लाल चिखल

औरंगाबाद - शहापूर येथील नाल्यात सुमारे ट्रकभर टोमॅटो शेतकऱ्यांनी असे फेकून दिले.
औरंगाबाद - शहापूर येथील नाल्यात सुमारे ट्रकभर टोमॅटो शेतकऱ्यांनी असे फेकून दिले.

औरंगाबाद - अगोदरच दुष्काळी स्थिती आणि त्यातच टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघणे अवघड झाल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली. माळीवाडा (ता. औरंगाबाद) परिसरात टोमॅटोचे भरघोस उत्पादन घेतले जाते; मात्र दर घसरल्याने धुळे-सोलापूर महामार्गालगतच्या शेतकऱ्यांनी चक्क टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. 

सध्या २७ किलोचे कॅरेट ८० ते १०० रुपयांना विक्री होत आहे. जिल्ह्यात दरवर्षी टोमॅटोचे बंपर उत्पादन घेतले जाते. येथील टोमॅटो मध्यप्रदेश, दिल्लीपर्यंत जातात; मात्र या वर्षी टोमॅटोला योग्य दर नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. संकरित टोमॅटोचे बंपर उत्पादन आणि अशा वेळी बाजारात भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. करोडी, शहापूर, जंभाळा, माळीवाडा या भागांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माल रस्त्यावर आणून फेकला आहे. त्यामुळे विस्तारीकरण सुरू असलेल्या औरंगाबाद-धुळे रस्त्यावर टोमॅटोचा अक्षरशः खच पडला आहे. अल्प भावामुळे बाजारात माल नेणेही परवडत नसल्याचे चित्र आहे. 

तोडणीसुद्धा परवडत नाही
रंगाचे कारण असल्याने हा माल विकला जात नसल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळाली. शहरात या टोमॅटोला प्रति कॅरेट १४० रुपयांचा भाव मिळत होता. तीन ते चार दिवसांपूर्वी तो ८० रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोची तोडणी करणेसुद्धा परवडत नाही. यामध्ये गावरान टोमॅटोची काही प्रमाणात विक्री होते; मात्र हायब्रिड टोमॅटोला जास्त मागणी नाही.

तारीख        आवक         ठोक दर          किरकोळ दर (किलोमध्ये)
१५ सप्टेंबर    २६२    ३५० रुपये क्विंटल       तीन रुपये
१८ सप्टेंबर    २०२    २०० रुपये क्विंटल       दोन रुपये
१९ सप्टेंबर    १२७    ३५० रुपये क्विंटल       ३.५० रुपये
२२ सप्टेंबर     १५३     ३२५ रुपये क्विंटल      ३.२५ रुपये
२४ सप्टेंबर     १६९    २५० रुपये क्विंटल      २.५० रुपये
२५ सप्टेंबर    २००    ३०० रुपये क्विंटल        २ रुपये

दोन रुपये किलो!
यंदा टोमॅटोला चांगला दर मिळेल या अशेने जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली; मात्र लागवडीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांना हा माल रस्त्यावर फेकावा लागला. मंगळवारी बाजार समितीत टोमॅटोची दोन रुपये किलोने विक्री झाली.

गेल्यावर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आणि ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीत टोमॅटोची हजार क्विंटल आवक होती आणि दरही मोठा मिळत होता. यंदा चित्र उलटेच आहे. टोमॅटोचे उत्पन्न चांगले झाले. तरीही दर नाही. लागवडीचाही खर्च निघाला नाही. त्या तुलनेत हातगाडीवरून विक्री होणारे टोमॅटो दहा रुपये किलोपुढेच विक्री होत आहेत. एकीकडे शेतकरी भाव नाही म्हणून टोमॅटो रस्त्यावर फेकून देत असला तरी दुसरीकडे हातगाडीवाले बाजार समितीतून दोन रुपयांनी घेत दहा रुपयांनी विक्री करीत आहेत.

बाजार समितीत मंगळवारी २०० क्‍विंटल टोमॅटोची आवक झाली. त्यास क्‍विंटलमागे साडेतीनशे रुपयांचा दर मिळाला; मात्र किरकोळ बाजारामध्ये टोमॅटो दोन रुपये किलोने विक्री झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com