कारागृहात प्रेम, भावना, आपुलकीसह वाहिला अश्रुंचा झरा

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : हातून चूक घडली, मग कारागृहाच्या चार भिंतीचच जग आणि तिथेच निराशा घेऊन हिरमुसलेल्या मनानं आयुष्य व्यतीत करण्याची वेळ आली. पण गळाभेटीचा उपक्रम सुरू झाला आणि ताटातूट झालेल्या आपल्या पोटच्या लेकरांना पाहून कैद्यांचे हृदय गहिवरले.

‌एका गळाभेटीने पालक असलेले कैदी आणि त्यांच्या मुलांची आकाशाएवढी झालेली पोकळी भरून निघाली. निमित्त होते शासनाने कैद्यांसाठी व त्यांच्या सोळा वर्षाखालील मुलांसाठी सुरु केलेल्या गळाभेट उपक्रमाची.

औरंगाबादच्या हर्सूल मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी (ता. 13) गळाभेट उपक्रम घेण्यात आला. यात कारागृहातील नव्वद कैदी बांधव व त्यांच्या सोळा वर्षाआतील मुलांची भेट घडवून आणली गेली. मुलांची भेट होताच अनेक कैदी बांधवांना अश्रू अनावर झाले. आपल्या हातून चूक घडली याची शिक्षाही झाली पण शिक्षा भोगताना लेकरांसोबतची ताटातूट शिक्षेपेक्षाही मोठी आहे हे भावनाविवश झालेल्या कैद्यांच्या देहबोलीतून स्पष्ट जाणवत होते. सकाळी दहा ते एक या दरम्यान झालेल्या या कार्यक्रमात कारागृहाला कुटुंब, घराचे रूप प्राप्त झाले होते. काही कैद्यांनी मुलांसाठी खाऊ तर काहींनी खेळणी आणली होती, काहींजवळ तर अश्रू आणि अनावर झालेल्या भावनाशिवाय काहीही नव्हते. तीन तास ते आपल्या लेकरांना बिलगून होते, आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते. गुजगोष्टी करीत होते. आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगतीही जाणून घेत होते.

आपले भविष्य चार भिंतीत कैद असले म्हणून काय झाले पण मुलांचे भवीष्य उजळावे म्हणून एक कैदी बाप लेकराला अभ्यास आणि शिक्षणाची महती सांगतानाही दिसला. जशी जशी गळाभेटीची वेळ संपत होती तशी तशी लेकरे आणि कारागृहात बंदी असलेल्या त्यांच्या पालकांच्या डोळ्यातून गालावर ओघळ येत होते. बापाच्या डोळ्यात आसवं पाहुन लेकरांचे डोळेही क्षणात टचकन ओले झाले होते. भावनांनी ओतप्रेत भरलेली मनं, हुंदक्यांनी, गळाभेटीने कारागृहही ओलेचिंब व्हावे जणू अशीच स्थिती तिथे होती. एरवी दंडुके आणि शस्त्र सदैव हाती ठेवत कारागृहात गस्त घालणाऱ्या पोलिस मामांच्या भावंनांची नदी आपुलकी आणि प्रेमाने दुथडी भरून वाहत होती असेच काहीसे चित्र कारागृहात होते. दिवाळीच्या शुभेच्छा घेऊन लेकरं अखेर त्यांच्या कारागृहात खितपत पडलेल्या बापाचा कधीच नको असलेला निरोप घेऊन कोमेजलेल्या मनाने कारागृहातून परतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com