दुष्काळाने करपली केळीची बाग

दुष्काळाने करपली केळीची बाग

शिरूर कासार - भीषण दुष्काळ परिस्थितीत तालुक्‍यातील शेतकरीवर्गाने शंभर एकर क्षेत्रात केळीची लागवड केली. त्यावर मोठ्या कष्टाने मेहनत करून लाखोंचा खर्च केला. नंतर बागा बहरल्या; पण करपा रोगाने यावर घाला घातल्याने संपूर्ण बागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. शेतकरी वर्गाचे लाखोंचे उत्पन्न बुडाले, त्यामुळे शेतकरी हावालदिल झाला आहे.

तालुक्‍यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक गावात पिण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. भीषण दुष्काळ परिस्थितीत शंभर एकरांवर शेतकऱ्यांनी लागवड केली. आधुनिक शेतीची कास धरत नवनवीन प्रयोग करून लाखो रुपयांचा खर्च करून, आपल्या शेतीत तांत्रिक पद्धतीचा वापर करत टिश्‍यू कल्चरच्या केळीचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनचा वापर करण्यात आला. नवनवीन खतांचा वापर करत यावर लाखोंचा खर्च करून बागा जानेवारीमध्ये बहरात आल्या आहेत. केळीला फळ लागले आहे; पण पंधरा दिवसांपासून करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. केळी पिकावर करपा रोग पडल्याने संपूर्ण पाने करपून जाऊ लागली आहेत. त्यामुळे संपूर्ण बागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. 

या वर्षी मी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माळरानावर केळीची लागवड केली. त्यावर दीड लाखांचा खर्च झाला. ठिबक सिंचनाचा वापर करत मोठ्या प्रमाणावर उसनवारी करून बागावर खर्च केला. बाग बहरात आली; पण या पंधरा दिवसांपासून केळीची पाने करपून चालली आहेत. त्यामुळे केळीच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. केलेला खर्चही निघणे कठीण आहे.
-रामकिसन चोरमले, रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार

आम्ही नवीनच केळी लागवड केली; पण त्यावर थंडी पडल्याने करपाने बाग करपून चालली आहे. यावर कृषी विभागाकडून कोणताही सल्ला दिला जात नाही. निमगाव मायंबा येथे कृषी सहायक येत नसल्याने आम्हाला यावर कोणतीही उपाययोजना करण्याची माहिती मिळाली नाही. 
-आजिनाथ भिंगले,  शेतकरी, निमगाव मायंबा

पंधरा दिवसांपासून थंडी पडल्याने केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यावर शेतकरीवर्गाने बॉविसटीन १० लिटर पाण्यात १० ग्रॅम टाकून फवारणी करावी. पहाटे धूर करण्यात यावा. 
-दिलीप तिडके,  कृषी पर्यवेक्षक, शिरूर कासार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com