जायकवाडीत लालसरी बदकांची शिकार 

पक्ष्याची केलेली शिकार.
पक्ष्याची केलेली शिकार.

औरंगाबाद - जायकवाडी धरणात विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळण्याच्या घटनेने खळबळ उडालेली असतानाच येथे स्थलांतरित पक्ष्यांची शिकार होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यात लालसरी बदकांची संख्या मोठी असून, वन्यजीव विभागाची गस्त कमी पडत असल्यामुळेच पक्ष्यांचे बळी जात असल्याचा आरोप पक्षीमित्रांनी केला आहे. 

देशी-विदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात मच्छीमार आणि उपद्रवी लोकांमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे. शिकारी आणि मच्छीमारांवर वन्यजीव विभागाचे नियंत्रण न राहिल्याने स्थलांतरित पक्ष्यांची सर्रास शिकार होत आहे. सोनेवाडी भागात खुल्या कारागृहासमोरील परिसरात लालसरी बदकांची (कॉमन पोचर्ड) शिकार झाल्याचे मंगळवारी (ता. 19) समोर आले आहे. या ठिकाणी पाणीउपसा योजनेच्या कामांवर आलेल्या लोकांनीच हे बदक मारल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. या परिसरात बदकांची कापून फेकलेली दोन-तीन मुंडकी आढळली असून, नायलॉनचे गाठी घातलेले गळही तिथेच पडलेले आढळले आहेत. वन्यजीव विभागाची गस्त कमी पडत असल्यामुळेच पक्ष्यांचा जीव धोक्‍यात आल्याचा आरोप पक्षिमित्रांनी केला आहे. 
 
आज करणार पाहणी 
मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्यामुळे नाथसागरात देशी-विदेशी पक्ष्यांचा तडफडून मृत्यू होत असल्याचे दोन दिवसांपासून उघड झाले आहे. या पक्ष्यांची संख्या 35 वर गेल्यामुळे पक्षीमित्रांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वन्यजीव विभागाचे विभागीय अधिकारी रावसाहेब काळे यांनी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना अहवाल मागितल्याचे सांगितले; तर सहायक वनसंरक्षक रमेश सोनटक्के यांनी बुधवारी (ता. 20) स्थळपाहणी करणार असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून मासेमारी करणाऱ्यांवर; तसेच शिकाऱ्यांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी केली आहे. 
 

अभयारण्य परिसरात जॅकवेलची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तेथे बाहेरून येणाऱ्या लोकांकडून खाण्यासाठी चिकन विकत आणण्यापेक्षा तिथेच धरणातील बदकांची शिकार केली जाते. त्यांच्यावर लक्ष ठेवून शिकाऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. 
- डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com