...तर युवक महोत्सव उधळून लावू! 

marathwada
marathwada

औरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव उधळून लावू, असा इशारा आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी दिला. विद्यापीठातील सर्व विभागांतून बंदचे आवाहन करीत मंगळवारी (ता. 25) विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. प्रशासकीय कामकाज सुरूच राहिले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरूंच्या दालनात सोमवारी (ता. 24) केलेल्या आंदोलनात रात्री भांडणाची ठिणगी पडली. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत पिटाळले. कुलगुरूंच्या दालनात मुक्काम ठोकून, कपडे वाळत घालून केलेल्या आंदोलनाने अभाविपने कुलगुरूपदाचा अवमान केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन निकम, युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष नीलेश अंबेवाडीकर, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे कुणाल खरात, प्रकाश इंगळे, पॅंथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे, एसएफआय, एआयएसएफ, युवासेना, मनविसे आदींनी मंगळवारी (ता. 25) विद्यापीठ बंदची हाक दिली होती. या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून सर्व विभागांत जाऊन वर्ग बंद करायला लावले. विद्यार्थ्यांना जाण्यास सांगण्यात आले. प्रशासकीय कामकाज मात्र सुरूच राहिले. 

दरम्यान, काल अभाविप कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिस उपायुक्तांनी दोन्ही गटांना नोटिस बजावली असून, विद्यापीठात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

लढा सुरूच राहील : अभाविप 
विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागा अडवल्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही. यासाठी लढा सुरूच राहील, असे अभाविपचे प्रदेशमंत्री अभिजित पाटील, निखिल आठवले, विवेक पवार यांनी पत्रक काढून जाहीर केले. कितीही मारहाण झाली, तरी आम्ही मागणीसाठी लढत राहू, असे गोविंद देशपांडे यांनी म्हटले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com