्काळ मदत करण्यात येत आहे. 
- सुभाष उमराणीकर, सचिव, मदत व पुनवर्सन विभाग, मुंबई 

राज्याची स्थिती (2014 ते जुलै 2019) 
शेतकरी आत्महत्या  - 15,172 
कुटुंबाना मिळाली मदत  - 8,760 
मदतीच्या प्रतीक्षेतील कुटुंब - 6,412 
2001 ते 2013 
एकूण आत्महत्या  - 15,664 
मदतच मिळाली नाही  - 8,848

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com