यशासाठी योग्य 'डावपेच' हवेत!

यशासाठी योग्य 'डावपेच' हवेत!

राज्यसेवेचा नवा बदललेला पॅटर्न, अभ्यासक्रमाची व्याप्ती, त्यातही दोन ते तीन वर्षे प्रयत्न करूनही मिळणारे अपयश व या अपयशामधून बाहेर निघण्यासाठी आपण कोणते "डावपेच' आखायला हवेत, तसेच जागा कमी आल्या तरी अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, अभ्यासाची पद्धत सामान्यपणे कशी असते याचा आढावा... 

एमपीएससीसाठी अभ्यास करताना जी ऊर्मी मनामध्ये असते, ती आपल्या आत्मविश्‍वासामधून व्यक्त होत असते. यशाची अपेक्षा करणारे आपल्यासारखे अनेक विद्यार्थी यशस्वी होण्याची प्रामाणिक इच्छा असूनही, तळहातावर अपयश उतरताना आपण पाहत असतो. मित्रांनो, प्रकाशाचा एक किरणही अंधाराचा नाश करू शकतो; तसेच विद्यार्थ्यांकडे योग्य आत्मविश्‍वास, योग्य मार्गदर्शन, संकल्प, समर्पण, शिस्त पाळण्याची तयारी व आपण पाहिलेल्या ध्येयाविषयी कालमर्यादा अथवा वेळेचे बंधन असल्यास निश्‍चितपणे पहिल्या अथवा कमीत कमी दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होताच आले पाहिजे. आपल्याला नेमके काय करायचे आहे, कोणता अभ्यास करायचा आहे, अभ्यासाची नेमकी पद्धत कोणती असावी, स्वतःच्या चुका दुरुस्त करता याव्यात व वेळेमध्येच त्यात कशी सुधारणा करता येईल हे ज्यास जमते, त्या विद्यार्थ्यांची नेमकी अभ्यासाची तयारी यशस्वीच झालेली दिसते. युद्धामध्ये जिंकण्यासाठी डावपेच व रणनीती आखावी लागते, तर प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी डावपेच व रणनीती आखावीच लागणार आहे. कारण हे आपल्या आयुष्याचे युद्ध आहे, याची मानसिकता तयार करावी लागेल. या परीक्षेत तुम्ही पास झाल्यास आयुष्यभर मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळणार आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून समाजासाठी काहीतरी करता आले पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवल्यामुळे समाजाची सेवा करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र हे ध्येय गाठण्यासाठी बरेच कष्ट करावे लागणार आहेत. शिवाय स्वतःमधील उणिवा, गुणही समजावून घ्यावे लागणार आहेत व त्यावर उपाययोजनाही कराव्या लागणार आहेत, हे प्रथम लक्षात घ्या. 

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेचा कॉमन अभ्यासक्रम वेगवेगळा काढून घ्यावा. जे विषय अवघड वाटत असतील अशा विषयांकडे दुर्लक्ष न करता त्यांची जास्त तयारी करावी. प्रत्येक विषयामधील स्वतंत्र उपविषय बाजूला काढून स्वतंत्रपणे तयारी करणे आवश्‍यक ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपली तयारी जास्त सखोलपणे तयार करता येते. एखाद्या घटकाचा अभ्यास झालेला आहे, असे आपणास वाटत असल्यास अशा घटकावरचे वेगवेगळे प्रश्न सोडविण्यासाठी घ्यावेत. यावरून तो घटक आपणास कितपत समजला आहे हे लक्षात येईल. तुम्हाला प्रश्‍न 80 टक्‍क्‍यांपर्यंत सुटत असल्यास आपण योग्य मार्गावर आहोत, हे लक्षात घ्यावे. यामधून आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे विविध घटकांवरचे प्रश्न सोडविताना परीक्षेमध्ये ज्या अडचणी येतात, त्या या ठिकाणी आपल्याला समजतात. 

परीक्षेमध्ये जागा किती आल्या, यापेक्षा मला किती मार्क मिळवायचे आहेत, याविषयी रणनीती व डावपेच आखता आल्यास निश्‍चितपणे जागांची संख्या कमी असो अथवा जास्त, आपल्याला यशस्वी होता येईल. उदा. या परीक्षेमध्ये मला 200 गुण मिळवायचे असल्यास नियोजन करावे लागेल. मग यामध्ये "सी-सॅट'चा पेपर महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये येणारे उतारे, याविषयी असणारे नियोजन, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणिताचा 23 प्रश्नांचा असणारा भाग व निर्णय क्षमतेचा महत्त्वाचा भाग यामध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील, यावर नियोजन करावे लागणार आहे. नियोजन करताना प्रत्येक गुण मिळविण्यासाठी असणारे अभ्यासाचे डावपेच आखावे लागतील. 

