मुंबई - माटुंगा येथील व्यावसायिकाचा मोबाईल क्रमांक बंद करून त्याच्या खात्यातील एक कोटी 86 लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी कोलकत्यातून अटक केली. सागर दास (वय 34) आणि चुनचुन पाठक (वय 49) अशी आरोपींची नावे आहेत.
माटुंगा परिसरातील कापड व्यापारी विमल हिरजी शहा (वय 57) यांनी या संदर्भात तक्रार दिली होती. माहीममध्ये शहा यांचे कार्यालय आहे.
"प्रायमेक्स एंटरप्राईजेस' या नावाने त्यांचे बॅंकेत चालू खाते आहे. 27 डिसेंबरला रात्री शहा यांच्या मोबाईल क्रमांकावर दोन वेगवेगळ्या क्रमांकाने सहा मिस्ड कॉल आले. त्यातील एका क्रमांकावर शहा यांनी कॉल केला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय, शहा यांचा मोबाईल क्रमांकही बंद पडला. त्यानंतर काहीच वेळात त्यांच्या बॅंक खात्यातून 28 व्यवहारांद्वारे आरोपींनी एक कोटी 86 लाख रुपये काढले. शहा यांच्या तक्रारीनुसार बॅंकेने तातडीने कार्यवाही करत 20 लाख रुपये परत मिळवले; मात्र उर्वरित रक्कम चोरट्यांनी स्वतःच्या खात्यातून काढली.
|