खड्डे उठले जिवावर; ७ वर्षांत २६२ बळी

MUBAI-GOV HIGHWAY
MUBAI-GOV HIGHWAY

पनवेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम २०११ साली हाती घेण्यात आले होते. या कामाची अंतिम तारीख जून २०१९ उलटून गेली, तरी रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गावर कर्नाळा खिंडीत अनेक नागमोडी वळणे असल्याने या ठिकाणी गेल्या ७ वर्षांत १ हजार २६६ अपघातांमध्ये २६२ जणांना जीव गमवावा लागला. या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था पाहता महामार्ग मृत्यूचे महाद्वार ठरत असल्याचे दिसून येते. महामार्गावर पडलेले खड्डे जीवावर उठले असून प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे आणखी किती बळी जाणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


जमीन संपादनामध्ये अधिकारीवर्ग आपल्या मनमर्जीप्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया करीत असताना ज्यांच्या जमिनी, घरे; तसेच इतर मालमत्ता बाधित होत होती, त्या सर्व महामार्ग प्रकल्पबाधितांना या प्रक्रियेपासून अनभिज्ञ ठेवले. त्यामुळे या मार्गावर काम करणारे सुप्रीम रोड बिल्डर आणि महावीर रोड ॲण्ड इन्फ्रा प्रोजेकट हे कंत्राटदार व प्राधिकरणाचे अधिकारी काम करायला गेले तेव्हा प्रकल्पबाधितांमध्ये संताप पाहावयास मिळाला. 


अधिकांश गावांमध्ये रुंदीकरणाच्या कामाला विरोध झाला. यामध्ये संपादित जमीन आणि मालमत्तेला चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला, गाव तिथे उड्डाणपूल, जी झाडे चौपदारीकरणामध्ये तोडण्यात आली, त्याच्या एकास चार या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात यावी, आदिवासींच्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा, वन विभाग किंवा सरकारी जागेवर वास्तू, घर अथवा व्यवसाय असून संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद यांनी अधिकृत केलेल्या मालमत्तेचा मोबदला देण्यात यावा, गावांच्या जलवाहिन्यांचे पुनर्व्यवस्थापन स्थानिक पाणीपुरवठा समित्यांकडून करण्यात यावे, बाधित गावांच्या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात यावे, बाधित गावांना गावठाण मंजूर व्हावे, सरकारी जमीन देण्यात यावी, सार्वजनिक सुविधांचे पुनर्व्यवस्थापन काम सुरू करावे, अशा अनेक मागण्या घेऊन  प्रकल्पबाधितांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
मुदतीत काम केले नाही म्हणून २०१४ मध्ये सुप्रीम आणि महावीर इन्फ्रा प्रोजेक्‍ट प्रा.लि. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून ठेका काढून घेत जेएमआयपीएल या दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात आले. २०१९ जूनपर्यंत ८४ किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना रुंदीकरणाचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही, असे पळस्पे इंदापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचे संतोष ठाकूर यांनी सांगितले.


गाव तिथे उड्डाणपूल
महामार्गाचे काम सुरू होत असताना महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गावांचे विस्थापन थांबावे व शासनाचा पैसा वाचावा, यासाठी पळस्पे ते इंदापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पग्रस्त कृती समिती व युसुफ मेहर अली युवा बिरादरी या संघटनांनी गाव तिथे उड्डाणपूल बांधण्यात यावा, याची मागणी केली होती; परंतु संघटनांच्या या मागणीकडे महामार्ग प्राधिकरणाने सपशेल दुर्लक्ष केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com