वाकला कणा, मोडला बाणा, मला वाघ म्हणा...

वाकला कणा, मोडला बाणा, मला वाघ म्हणा...

मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर अफझलखानाशी युती करणाऱ्याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, असे सांगून शिवसेनेला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. सत्तेसाठी लाचार शिवसेनेची अवस्था "वाकला कणा, मोडला बाणा, म्हणे मला वाघ म्हणा...,' अशी झाली असल्याची टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

शिवसेना भवनावरून शिवाजी महाराजांची प्रतिमा शिवसेनेने हटवावी, अशी मागणी करून पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले, ""शिवसेना ही आता कीवसेना' झाली आहे. आज सगळ्यांत जास्त दुःखी, असहाय व मानसिक धक्‍क्‍यात शिवसैनिक आहेत. येणारी निवडणूक मोदी समर्थक व मोदीविरोधक यांच्यामध्ये होणार आहे. भाजप-शिवसेनेची अभद्र युती ही कॉंग्रेस महाआघाडीच्या फायद्याची असणार आहे. मोदीविरोधाचे खोटे मुखवटे गळून पडले, हे चांगले झाले. भाजपचा पराभव करण्याकरिता सर्व जनता एकवटली आहे. त्यामुळे शिवसैनिकही आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान करतील. पाच वर्षांतील पापांचा घडा दोन्ही पक्षांना एकत्रितपणे उचलावा लागेल.'' 

ते म्हणाले, ""गेली पाच वर्षे भाजप-शिवसेनेने जनतेला विश्वासघाताचा चित्रपट दाखवला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून ऑस्करचे नामांकन मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. या दोघांच्या उत्कृष्ट अभिनयाने जनतेची फसवणूक मात्र निश्‍चित झाली आहे. सत्तेच्या स्वार्थापायी दोन्ही पक्ष एकत्र आले असले, तरी या दोघांच्या मुखातून आलेले जनतेच्या मनातील प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. कॉंग्रेस पक्ष आज तेच प्रश्न त्यांना विचारत आहे.'' 

काँग्रेसचे युतीला प्रश्न 

1) मुख्यमंत्री म्हणाले होते, की मुंबई 25 वर्षे शिवसेनेच्या सत्तेत सडली, आता मुंबईकरांचे भवितव्य अधिक सडवण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का? 

2) भाजपला मुंबई महापालिकेत दिसणारे माफियाराज संपले का? वांद्य्रातील साहेब व त्यांचा पी.ए. कोण? कालच्या पत्रकार परिषदेत ते कुठे होते? 

3) शिवसेनेच्या म्हणण्यानुसार मुंबईतील भ्रष्टाचारी कंत्राटदार भाजपचे होते. ते आता अधिकृतपणे युतीचे होणार का? त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करणार का? 

4) उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार राममंदिर पारदर्शक आहे ते दिसत नाही. मग आता तेच राममंदिर अपारदर्शक झाल्याने दिसू लागले का? 

5) मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहारास शिवसेना जबाबदार होती व आर्थिक व्यवहारांचे अंतर्गत लेखापरीक्षण झाले नव्हते. आता त्याला युती जबाबदार राहील का, आणि मुंबई महानगर पालिकेविरोधातील तक्रारींसाठी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली विशेष उपलोकायुक्तांची नियुक्ती आता होणार की नाही? मुंबई महानगरपालिकेच्या सर्व करारांची न्यायालयीन चौकशी कधी होणार? 

6) युती अखंड महाराष्ट्राची शपथ घेणार की वेगळ्या विदर्भाची? 

7) मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ठाणे महापालिकेने वाटलेल्या भूखंडांची चौकशी कधी होणार? 

8) उद्धव ठाकरे यांच्या काळ्या पैशाचे काय झाले? उद्धव ठाकरेंची संपत्ती जाहीर करण्याबाबत भाजपची आता काय भूमिका आहे? उद्धव ठाकरेंच्या मागणीप्रमाणे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची संपत्ती जाहीर करणार का? उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपात तथ्य आहे, त्यामुळे किरीट सोमय्यांनी "ईडी'कडे तक्रार करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. आता त्या तक्रारीचे काय झाले? 

9) शिवसेनेच्या म्हणण्याप्रमाणे किरीट सोमय्या "घोटाळेबाज' आहेत की नाहीत? टॅंकर गैरव्यवहाराचे काय झाले?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com