अशाच प्रकारे सर्व अभ्यासपद्धती विद्यार्थ्यांना सहजपणे समजावून घेता यावी यासाठी "सकाळ विद्या' व "शिवनेरी फाउंडेशन'मार्फत संपूर्ण राज्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, पीएसआय, एएसओ, एसटीआय, खात्यांतर्गत फौजदार, करसहायक, अभियांत्रिकी परीक्षा, आरटीओ, लिपिक पदाच्या परीक्षांचा सुधारित अभ्यासक्रमासह तलाठी अशा पदांपर्यंत सर्व अभ्यासक्रमाचे तपशीलवार सखोल पद्धतीने प्रत्येक घटकाची तयारी करण्याचे "स्मार्ट किट" विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन, प्रत्येक घटकाची सखोल माहिती, व्हॉटस ऍप व ई-मेलच्या माध्यमातून अद्ययावत घटकांची संपूर्ण सखोल तयारी विद्यार्थ्यांची करवून घेतली जाणार आहे. 

मित्रांनो, खूप कष्ट केले की फळ मिळते असे नाही, तर कष्टाला विचारांची गरज असावी लागते. कष्टाला योग्य मार्गदर्शनाची साथ असावी लागते. जी मुले स्वप्न पाहतात, स्वप्नांवरती विचार करतात, विचारांना कृतीची जोड देतात त्यांना यश मिळते. कृती म्हणजे नुसती घोकंपट्टी किंवा कष्ट नव्हे, तर कृतीला योग्य मार्गदर्शनाची जोड असावी लागते. असे विद्यार्थी नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात पास होताना दिसतात. मला का अपयश येते आहे, हे समजावून घेताना आपल्यामध्ये असणाऱ्या उणिवांचा किस काढून, उत्तराचा शोध घेणे आणि वेध घेणे म्हणजे यशस्वी मार्गाकडे जाण्याची वाटचाल असते आणि प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक व उपघटक यामधील संकल्पना मला कोणत्या पद्धतीने चांगल्या समजावून घेता येतील, प्रत्येक विषय समजावून घेताना यामध्ये माझी जमेची बाजू कोणती आहे, हे जाणून घेऊन अभ्यास करणे म्हणजे नेमके यशस्वी होणे असा याचा अर्थ आपल्याला लावता येईल. 

ज्या विद्यार्थ्यांना नियमितपणे ताज्या घटना व बातम्या व्हॉट्‌सऍप व इ-मेलवर हव्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी 9421300010 या क्रमांकावर आपले मोबाईल क्रमांक एसएमएसद्वारे पाठवावेत. व्हॉट्‌सऍपसाठी 9960101122 या क्रमांकावर आपले नाव व नंबर पाठवावेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना जानेवारी 2017पासून फेब्रुवारी 2018पर्यंतच्या घटना पाठविण्यात येतील. या चळवळीचा आपणही एक भाग व्हावे व सर्वांच्या प्रयत्नातून अशा अभ्यासक्रमाची रचना आपण करू. त्यातून ग्रामीण भागातील अगदी वाड्यावस्त्यांवरील प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ घेता येईल. 

इच्छाशक्तीच्या जोरावर अधिकारपदाला गवसणी 
घरची परिस्थिती सामान्य असतानाही आपल्या इच्छाशक्‍तीच्या जोरावर पोवारटोला (ता. गोंदिया) या लहानशा गावातील युवकाने "एमपीएससी'ची परीक्षा अवघ्या तीन वर्षांत उत्तीर्ण होत मुख्याधिकारी पदावर पोचत आदर्श निर्माण केला. तालुका ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावरील पोवारटोला येथील सतीश चौधरी या युवकाने कठीण परिश्रम घेत राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे.

सतीशचा आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार. वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते. त्यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा अदासी येथे झाले. आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण आमगाव येथील आदर्श विद्यालयात पूर्ण केल्यानंतर गोंदियातील एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली. जिद्दीच्या बळावर व अभ्यास करण्याच्या इच्छाशक्‍तीने राज्य सेवा आयोगाची परीक्षा पास व्हायचा ध्यास सतीश यांनी घेतला. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर 2014मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या लेखी परीक्षेत सतीश उत्तीर्ण झाले, तर 2015मध्ये विक्रीकर निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, दोन्ही वेळेस अंतिम परीक्षेत ते उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर अमरावती येथील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांचा क्रमांक लागला. तेथे वर्षभर कठोर मेहनत घेऊन अभ्यास केला. ते 2016मध्ये राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. गोंदिया जिल्ह्यातील अगदी लहानशा गावात राहूनही प्रबळ इच्छाशक्‍ती व अभ्यास करण्याच्या जिद्दीने सतीश चौधरी राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या ते गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील नगरपंचायतीत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

गोंदिया जिल्ह्यात चार-पाच वर्षांआधी स्थानिक मार्गदर्शन मिळत नव्हते. आता अशा विविध मार्गदर्शन करणाऱ्या संस्था गोंदिया शहरात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. सातत्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास निश्‍चितच यश मिळू शकते, असे चौधरी यांचे म्हणणे आहे. 

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com