शिवसेना म्हणते, तलवार म्यानबंद नाही वारा आमच्या दिशेने वळला

Shivsena
Shivsena

मुंबई : आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेने युतीनंतर दिले आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीनंतर विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तर, सोशल मीडियात खिल्ली उडविण्यात येत आहे. शिवसेनेने आज युतीबाबत 'सामना' या मुखपत्रातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की महाराष्ट्रात ‘युती’च्या चर्चेला तसा पूर्णविराम मिळाला आहे. काही पोटावळ्यांना युती झाली तरी, ‘का झाली?’ असा मुरडा उठला होताच व होत नव्हती तेव्हा, “छे, छे, शिवसेना फारच ताणून धरते बुवा. हे काय सुरू आहे!’’ असले प्रश्न पडतच होते. असल्या पडेल प्रश्नांना उत्तरे देत बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितासाठी जी नवी जुळवाजुळव केली आहे ती घेऊन पुढे जावे यातच सगळ्यांचे हित आहे. जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली आहे. अमित शहा हे स्वतः ‘मातोश्री’वर आले. आम्हाला जे सांगायचे, बोलायचे ते ‘ठाकरे’ पद्धतीने ठोकून सांगितले. ज्या चुका आधी झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत यावर किमान एकमत झाले. त्यातून ‘युती’ला आणखी एक संधी देण्याचा निर्णय झाला.

भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत तसे वैर नव्हते. मुळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे ‘एनडीए’ला ‘कल्हई’ करण्याचे प्रयत्न गेल्या महिनाभरापासून सुरू झाले. या एनडीएचे जनकत्व भाजपइतकेच शिवसेना, अकाली दलाकडे आहेच. नितीश कुमार यांच्यासारख्या सध्याच्या भरोसेमंद साथीनेही दोन वेळा ‘एनडीए’ त्याग केला आहे. अगदी राममंदिर, गोध्रा वगैरे प्रकारांवर शरसंधान करणार्‍या नितीश कुमारांना तर मोदी हे प्रकरण अजिबात चालणारे नव्हते. पण शेवटी विचार, भूमिका जुळत नसल्या, माणसांशी टोकाचे भांडण असले तरी राजकारणात पुन्हा एकत्र येण्यासाठी जे परवलीचे शब्द आहेत ते म्हणजे ‘राष्ट्रीय व्यापक हित’, ‘जनहित’ व ‘जनतेची  इच्छा’. या इच्छेनुसार काँग्रेसची महाआघाडी बनू शकते, नितीश कुमार वगैरे पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत बसू शकतात, मग शिवसेना तर त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बरोबरीची हिस्सेदारच आहे. 2014 सालातली परिस्थिती वेगळी होती, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com