सिनेरसिकांच्या तुडुंब गर्दीत फिल्म फेस्टिव्हलचा समारोप 

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद : शहरासह मराठवाड्यातील सिनेरसिकांच्या अपूर्व उत्साहात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सहाव्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा रविवारी (ता. 13) समारोप झाला. भारतीय चित्रपट प्रकारातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा एक लाख रुपयांचा गोल्डन कैलास पुरस्कार "न्यूड'ला मिळाला. तर "मंटो'ने तीन पुरस्कार पटकावले. 

ज्युरी कमिटीचे चेअरमन, प्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा, मारियान बोर्गो, गीतकार दासू वैद्य, अभिनेते संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, तेजस देऊसकर, सिराज सय्यद, फैजल खान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, महोत्सव संचालक अशोक राणे, नाथ ग्रुपचे संतोष जोशी, विजय कान्हेकर, अहमद जलील, सिद्धार्थ मनोहर आदींची मंचावर उपस्थिती होती. संयोजन समितीचे नीलेश राऊत यांनी प्रास्ताविक केले. 

""औरंगाबादच्या रसिकांनी या महोत्सवाला दिलेला प्रतिसाद अद्भुत आहे. गेली चाळीस वर्षे मी सिनेचळवळीत काम करतो आहे; पण इथल्या लोकांची चांगल्या सिनेमाची तहान भागवता येणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट ठरली आहे. अगदी ऐंशीपार जोडप्यानेही दाखवलेली जिज्ञासा मला महत्त्वाची वाटली,'' असे मनोगत अशोक राणे यांनी व्यक्त केले. 

शॉर्ट फिल्म स्पर्धेचे प्री-ज्युरी प्रो. एस. के. देशमुख, महेश देशमुख आणि पवन गंगावणे यांचा; तसेच प्रथमच लघुपट बनवणाऱ्या एमजीएम फिल्म आर्टच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 25 हजार रुपयांचा "सिल्व्हर कैलास' पुरस्कार "सावित्री' या लघुपटासाठी मदन काळे यास देण्यात आला. 

दडपणातून मुक्त होऊन नव्या शक्‍यता शोधा ः उमेश कुलकर्णी 
इंग्रजांनी लावून दिलेल्या शिक्षण पद्धतीमुळे नवीन काही शोधण्याचा विश्वास आपण गमावून बसलो आहोत. लोक काय म्हणतील, हा प्रश्न कलाकाराने सोडून दिला पाहिजे. दडपणातून मुक्त व्हा. कलेचा एकच मार्ग नाही. सर्व कला आतून परस्परांशी जोडलेल्या आहेत. फक्त प्रकाश, रेषा, पोत या अंगाने आपली स्पेस शोधता आली पाहिजे, असा सल्ला दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी मास्टर क्‍लासमध्ये दिला. कुठलाही कलाकार हा एक तत्त्वज्ञ असतो. सैद्धांतिक मांडणी करतानाच काही सिद्धांत तो शोधतही असतो. कथा मांडणे हा सिनेमाचा मूळ उद्देश नाही. ते आवरण आहे. त्याच्या आत दडलेले सूत्र ओळखणे आणि ते काय पद्धतीने मांडता येईल याचा विचार करणे, शक्‍यतांचा नवनवीन पद्धतीने सोध घेणे म्हणजे सिनेमा बनवणे, असे त्यांनी सांगितले. या मास्टर क्‍लासमध्ये त्यांची "गिरणी' ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. 

सर्वोत्कृष्ट पुरस्कार 
संगीत - स्नेहा खानविलकर, झाकीर हुसेन (मंटो) 
ध्वनी - अनमोल भावे (न्यूड) 
संकलन - सुजय दत्ता रे (अव्यक्त) 
छाया - अमलेन्दू चौधरी (न्यूड) 
पटकथा - बिजुकुमार दामोदरन्‌ (पेंटिंग लाइफ) 
अभिनेता - नवाजुद्दीन सिद्दिकी (मंटो) 
अभिनेत्री - कल्याणी मुळे (न्यूड) 
दिग्दर्शक - नंदिता दास (मंटो) 
उल्लेखनीय - आम्ही दोघी (प्रतिमा जोशी) 
प्रेक्षक पसंती - द स्वीट रिक्वियम (रितू सरीन) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com